* सर, माझे बजेट तीन ते चार लाख रुपये आहे. मला फारसा काही प्रवास करावा लागत नाही. मला गाडय़ांची फार काही माहिती नाही. तरी कृपया मार्गदर्शन करावे.
–अक्षय काळे
तुमचा गाडीचा वापर अगदी कमी असेल तर तुम्ही नवीन अल्टो ८०० ही गाडी घ्यावी. ती तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरेल. कारण या गाडीचा मायलेज उत्तम आहे. मेन्टेनन्सही कमी आहे. तसेच तुम्हाला ही अडीच लाखांतही प्राप्त होऊ शकते.
* मला जुन्या स्टाइलची एन्डेव्हर गाडी फार आवडते. माझे बजेट आठ ते दहा लाख रुपये आहे. कोणत्या वर्षांचे मॉडेल मी घ्यावे? ते किती वर्षे वापरावे? त्यात काय नव्या सोयी करता येतील?
– प्रबोधन माध्यम
तुम्ही २०१० सालची फोर्ड एन्डेव्हर घेऊ शकता. तिच्यात अतिरिक्त सोयी करण्याची गरज नाही. फक्त तुम्ही जेव्हा गाडी घ्याल त्या वेळी गाडीच्या इंजिनाची स्थिती पाहून घ्या. तसेच गाडीचे एकूण किती रनिंग झाले आहे, हेही काळजीपूर्वक तपासून घ्या.
* मला सेकंड हँड सेडोन कार घ्यायची आहे. जिचा मायलेज चांगला असेल, मेन्टेनन्सही कमी असेल आणि ती स्टेटस सिम्बॉलही होऊ शकेल, अशी गाडी मला सुचवा.
– विवेक देशपांडे
मी तुम्हाला होंडा सिटी गाडी घेण्याचा सल्ला देईन. ही गाडी अतिशय स्मूद आहे आणि ती दीर्घकाळ टिकणारीही आहे. होंडा सिटीचा मायलेज चांगला असून मेन्टेनन्सही कमी आहे. पाच ते आठ वर्षे जुनी असलेली होंडा सिटी तुम्ही घेऊ शकता. तिचे रनिंग मात्र ६० ते ९० हजार किमीपर्यंत झालेले असावे.
या सदरासाठी प्रश्न पाठवा : ls.driveit@gmail.com