एक्सयूव्ही५०० एरो
मिहंद्रा समूहाने नुकत्याच दिल्लीनजीक झालेल्या वाहन प्रदर्शनात हे वाहन सादर केले होते. कॉन्सेप्ट प्रकारातील या वाहनाला एरो म्हणून संबोधले गेले. कंपनीच्या ताफ्यातील आतापर्यंतच्या वाहनांच्या तुलनेत हे तसे उत्तम वाहन म्हणता येईल. म्हणजे स्टाइल आणि परफॉर्मन्सबाबत. कूप एसयूव्ही म्हणूनही तिची ओळख आहे. या गटात सर्वप्रथम बीएमडब्ल्यूने जवळपास अर्ध दशकापूर्वी पाऊल ठेवले होते. तिची एक्स६ ही ती कार. यामध्ये तिसऱ्या रांगेतील आसने नाहीशी करण्यात आली. आणि तिचा स्लोपिंग रुफही अगदी शेवटपर्यंत खेचण्यात आला. ही कार महागडी तर आहेच शिवाय अद्यापही तिला मागणी आहे. संपूर्ण युटिलिटी व्हेकलच्या तुलनेत ही चार आसनी कार लाइफस्टाइल व्हेकल आहे.
तर महिंद्राने या गटात शिरकाव करत स्पर्धा काहीशी मर्यादित केली आहे. गेल्या काही वर्षांत तसे या श्रेणीतील फारशी वाहने दिसली नाहीत. कंपन्यांनीही त्यावर अधिक भर दिला नाही. अशा वाहनांकडे सर्वसाधारणपणे नवा खरेदीदारच अधिक आकृष्ट होऊ शकतो.
महिंद्राचे हे वाहन दिसायला खूपच चांगले आहे. तिचे डिझाइन प्रसिद्ध इटालियन डिझाइन कंपनी पिनिनफॅरिनाने तयार केले आहे. महिंद्रानेच डिझाइन क्षेत्रातील ही नाममुद्रा खरेदी व्यवहाराने आपल्या ताब्यात नुकतीच घेतली. पिनिनफॅरिनाने यापूर्वी फेरारीकरिताही अनेक डिझाइन बनवून दिलीत. फेरारीची क्रेझ तर सर्वच जाणतात. तेव्हा आता महिंद्राच्या माध्यमातून पिनिनफॅरिना ही नव्या पिढीतील डिझाइन समूहाच्या विविध वाहनांकरिता सादर करेल व ते अव्वलच असेल, यात शंका नाही. वाहनाचे मायलेज, किंमत याचबरोबर स्टाइलवरही खरेदीदारांचा अधिक भर असतो.
महिंद्राने ही कार प्रदर्शनात सादर करताना कॉन्सेप्ट म्हणून सादर केली. म्हणजे त्याबाबतच्या अधिक सूचना आल्या की त्यात बदल करता यावेत म्हणून. महिंद्राच्या आतापर्यंतच्या नव्या वाहनांमध्ये वापरले जाणारे एमहॉक डिझेल इंजिन यातही आहे. ते २१० एचपीचे आहे. महिंद्रातील सध्याच्या वाहनांच्या तुलनेत ते जलद आणि भक्कम ठरणारे आहे. कूप एसयूव्ही हा वाहन प्रकार असा आहे की, ज्याची तुम्हाला गरज आहे म्हणून नव्हे तर तुमच्याकडे असायला हवे असे वाहन आहे.
युटिलिटी व्हेकलसाठीची महिंद्राची स्वत:ची अशी वेगळी ओळख आहे. एसयूव्ही गटात तर ती अव्वल आहेच. या श्रेणीतील तिची विविध वाहने ही ५ लाख रुपयांपासून ते २० लाख रुपयांपर्यंत आहेत. एरोच्या माध्यमातून वाहनप्रेमींना नव्या श्रेणीचा आनंद तर घेता येईलच शिवाय महिंद्राला कदाचित या गटात नवा इतिहास निर्माण करता येईल.
प्रणव सोनोने – pranav.sonone@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा