कोणत्याही वाहन उत्पादक कंपनीसाठी भारतीय कार बाजारपेठेत स्थिरावणे खूपच आव्हानात्मक आहे. इथली बाजारपेठ तर जगात किंमतीबाबत खूपच संवेदनशील आहे. शिवाय वाहनांमधील स्पर्धाही कमालीच्या वरच्या टप्प्यावरील आहे. हे सारे पाहता अनेक विदेशी कंपन्यांसाठी भारतीय बाजारपेठ ही खूपच आव्हानात्मक वाटते. तेव्हा त्यांच्याकडून सुरुवातीला काही चुकाही घडतात.
छोटय़ा कार तयार करणाऱ्या कंपन्या मोठय़ा आणि आलिशान कार तयार करू शकत नाहीत, असा काहीसा गैरसमज बाळगला जातो. गेल्या काही कालावधीत मारुती सुझुकी आणि ह्य़ुंदाई मोटर यांनी या समस्येचा सामना केला. फोक्सव्ॉगन ही समस्या जागतिक स्तरावर अनुभवत आहे. हा तिढा सुटण्यासाठी कंपन्या खास या श्रेणीसाठी स्वतंत्र कंपन्या स्थापन करतात. या कंपन्यांमार्फत केवळ त्यांची महागडी वाहनेच तयार केली जातात.
ह्य़ुंदाई जेनेसिस तयार करते. टोयोटा लेक्सस बनविते. तर होन्डाची या श्रेणीतील अॅक्युरा आहे. आता ह्य़ुंदाईने तिचा जागतिक स्तरावरील आघाडीची नाममुद्रा भारतात आणावयाचे निश्चित केले आहे. जेनेसिस तिचे नाव. देशातील प्रमुख शहरात तिची काही महिन्यांपूर्वी चाचणीही झाली. भारतीयांपुढे एरवी आरामदायी कारसाठी मर्सिडिज बेंझ, बीएमडब्ल्यु, ऑडीसारखा जर्मन बनावटीच्या कारचा पर्याय असताना दक्षिण कोरियन कंपनीचा पर्याय? जनेसिस नाममुद्रेंतर्गत ह्य़ुंदाई समूहाची सादर होणारी ही कार ५० ते ७० लाख रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. या किंमतश्रेणीत उपरोक्त तिन्ही जर्मन कंपनीचा वरचष्मा आहेच. मर्सिडिज बेंझ ई क्लास, बीएमडब्ल्यू५ आणि ऑडी ए६ या कार त्यासाठी सांगता येतील. भारतीय वाहनप्रेमींना पारंपरिक पर्याया व्यतिरिक्त एक चांगला मार्ग यानिमित्ताने येत्या काही कालावधीत मिळेल, अशी आशा आहे.
टोयोटा हीदेखील भारतीय प्रवासी कार क्षेत्रात पाय रोवण्यास काहीशी अपयशीच ठरली. तिनेही आता या वेगळ्या श्रेणीवर लक्ष केंद्रीत केले आहे. तिची दाईहॅत्सु ही कार या गटात येऊ पाहत आहे. अर्थातच ती स्पर्धा करेल त्या ह्य़ुंदाईशी. दाईहॅत्सु ही नाममुद्रा जपानी टोयोटाने नुकतीच खरेदी केली. ती अधिकतर छोटय़ा कार तयार करते. डॅटसनही या श्रेणीत उतरत आहे. रेनो आणि निस्सान मिळून डॅटसन नाममुद्रा सध्या विकसित करतात. एकूणच भारतीय आलिशान कार श्रेणीतील स्पर्धा नव्या कंपन्यांमुळे अधिक वेगवान होणार आहे.
pranavsonone@gmail.com