आयुष्यात पहिल्यांदाच कार घ्यायची असेल तर सर्वसाधारणपणे घेणाऱ्याचा कल हा सेकंड हँड कार घेण्याकडे जास्त असतो. कारण एकतर गाडी जुनी असते, तिचे बऱ्यापैकी रनिंग झालेले असते आणि दुसरे म्हणजे ती चालवून ड्रायव्िंहगचे कौशल्य सफाईदार करता येते. त्यामुळेच देशात प्रीयुज्ड कारची बाजारपेठही वाढते आहे. अनेक ऑनलाइन कंपन्याही या क्षेत्रात आहेत..

वाहन क्षेत्रासाठी सुगीचा हंगाम असलेला सणासुदीचा काळ आता अगदी समीप येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवापासून सुरू होणारा हा सणासुदीचा काळ पार दिवाळीपर्यंत चालतो. त्यामुळे याच काळात वाहनखरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो.

त्यामुळे अनेक नवनव्या गाडय़ांचे लाँचिंग या काळात होत असते. काही महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या आणि एव्हाना येथील रस्त्यांप्रमाणेच चालकांच्या मनातही रुळलेल्या नव्या वाहनांना मिळणारा प्रतिसादही स्पष्ट झाला आहे. सणांपूर्वीच ही वाहने सादर करून कंपन्यांनी गेल्या काही सलग महिन्यांतील वाहन विक्री घसरणीला रोखण्याचा प्रयत्न केला. डिसेंबपर्यंत आणखी काही नवी वाहने सादर करण्यास अद्याप कंपन्यांचा उत्साह कायम आहे. अशा वेळी जुन्या वाहनांकडे ग्राहक फिरकतच नाही, असे म्हणणे पूर्णपणे खरे ठरणार नाही. प्री युज्ड म्हणजेच सेकंडहँड कार बाजारपेठ ही भारतातही तेवढीच मोठी आहे. एक वेगळाच वर्ग या गटाचा खरेदीदार आहे. अशा जुन्या मात्र वापरयोग्य वाहनांकरिता खरेदी-विक्री होणारी देशातील संख्या ७० लाखांच्या घरात जाण्याचा अंदाजही आहे. २०२० पर्यंत जगातील पाचवी मोठी वाहन बाजारपेठ होण्याच्या दिशेने निघालेल्या भारताकडे साऱ्या जगाचेच लक्ष आहे. प्री युज्ड कार बाजारपेठ ही सध्या दुहेरी आकडय़ात – १५ टक्के दराने वाढत आहे. २०१६ अखेरीस ती ३३ लाखांची (वाहन संख्या) होण्याची शक्यता आहे. पैकी निम्मा हिस्सा हा महानगर वगळता असलेली शहरे, निमशहरांमधील असेल.

हे क्षेत्र तसे संघटित प्रमाणात कमी (१२ टक्के)आहे. तर सर्वाधिक ६० टक्के असंघटित क्षेत्रामार्फत ३०,००० विक्रते व्यवहार करतात. अशी वाहने खरेदी करणाऱ्यांमध्ये युवावर्गाची संख्या आहे. प्रत्येक १,००० मागे २२ कार या सेकंडहँड कार विकल्या जातात. बरं अशा वापरलेल्या वाहनांचं वयही चारेक र्वष असतं. ५०,००० किलोमीटर धावलेल्या या वाहनांची किंमतही सरासरी ५ लाखांच्या आतच असते. वापरलेली, पण आयुष्यातील पहिली कार म्हणून घेणाऱ्यांचं प्रमाणही ५० टक्क्यांपर्यंत आहे. नव्या कारच्या तुलनेत अशा वाहनांसाठी घेतलेल्या कर्जाचा व्याजदर ४-५ टक्के अधिक असतो. पण अशा वाहनांच्या किमतीच कमी असल्याने त्यासाठी कर्ज काढणाऱ्यांचं प्रमाण फार तर १५ टक्केच असतं. तुलनेत नव्या वाहनासाठी वित्तसाहाय्य घेणारे ६५ टक्के असतात.

नव्या वाहनांप्रमाणेच प्री युज्ड वाहनांमध्ये छोटय़ा वाहनांना (२,००० सीसीपेक्षा कमी) अधिक पसंती आहे. तसेच खरेदीदार अद्याप या गटातदेखील डिझेल वाहनांचं अग्रक्रम देतात. नवे महागडे वाहन खरेदी करण्यापेक्षा असे वाहन खरेदी करून कामचलाऊ धोरण तसेच वाहनमालकीची हौसही भागविली जाते. दिल्लीतील ऑड – इव्हन किंवा २,००० सीसी इंजिन क्षमतेच्या डिझेल वाहनांवरील बंदी अशा चर्चेतल्या कालावधीत जुन्या वाहनांकरिता ग्राहकांकडून मोठी मागणी नोंदली गेली. नव्या वाहन गटाप्रमाणेच एसयूव्ही, कॉम्पॅक्ट एसयू्व्हीसाठीदेखील हाच कल होता. तर यंदा या क्षेत्रालाही उभारीचे दिवस आहेत. एक म्हणजे दमदार मान्सून, सातव्या वेतन आयोगाची मात्रा, सण – समारंभाच्या निमित्ताने येणारी सवलत आदी कारणे त्यामुळे आहेतच. नव्या कारच्या तुलनेत सेकंडहँड वाहन बाजारपेठ ही २० टक्के अधिक मोठी आहे. हे क्षेत्रही आता स्पर्धक बनत आहे. या गटातील बडे खेळाडू तसेच अन्यही माहिती तंत्रज्ञानाची कास धरत जुन्या वाहनांच्या विक्रीला सुविधांची जोड देऊ करत आहेत.

भारतातील एकूण वाहन बाजारपेठ १२५ अब्ज डॉलरची आहे. पैकी केवळ ३ टक्के हे ऑनलाइनच्या माध्यमातून कार्यरत आहे. मात्र प्री युज्ड, सेकंडहँडसारखी बाजारपेठही या मंचावर अधिक तंत्रज्ञानासह विस्तारत असल्याने तीदेखील १० टक्क्यांपर्यंत विस्तारण्याचा अंदाज आहे.

  • स्वत: वाहने तयार करणाऱ्या मारुती सुझुकी (ट्र व्हॅल्यू), महिंद्रा अँड महिंद्रा (फर्स्ट चॉइस) यांच्यासारख्या कंपन्याही जुन्या वाहनांच्या खरेदी – विक्रीत आहेत. त्याचबरोबर जर्मन बनावटीच्या आलिशान वाहनांची निर्मिती करणाऱ्या प्रसिद्ध वाहन कंपन्यांनीही या गटाकरिता स्वतंत्र कंपनीच सुरू केली आहे.
  • कारदेखो.कॉम, गाडी.कॉमसारख्या संकेतस्थळ कंपन्याही आहेतच. तुम्ही नवी मारुती स्विफ्ट अथवा ह्य़ुंदाई आय१० घेतली तर ती नक्कीच ५ लाखांपर्यंत जाते. अशा मंचावर मात्र ५०,००० किलोमीटरपेक्षा कमी धावलेली व पाच वर्षे जुनी हीच कार तुम्हाला ३ लाख रुपयांपर्यंत मिळू शकते.
  • ई मंचावरील क्लासिफाइडही अशा वाहनांना अधिक मागणी नोंदवितात. या संकेतस्थळांवर वाहनांच्या छायाचित्रासह त्यांचा अख्खा बायोडाटाच असतो. किंमतही स्पष्टपणे नमूद केली असते. तेव्हा पटलं तर क्लिक करायचं, असाच फंडा इथे असतो.
  • आता तर तुमच्या वाहनांची नेमकी किती मार्केट व्हॅल्यू आहे हे सांगणारं गणितही काहींनी मांडलं आहे. ड्रम ऑनलाइनच्या ऑरेंजबुकव्हॅल्यू मंचावर वाहनाविषयीची ठरावीक माहिती नमूद करायची की त्याची किंमत संकेतस्थळावर अवघ्या १० सेकंदात झळकते. त्याचबरोबर ही किंमतीही योग्य किंवा कितपत माफक हेही ते दर्शविते.
  • अमेरिकेच्या साहाय्यानं भारतातही उपलब्ध असं किमतीचं मीटर देणारं कदाचित हे देशातील पहिलंच व्यासपीठ असावं. १०० कंपन्यांची गेल्या दशकभरातील २४ हजारांहून अधिक उत्पादनं या मंचावर आहेत. गेल्या तीनेक महिन्यांतील वाहन विक्री-खरेदीचा आढावाही इथे पाहायला मिळेल.
  • दिवसाला छत्र्यांप्रमाणे उगवणाऱ्या अ‍ॅपच्या जमान्यात तर जुन्या वाहनांविषयीची तांत्रिक अद्ययावतता अधिक गतिमान होत आहे. याद्वारे अधिकाधिक सुविधा उपलब्ध होत आहे. निर्णयक्षमता त्यामुळे त्वरित निकालात निघते. अशा वाहनांकरिताही सात वर्षांपर्यंत व्ॉरंटी दिली जात आहे. तेव्हा अशा वापरातील वाहनांसाठीही खरेदीदारांसमोर नव्या वाहनांची खरेदी करताना असलेले सारे पर्याय उपलब्ध होत आहेत. यामध्ये सेवा ते वित्तसाहाय्य असे सारे काही आले.

veerendra.talegaonkar@expressindia.com