कारपेक्षा कमी किंमत, चालवण्यास सोपी व किफायतशीर, तसेच पार्किंगसाठी कमी जागा अशा अनेक फायद्यामुळे सध्याच्या काळात मोटरसायकल असणे ही एक आवश्यक बाब झाली आहे, परिणामी मोटरसायकलचा वापर झपाटय़ाने वाढतो आहे. मोटरसायकल पार्किगसाठी मेन स्टॅँड व साइड स्टॅँड बसवलेले असतात, परंतु प्रत्येक वेळी दुचाकी मेन स्टॅँडवर लावणे अवघड होत असल्याने सर्वाधिक वेळा साइड स्टॅँडचा वापर केला जातो. दुचाकी पार्किंगमधून काढल्यावर साइडस्टॅँड स्वयंचलित वर जाण्यासाठी यांत्रिक स्प्रिंग बसवलेली असते. परंतु कालांतराने ही स्प्रिंग जुनी झाल्यामुळे किवा देखभाल न केल्यामुळे, साइडस्टॅँड स्वयंचलितपणे वर जात नाही. अशा वेळेस चालक घाईत असल्यास किंवा साइडस्टॅँड वर करावयाचे विसरल्यास, वळणावर किंवा स्पीड ब्रेकरवर साइडस्टॅँड घासून मोठा अपघात होण्याची शक्यता असते.
अशा प्रकारचे अपघात पूर्णपणे टाळण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन रत्नागिरी येथील तृतीय वर्ष यंत्र अभियांत्रिकी विभागातील संकेत जाधव, सिद्धेश भालेकर, सचिन चव्हाण, आणि हनुमान पाथरवट या विद्यार्थ्यांनी सध्या अस्तित्वात असलेल्या साइडस्टॅँड व क्लच लिवरमध्ये थोडे बदल करून ‘सुरक्षित मोटरसायकल साइड पार्किंग स्टॅँड’ विकसित केले आहे. या प्रणालीमध्ये जो पर्यंत चालक स्वत: साइड पार्किंग स्टॅँड वर करत नाही, तो पर्यंत मोटरसायकलचा पहिला गीअर पडत नाही, परिणामी दुचाकी जागेवरून हलू शकत नाही व अशा प्रकारचे अपघात होणार नाहीत याची हमी यातून मिळते.
सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व प्रकारच्या मोटरसायकलमध्ये अतिशय कमी खर्चात ही प्रणाली सहज बसवता येवू शकते. संबधित प्रणाली विकसित करण्यासाठी या विद्यार्थ्यांना यंत्र विभागातील प्राध्यापक डॉ. व्ही. यू. राठोड, विभागप्रमुख डॉ. सी. वाय. सिमेकेरी, सर्व अधिकारी व कर्मचारी, तसेच प्राचार्य श्री. ए. एम. जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या सुरक्षित मोटरसायकल साइड पाìकग स्टॅँडला एमआयटीएम, सिंधुदुर्ग यांनी २ मार्च रोजी आयोजित केलेल्या राष्ट्रीय पातळीवरील प्रकल्प प्रदर्शन व स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक मिळाले असून, संबधित विद्यार्थी व प्राध्यापक यासाठीचे स्वामित्व हक्क मिळवण्यासाठी राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पेटंट दाखल करणार आहेत.
ऑटो न्यूज.. : रत्नागिरीतील विद्यार्थ्यांची कमाल..!
मोटरसायकल असणे ही एक आवश्यक बाब झाली आहे, परिणामी मोटरसायकलचा वापर झपाटय़ाने वाढतो आहे.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-03-2016 at 01:39 IST
मराठीतील सर्व व्हीलड्राइव्ह बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Secure bike parking side stand invented by ratnagiri students