एप्रिलच्या मध्यावर असतानाच तापमापकातील पाऱ्याने पस्तिशी ओलांडली आहे. मे महिन्यात हा दाह अधिकच वाढू शकतो. या वाढत्या तापमानामुळे अंगाची लाही लाही होत असताना आपल्या लाडक्या गाडीचीही हीच स्थिती असू शकते, याचा विचार करायला हवा. उन्हाळ्यामुळे गाडी प्रचंड तापते. त्यातच वाहतूक कोंडीत गाडीच्या बाहेरील तापमान विविध वायूंमुळे वास्तविक तापमानाच्या आठ ते दहा अंश सेल्सिअसने जास्त असू शकते. त्याचा फटका गाडीला बसतो आणि गाडी जुनी होण्याची प्रक्रिया अधिक झपाटय़ाने होते. शरीर थंड ठेवण्यासाठी वाळ्याचे सरबत, वाळ्याचे पाणी, टोपी आदी गोष्टी आपण उन्हाळ्यात करतच असतो. पण गाडी थंड ठेवण्यासाठीही काही गोष्टी करणे आवश्यक आहे. या उपाययोजना खालीलप्रमाणे..
एअर कंडिशनिंग
उन्हाळ्यात गाडीतील एसी यंत्रणा ही सर्वाधिक वापरली जाणारी यंत्रणा आहे. या यंत्रणेवर खूप ताण पडतो. त्यामुळे कम्प्रेसर ऑइल सातत्याने तपासणे आवश्यक आहे. गाडीतील कूलण्ट सतत गळत असते किंवा धूळ वा धुरामुळे या गाडीतील वातानुकूलन यंत्रणा खराब होऊ शकते. या घटकांकडे लक्ष द्यावे लागते. त्यामुळे उन्हाचा तडाखा वाढण्याआधी आपल्या गाडीतील एसी यंत्रणा तपासून घेणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात आणखी एक तक्रार नेहमी केली जाते. ती म्हणजे एसी लावल्यानंतर लवकर गाडी गार होत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे अनेकदा गाडी उन्हात उभी असते. त्या वेळी बाहेरच्या तापमानापेक्षा गाडीतील तापमान हवा बंद असल्याने १० अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त असू शकते. गाडीत बसल्यानंतर थेट वातानुकूलन यंत्रणा चालू करण्याऐवजी गाडी सुरू करून गाडीच्या काचा खाली कराव्या. त्यानंतर एसी यंत्रणेचा पंखा पूर्ण वेगात चालू ठेवावा. बाहेरचे तापमान आणि गाडीतील तापमान एकसमान झाल्यासारखे वाटल्यानंतर मग काचा बंद करून एसी चालू करावा. त्यामुळे एसीवर ताण येणार नाही आणि गाडीही थंड राहील.
टायर
गाडीचे टायर हा गाडीचा अत्यंत महत्त्वाचा आणि तरीही अनेकदा दुर्लक्षित राहिलेला घटक आहे. गाडी चकाचक आहे का, याकडे लक्ष देणारे गाडीचे मालक बऱ्याचदा टायरकडे दुर्लक्ष करतात. अनेकांना तर टायरमध्ये नेमक्या किती दाबाची हवा असायला हवी, याचीही माहिती नसते. इतर वेळी हे प्रकार चालून जात असले, तरी उन्हाळ्यात हा प्रकार गाडीसाठी आणि तुमच्यासाठीही धोकादायक ठरू शकतो. अत्यंत कडक उष्म्याच्या दिवशी गाडीत हवा कमी असताना तुम्ही गाडी चालवलीत, तर टायरच्या कडा उन्हामुळे अत्यंत नरम होऊन चाकाला नुकसान पोहोचू शकते आणि टायर फाटू शकतो. त्याचप्रमाणे सध्या अनेक रस्ते सिमेंट काँक्रिटचे झाले आहेत. या रस्त्यांवर घर्षण जास्त होत असल्याने उन्हाळ्यात टायरमध्ये हवा योग्य नसली, तर त्यामुळे टायर फुटून अपघात होऊ शकतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत टायरमध्ये नेहमीपेक्षा ३ ते ५ पीएसआय जास्त हवा भरणे योग्य ठरते. बाहेरील तापमानाप्रमाणे टायरमधील हवेचा दाबही बदलतो. बाहेरचे तापमान १० अंश सेल्सिअसने कमी झाले की, टायरमधील हवा १ पीएसआयने कमी होते. त्यामुळे उन्हाळ्यात सातत्याने हवा तपासावी लागते. तसेच उष्णता जास्त असली की टायर प्रसरण पावून हवेचा दाब कमी-जास्त होतो. त्यामुळे उन्हाळ्यात गाडीतील हवा तपासताना शक्यतो उन्हे चढायच्या आधी सकाळच्या वेळी तपासावी.
पॉलिश
पॉलिश करून गाडी चकाचक करणे, या गोष्टीचा संबंध आपण साधारणपणे दिखाव्याशी जोडतो. मात्र उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गाडीचा रंग सुरक्षित ठेवण्यासाठी हे व्ॉक्स पॉलिश अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण या व्ॉक्स पॉलिशमुळे गाडीच्या रंगावर एक थर जमतो. हा थर गाडीच्या रंगाचे सूर्याच्या थेट उष्णतेपासून रक्षण करतो.
रेडिएटर आणि कूलंट
गाडीतील पेट्रोल, तेल, पाणी अशा अनेक द्रव पदार्थापैकी कूलंट हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. खासकरून कूलंटच्या अभावामुळेच अनेकदा उन्हाळ्यात गाडय़ा बंद पडतात किंवा गाडय़ांच्या इंजिनमधून धूर येतो. त्यामुळे उन्हाळ्यात गाडीतील कूलंटची पातळी तपासून घ्यावी आणि कूलंट भरून ठेवावे. तसेच गाडी तीन वर्षांपेक्षा जास्त जुनी असेल, तर उन्हाळ्याआधी गाडीच्या रेडिएटरची तपासणी करून घेणे आवश्यक ठरते. तसेच कूलंट वापरतानाही स्वस्त असण्यापेक्षा अधिक परिणामकारक कोणते, ते लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते.
बॅटरी
खूप उष्मा असल्याने बॅटरी खराब होऊ शकते कारण तापमान जास्त असेल, तर बॅटरमधील द्रवाची वाफ होऊन ते कमी होते आणि बॅटरीचे आयुष्यही कमी होते. बॅटरीतील द्रवाची पातळी बदलल्याने बॅटरी वेगाने चार्ज होते आणि कधी कधी ती ओव्हरचार्ज होते. त्यामुळे बॅटरी योग्य वेगाने चार्ज होत आहे ना, हे तपासणे गरजेचे आहे. तसेच बॅटरी टर्मिनल एकमेकांना किंवा इतर कुठे घासत नाहीत ना, हे तपासणेही गरजेचे आहे. सध्या सर्व नव्या गाडय़ांमधील बॅटरी झिरो मेण्टेनन्स प्रकारातील आहेत. पण जुन्या गाडय़ांपैकी डिस्टील वॉटर भरणे आवश्यक असलेल्या बॅटरी असतील, तर त्या पाण्याची पातळीही तपासावी लागेल.
इंजिन ऑइल
गाडीतील इंजिन ऑइल संपवण्यात उष्म्याचा सर्वाधिक वाटा असतो. त्यात ते ऑइल आधीच कमी असेल आणि जुने असेल, तर ते आणखी लवकर संपते. त्यामुळे उन्हाळा सुरू होण्याआधी इंजिन ऑइलची मात्रा तपासून ऑइलची पातळी पूर्ण भरून ठेवणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे गाडीत असलेले इंजिन ऑइल उन्हाळ्याच्या सुरुवातीला पूर्ण बदलून त्या ऐवजी इंजिनला अधिक थंड ठेवेल, असे ऑइल टाकून ठेवावे. त्याचप्रमाणे ब्रेक, पॉवर स्टिअरिंग आदींच्या ऑइलचीही तपासणी करावी.
रोहन टिल्लू – rohan.tillu@expressindia.com