* मला माझ्या कुटुंबासाठी गाडी घ्यायची आहे. माझे मासिक ड्रायव्हिंग ५०० किमी आहे. मी टाटा टियागो पेट्रोल व्हर्जन ही गाडी घ्यावी का.
– विश्वनाथ होनराव
* होय, बजेट कारमध्ये टियागो सर्वोत्तम आहे. या गाडीच्या टॉप मॉडेल एक्सझेडमध्ये एअर बॅग्ज, अलॉय व्हील्स, एबीएस इत्यादी सुविधा आहेत. सर्वोच्च स्पीडलाही टियागो उत्तम चालते. तसेच सव्वापाच लाखांपर्यंत ती तुम्हाला ऑन रोड मिळू शकेल.
* आमचे आठ जणांचे कुटुंब आहे. वर्षांतून आम्ही १५-२० दिवस फिरायला जात असतो. सर्व सदस्य मोठे असल्याने आठ आसनी गाडी त्रासदायक ठरते. त्यासाठी आम्ही टाटा विंगर ही १४ आसनी गाडी आम्ही आठ आसनी करून घेण्याच्या विचारात आहोत. या गाडीच्या मेन्टेनन्सबद्दल आणि इंजिनाबद्दल सांगा तसेच ही गाडी घेणे योग्य ठरेल की नाही तेही सांगा. अन्यथा दुसरी गाडी सुचवा. – नीता फडणीस
* टाटा विंगर जास्त माणसांसाठी नक्कीच योग्य आहे. परंतु इतर वेळी या गाडीचा वापर झाला नाही तर तिचे इंजिन खराब होईल. रोज वापर होईल, अशीच गाडी घ्या. इनोव्हा क्रिस्टा पेट्रोल हा एक पर्याय आहे. अन्यथा गाडी भाडय़ाने घ्यावी.
* मला नवीन गाडी खरेदी करायची आहे. मी सात लाख रुपयांपर्यंत खर्च करू शकतो. मला स्विफ्ट डिझायर, सिआझ, सेलेरिओ, फिगो अस्पायर, होंडा अमेझ, फोक्सव्ॉगन, स्कोडा या गाडय़ांमध्ये रस आहे. मी कोणती घ्यावी, कृपया सुचवा. – चंद्रशेखर, ठाणे</strong>
* सेडानमध्ये तुम्हाला उत्तम गाडी म्हणजे डिझायर. या गाडीचे व्हीव्हीटी पेट्रोल इंजिन चांगले आहे. हिची किंमत साधारण साडेसहा ते सात लाखांत जाईल.
* माझे साडेतीन लाख रुपये बजेट आहे. मला रेनॉ क्विड घ्यायची इच्छा आहे. मी एकदम नवखा आहे. गाडी शिकण्यापासून सुरुवात करायची आहे. मला क्विड खूप आवडते. ही गाडी घेणे उचित ठरेल का. माझे मासिक ड्रायव्हिंग २५० ते ३०० किमी असेल. – विजय रणीत
* होय, क्विड तुमच्यासाठी योग्य गाडी आहे. मुंबईच्या ट्रॅफिकमध्येही ही गाडी उत्तम मायलेज देते. एसीही उत्तम आहे आणि स्पोर्टी लुकमुळे ही गाडी आणखी छान दिसते. मात्र, ७० ते ८०च्या स्पीडला ही गाडी व्हायब्रेट होते. त्याच किमतीत मिळू शकणारी टाटा टियागो मात्र उत्तम गाडी आहे.
या सदरासाठी प्रश्न पाठवा : ls.driveit@gmail.com