भटकंतीचा मला भारी नाद. मोटारसायकलवर म्हटल्यावर तर काय मग! आधी ग्रुपने ठरलं. पण मग ‘टू इज कंपनी, थ्री इज क्राउड’ या ‘वपुं’च्या विधानानं एका गाडीवर दोघेच जायचं पक्कं झालं. कोयना ते गोवा – बेंगलोर- तिरुपती आणि परत कोल्हापूर गडिहग्लज. तब्बल अडीच हजार किलोमीटरचे अंतर मोटारसायकलने कापायचे ठरले.
पोफळी-कोयनेहून आम्ही हिरो होंडा सीडी १००वर निघालो. मी आणि अण्णा, दत्तात्रय यरनाळ, मित्राचा मोठा भाऊ. दोन बॅगा, एक कॅरिअरवर एक कॅरिअरखाली लटकवून. डिकीत जुजबी सामान. पाण्याची बाटली, टॉवेल, चादर, स्लीपर्स असं. दोघांनाही हेल्मेट, गॉगल, स्वेटर, बूट. गळ्यात कॅमेरा अन् हातात भारताचा नकाशा.
आपण काहीतरी भन्नाट करतोय या जाणिवेनं उत्साहाने आम्ही निघालो होतो; पण काय होईल? कसं होईल? ही धास्ती होतीच. अण्णा भारी फिरस्ता. गाठीला मोठा अनुभव. भूगोलासोबत इतिहासातही त्याला रुची. चांगलंच सूत जुळलं.
पहिला टप्पा गणपतीपुळे. आलटूनपालटून आम्ही चालक व्हायचो. मागे बसणाऱ्यानं नकाशा काढून रस्ता, स्थळ शोधून ठेवायचं. त्या वेळी गुगल मॅपसारखी सोय नव्हती. पहिला मुक्काम गणपतीपुळ्यामध्ये. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून गोव्याला प्रस्थान. तिसऱ्या दिवशी अख्खा गोवा मोटारसायकलवर पालथा घातला.
सकाळी कारवारमाग्रे शिमोगा. कुमठाजवळ गेल्यावर सिद्धापूर जंगलातून जाताना रात्र झाली. डावीकडे कडा अन् उजवीकडे गडद दाट झाडी. हा भाग वाघ, बिबटय़ा, हत्ती आणि इतर जंगली श्वापदांसाठी प्रसिद्ध होता. गाडी पंक्चर किंवा बिघडली तर भीती वाटत होती. परंतु दुसरा पर्याय नव्हता. वाटेत कीर्र शांतता. त्यातच गाडीच्या प्रकाशात वेगवेगळ्या प्राण्यांचे डोळे चमकायचे त्या वेळी काळजात धस् व्हायचे. घाट चढून वर गेल्यावर जंगलखात्याच्या माणसाने काही वेगळेच सांगितले. म्हणाला, ‘कशाला आलात या रस्त्यानं. नशीबवान आहात. रात्री या रस्त्याने फक्त पोलीस येतात’ आम्ही वाचलो. तेव्हा म्हणे वीरप्पन फिरायचा तिथे. याचा विचार केल्यास आजही अंगावर काटा येतो.
शिमोग्याला मुक्काम करून सकाळी श्रवणबेळगोळला निघालो. वाटेत गाडी पंक्चर झाली. मी लिफ्ट घेऊन पुढे अन् अण्णा टाकीवर बसून गाडी घेऊन आला. एका दमात तो पहाड चढलो आम्ही. तिथे गेल्यावर पंक्चरवाला भेटला. सकाळी मात्र बंगळूरमध्ये मांडय़ांना गोळे येऊन दिवसभर अंथरूण धरलं. सहाव्या दिवशी तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो. बंगळूर ते कोल्हापूर हे सुमारे साडेपाचशे किलोमीटर अंतर एका दिवसात पार केले.
आजही उन्हाळ्यात केलेल्या या भन्नाट प्रवासाची जेव्हा कहाणी सांगतो तेव्हा मित्र विश्वास ठेवत नाहीत. मलाही या आमच्या अविश्वसनीय टूरचं तहहयात अप्रूप वाटत राहतं.
व्यंकटेश चौधरी, नांदेड</strong>