मला चार ते पाच लाखांच्या रेंजमध्ये मिळणारी गाडी हवी आहे. या किमतीत कोणती गाडी मिळेल. माझे आठवडय़ातून किमान १२० किमी फिरणे होते. कृपया मार्गदर्शन करा.
– शिवाजी भोसले
टाटा टियागो पेट्रोल ही तुमच्यासाठी योग्य गाडी आहे. म्हणजे तुमच्या एकंदर फिरण्यावरून तरी असंच सुचवावेसे वाटते. मारुती इग्निस ही गाडीही तुमच्यासाठी योग्य आहे. कारण ती चालवायला सोपी आहे आणि तिचा मायलेजही चांगला आहे.
मला मारुती बलेनो ही कार आवडते. पण मला तिच्याबद्दल खूप थोडी माहिती आहे. तिचा मायलेज किती. एकूणच ही गाडी माझ्यासाठी चांगली आहे का, हे सांगा.
– तुषार पाटील, मुंबई
साडेसहा लाखांपर्यंत तुम्हाला बलेनो मिळू शकते. तिचे पेट्रोल इंजिन आणि मायलेज हे तर सर्वात उत्तम आहे, पण वजनाने हलकी आहे. त्यामुळे ही गाडी हायवेवर थोडी अस्थिर असते. शहरातील वापर जास्त असेल तर ही गाडी घ्यायला काहीच हरकत नाही. परंतु हायवेवर जास्त ड्रायव्हिंग असेल तर फोक्सव्ॉगन पोलो ही गाडी घ्यावी.
माझा रोजचा प्रवास १०० किमीचा असतो. मी स्विफ्ट एलडीआय किंवा फोर्ड फिगो अँबिएंट या गाडय़ांचा विचार करतो आहे. मी नवीनच गाडी शिकलो आहे. कृपया मार्गदर्शन करा.
– प्रकाश गोडबोले
तुम्ही स्विफ्ट डिझेल ही गाडी घेऊ शकता, कारण ती दीर्घकाळासाठी चांगली आहे. मात्र, तुमचे बजेट थोडे जास्त असेल तर मी तुम्हाला फोक्सव्ॉगन पोलो वा व्हेंटो (डिझेल) या गाडय़ा सुचवेन. या गाडय़ांची इंजिने ताकदवान आहेत आणि मेन्टेनन्स कमी आहे. तुम्हाला एमयूव्ही घ्यायची असेल तर फोर्ड इकोस्पोर्ट घ्या. हायवेवर तिचा परफॉर्मन्स चांगला आहे.
मला ऑटोमॅटिक कार घ्यायची आहे. मी व्ॉगन आर व्हीएक्सआय एएमटी किंवा क्विड ईझीआर एएमटी या गाडय़ांचा विचार करतो आहे. मला कमी मेन्टेनन्सवाली, चांगला मायलेज देणारी अशी गाडी हवी आहे.
– सचिन महाडीक
व्ॉगन आर आणि सेलेरिओ यांच्यात फक्त डिझाइनचा फरक आहे. बाकी गिअरबॉक्स आणि इंजिन सारखेच आहेत. त्यामुळे तुम्हाला सेलेरिओ जास्त प्रशस्त वाटत असेल तर ती घ्यावी.
या सदरासाठी प्रश्न पाठवा : ls.driveit@gmail.com