UP 10th Standard Topper Girl Facial Hair Controversy: तुम्ही लोकांना चंद्र दाखवा पण ते तुमची नखंच पाहणार अशी काहीशी एक म्हण गावाकडे सर्रास वापरली जाते. त्याचा अर्थ काय तर, एखाद्याला एखाद्या गोष्टीत उणीदुणी काढायची असतील तर समोर तुम्ही लाख चांगल्या गोष्टी आणून ठेवल्या तरी त्यांना वाईटच दिसणार. असाच काहीसा दुर्दैवी प्रकार उत्तर प्रदेशच्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत टॉप केलेल्या प्राची निगमच्या बाबत घडला आहे. उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षा परिषदेचा दहावी व बारावी इयत्तेचा निकाल अलीकडेच जाहीर झाला. यामध्ये सीतापूरची रहिवासी असलेल्या प्राची निगमने राज्यात पहिला क्रमांक पटकावला, तिला ६०० पैकी तब्बल ५९१ गुण प्राप्त झाले आहेत. साहजिकच तिच्या या यशाने मित्र- मैत्रिणी, कुटुंब, नातेवाईकांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. एकीकडे निगम कुटुंब हा आनंद साजरा करत असताना त्यांच्या आनंदावर विरजण घालण्यासाठी काही विघ्नसंतोषी लोकांनी प्राचीला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. कारण काय तर तिच्या चेहऱ्यावरचे केस!
आश्चर्य वाटलं ना? पण दुर्दैवाने हीच वास्तविकता आहे. प्राची निगम ही विद्यार्थिनी सीतापूर येथील सीता बाल विद्या मंदिर इंटर कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर प्राचीने माध्यमांना प्रतिक्रिया देत “मला कधीच वाटलं नव्हतं की मी टॉपर होईन. मी अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं पण टॉपर होईन अशी अपेक्षा नव्हती. मला माझ्या मेहनतीचा अभिमान आहे.” असं म्हंटलं होतं. प्राचीने पुढे सांगितलं की, तिला अभियंता (इंजिनिअर) बनण्याची इच्छा आहे. आता ती IIT-JEE प्रवेश परीक्षा देण्याची तयारी करत आहे. तिने तिच्या यशाचे श्रेय सातत्यपूर्ण प्रयत्नांना आणि नियमित सरावाला दिले आहे. आपल्याप्रमाणे यश संपादित करण्यासाठी इतरांनाही प्रेरणा देत असतानाचा हा व्हिडीओ आपल्यावरच असा बॅक फायर करेल याचा कदाचित प्राचीने विचारही केला नसावा. कारण हा व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी ना तिची कहाणी ऐकली ना तिची मेहनत वाखाणली, त्यांनी फक्त पाहिले तिच्या चेहऱ्यावरचे केस!
झालं असं की, प्राचीच्या व्हिडीओवरून व तिचं अभिनंदन करणाऱ्या पोस्टवरून काहींनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. “तू हुशार आहेस पण तुझ्या चेहऱ्यावर किती केस आहेत? तू जरा स्वतःच्या दिसण्याकडे पण लक्ष द्यायला हवं, ” असा टीकेचा सूर अनेकांच्या कॅप्शन व कमेंट्स मध्ये होता. हे कितीही दुर्दैवी असलं तरी जशी वाईट तशी चांगलीही माणसं सोशल मीडियावर असतात. या टीकांना धोबीपछाड देत अनेकांनी प्राचीची पाठराखण केली आहे. तुमच्या या अशा विचारांमुळे एका हुशार मुलीला काय वाटत असेल तिच्या मनावर काय परिणाम होत असेल याचा विचार केलायत का? पौगंडावस्थेत अनेकदा हार्मोन्स अनियंत्रित होतात, पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) सारख्या समस्या तर तरुण मुलींमध्ये अत्यंत सामान्य आहेत, यामुळे अशाप्रकारे चेहऱ्यावर केस येऊ शकतात. प्राचीच्या बाबतही असं असू शकतं, पण अगदी हे कारण नसलं तरी तिच्या हुशारी पलीकडे जाऊन चेहरा बघणारे किती सुज्ञ आहेत? असे प्रश्न अनेकांनी या ट्रोलर्सला केले आहेत.
काहींनी या ट्रोलर्सला चपराक लावत असंही म्हटलं की, “आज हसून घ्या, उद्या ही मुलगी एखादी मोठी अधिकारी होईल आणि तुमच्यासारखे संकुचित विचाराचे लोक तिच्या पायाखालची धूळ ठरतील. तेव्हा कोण हसेल हे पाहण्यासाठी वाट बघावी लागणार नाही.” एका अन्य युजरने लिहिलं की, “तुम्ही हुशार मुलींना चेहऱ्यावरून चिडवता आणि सोशल मीडियावर फक्त अश्लील हावभाव करणाऱ्यांना ‘चोरून’ फॉलो करता. तुम्ही कुठलीच बाजू घेण्यास सक्षम नाही, मुळात तुमची बाजू तितकी महत्त्वाची सुद्धा नाही.”
दरम्यान, उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षा परिषदेच्या निकालात एकूण ८९.५५% उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. मुलींची उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी ९३.४०% आहे, तर मुलांची एकूण उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८६.०५% आहे. दहावीच्या निकालात मुलींनी मुलांना मागे टाकले आहे. प्राची निगमनंतर दुसऱ्या क्रमांकावर सुद्धा दीपिका सोनकर ही विद्यार्थिनी आहे.दीपिकाने सुद्धा ६०० पैकी ५९० गुण मिळवत दुसरा क्रमांक पटकावला आहे.