Pranjali Awasthi Success Story : असं म्हणतात की, जर जिद्द आणि चिकाटी असेल, तर माणूस आयुष्यात सर्व काही प्राप्त करू शकतो. हे खरं करून दाखवलं आहे १६ वर्षांच्या प्रांजली अवस्थी या मुलीनं. प्रांजली अवस्थी या भारतीय मुलीनं कोट्यवधींची कंपनी उभारली आहे. सध्या या मुलीची सगळीकडे चर्चा सुरू आहे. या मुलीविषयी आज आपण सविस्तर जाणून घेऊ या…
एआय कंपनी
प्रांजलीची Delv.AI नावाची कंपनी आहे. या कंपनीची तंत्रज्ञान क्षेत्रात चांगलीच चर्चा सुरू आहे. जानेवारी २०२२ मध्ये तिनं ही कंपनी सुरू केली होती. या कंपनीद्वारे ती उपलब्ध असलेली ऑनलाइन विशिष्ट माहिती कमी वेळात लोकांना शोधून देते.
प्रांजलीच्या या कंपनीत १० लोक काम करतात आणि ती त्यांना चांगला पगार देते. या १० लोकांचं नेतृत्व करणाऱ्या प्रांजलीला कोडिंग, ऑपरेशन व कस्टमर सर्व्हिस यांसारख्या अनेक गोष्टींचं ज्ञान आहे. प्रांजलीच्या कंपनीला जवळपास ३.७ कोटींचा फंड मिळाला आहे. तिच्या कंपनीचं सध्याचं नेटवर्थ १०० कोटी रुपये आहे.
हेही वाचा : दागिने खरेदी : हौस, प्रतिष्ठा की आर्थिक गुंतवणूक? समजून घ्या नाण्याची दुसरी बाजू
कोण आहे प्रांजली?
प्रांजली अवस्थी ही १६ वर्षांची मुलगी एक भारतीय आहे. लहानपणापासूनच प्रांजलीला तंत्रज्ञानामध्ये खूप आवड होती. हीच आवड तिनं जोपासली. प्रांजली तिच्या यशाचं श्रेय वडिलांना देते. तिच्या वडिलांनी खूप लहान वयात प्रांजलीला कॉम्प्युटर सायन्सविषयी सांगितलं. प्रांजली जेव्हा सात वर्षांची होती तेव्हा ती संगणक प्रोग्राम शिकली.
वयाच्या १३ व्या वर्षी तिनं फ्लोरिडा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये इंटर्नशिप केली. येथे तिनं मशीन लर्निंग प्रकल्पांवर काम केलं. यादरम्यान प्रांजलीनं डेटावर संशोधन केलं आणि यातून तिला एआयद्वारे अनेक समस्या सोडवता येऊ शकतात, याचा अंदाज आला. त्याच विश्वासानं तिनं वयाच्या १५ व्या वर्षी Delv.AI नावाची कंपनी सुरू केली.