महिलांमध्ये बुद्धीचातुर्य, सहानुभूती आणि परोपकार वृत्ती रक्तातच असते. त्यामुळे स्वतःच्या बळावर उभं राहिल्यानंतर त्या इतरांनाही पुढे येण्यास, समाजातील दुर्लक्षित घटकांना मूळ प्रवाहात येण्यासाठी मदत करतात. देशातील अनेक महिलांनी कोट्यवधींची मदत आतापर्यंत केली आहे. या महिलांमध्ये रोहिणी नीलेकणी यांचंही नाव आदराने घेतलं जातं. इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन नीलेकणी यांच्या त्या पत्नी असून Top 10 of Hurun’s top Philanthropist यादीत रोहिणी नीलेकणी यांचा समावेश आहे. तसंच, या यादीतील त्या एकमेव महिला आहेत. त्यांनी १७० कोटी रुपयांची देणगी दिली आहे. डीएनए या वृत्तस्थळाने याविषयी वृत्त दिले आहे.
समाजातील समस्या दूर करण्याकरता देशातील श्रीमंत व्यक्तींनी पुढाकार घेऊन अधिक प्रयत्न केले पाहिजेत, असं नीलेकणी म्हणाल्या होत्या. तसंच, प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरन बफे आणि बिल गेट्स यांनी सुरू केलेल्या कार्यक्रमात भारतीयांच्या कमी सहभागावरूनही त्यांनी टीका केली होती. वॉरन बफे आणि बिल गेट्स यांच्या या संस्थेतील सदस्य धर्मादाय कारणांसाठी दान करतात.
हेही वाचा >> Poonam Gupta : १ लाखात उभारली ८०० कोटींची कंपनी, वाचा महिला उद्योजिकेची प्रेरणादायी कहाणी
रोहिणी नीलेकणी या त्यांच्या परोपकारी (Rohini Nilekani Philanthropies) संस्थेच्या सध्याच्या प्रमुख आहे. त्या कादंबरीकार असून त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात पत्रकार म्हणून केली होती. भारतातील आघाडीच्या वृत्तपत्र आणि मासिकांत त्यांनी लिखाण केलं आहे. त्यांनी ना – नफा शैक्षणिक व्यासपीठ EkStep ची स्थापना केली असून Pratham Books या कंपनीच्या त्या सह संस्थापक आहेत. स्वच्छ पाणी आणि स्वच्छतेला प्रोत्साहन देणाऱ्या राष्ट्रीय उपक्रमांना मदत करण्यासाठी त्यांनी अर्घ्यम फाउंडेशनचीही स्थापना केली आहे.
रोहिणी नीलेकणी कोण आहेत?
रोहिणी या मूळच्या मुंबईच्या असून त्या अत्यंत मध्यमवर्गीय कुटुंबात वाढल्या आहेत. त्यांचे वडील अभियंता होते तर आई गृहिणी होती. रोहिणी यांनी एल्फिस्टन कॉलेजमधून फ्रेंच साहित्यात पदवी मिळवली आहे. नंदन नीलकेणी यांनी इतर सहा संस्थापकांसह इन्फोसिसची स्थापना केली. त्याचकाळात नंदन नीलकेणी आणि रोहिणी नीलकेणी १९८१ साली विवाहबंधनात अडकले. रोहिणी नीलकेणी यांनी इन्फोसिसमध्ये १० हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यांच्याकडे त्यावेळी १० हजार रुपयेच होते. परंतु, त्यांच्या या गुंतवणुकीमुळे इन्फोसिसच्या स्थापनेसाठी आधार मिळाला. त्यामुळे महिलांनी बचत करून गुंतवणूक करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे, असं त्या सल्ला देतात.
रोहिणी स्वतःला स्त्रीवादी म्हणवतात. तसंच, महिला गंभीर सामाजिक समस्या हाताळू शकतात आणि त्यांच्या कार्याद्वारे समाजावर सकारात्मक प्रभाव टाकू शकतात, अशीही रोहिणी यांची धारणा आहे. हवामान बदल, शिक्षण आणि पाणी यासारखे मुद्दे रोहिणी यांनी निवडले आहेत, ज्यावर आपल्या देशात तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. तसंच, अनेक गृहिणी कुटुंबाप्रती देत असलेल्या योगदानाकडे दुर्लक्ष करतात. गृहिणी त्यांच्या कामांना कमी लेखतात, परंतु ही मानसिकता बदलण्याची गरज असून महिलांनी त्यांच्या कार्याचा आणि योगदानाचा अभिमान बाळगण्याची गरज आहे, असंही त्या म्हणतात.