मदतकार्यासाठी जागतिक मॅरेथॉनमध्ये सहभागी झाली ४८ वर्षीय ज्येष्ठ सैन्याधिकारी सॅली ऑरेंज. सॅल्सबरी विल्टशायर इथल्या सॅली ऑरेंज हिने अलिकडेच अंटार्क्टिका, केप टाऊन, पर्थ, दुबई, माद्रिद, फोर्टालेझा आणि मियामी येथे झालेल्या जागतिक मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता. हे खडतर आव्हान पूर्ण करत असताना सॅलीने मानसिक स्वास्थ्यासाठी काम करणाऱ्या धर्मादाय संस्थांच्या मदतीसाठी तब्बल दहा हजार डॉलर्सहून अधिक निधी उभारला. सात दिवसांमध्ये सातही खंडात आयोजिलेल्या या सात मॅरेथॉन धावताना सॅलीने विविध फळे, भाज्या यांनी सजलेली आकर्षक वेशभूषा केली होती. ह्या वेशभूषेमागचा उद्देश स्पष्ट करताना सॅली म्हणते, हिरवीगार वेशभूषा पाहून लोकांच्या चेहऱ्यावर प्रसन्न हसू उमटेल आणि त्याद्वारे मानसिक आरोग्याविषयी लोकांच्या मनात जागरूकता निर्माण होईल, अशी आशा वाटते.
हेही वाचा- स्पेनचा ऐतिहासिक निर्णय! मासिक पाळीच्या काळात सुट्टी देणारा ठरला पहिला युरोपियन देश
जागतिक स्तरावरील आव्हानात्मक मॅरेथॉन धावून पूर्ण करणारी सॅली ही ४८ वर्षीय पहिली ज्येष्ठ सैन्य अधिकारी आणि पाचवी ब्रिटीश महिला आहे. एकूण १६८ तासांमध्ये तिने १८३ मैल ( २९५ किमी ) अंतर धावून पूर्ण केले असून त्यातील ६८ तास हवेतून प्रवास करण्यात घालवले. अवकाशातल्या तेवढ्याच वेळात तिला झोपण्याची संधी मिळाली. या सात दिवस सात खंडातल्या सात मॅरेथॉनमधे धावणे वाटते तेवढे सोपे नव्हते. हवामान, तापमानातील वेगवेगळे बदल, जेटलॅग यासारख्या अडचणी तर होत्याच शिवाय यातल्या शेवटच्या तीन मॅरेथॉन तर केवळ ३६ तासांत धावणे अपेक्षित होते. अशा विविध अडथळ्यांतून सॅलीने हे आव्हान पूर्ण केले. परिस्थितीची आव्हाने कमी होती की काय म्हणून मॅरेथॉन धावताना अचानकपणे सॅलीच्या पोटात दुखायला लागले. माद्रिदला असताना तिला हा त्रास सुरू झाला. यामुळे अक्षरशः ती रडकुंडीला आली, नव्हे रडलीच. आत्यंतिक वेदनांनी बेजार होऊन रडतच ती ८ मैल धावत होती. रडल्यामुळे तिच्या शरीरातील पाण्याचा अंश कमी होऊन तिला निर्जलीकरणाचा त्रासही झाला. ह्या अनुभवाविषयी ती म्हणते, की ही जणूकाही माझ्या भावनिक, मानसिक स्वास्थ्याची सत्त्वपरीक्षाच होती. अशाही परिस्थितीत मी माझा संघर्ष सोडला नाही, हे मी लोकांना सांगू इच्छिते. कदाचित लोक ऐकलं न ऐकल्यासारखं करतील, पुढे निघून जातीलही. कारण अशा परिस्थितीत काय करावे हे लोकांना माहीत नसतं.
हेही वाचा- शी इज अनस्टॉपेबल : भारतीय नौदलातील महिलांची अनोखी जनजागृती मोहीम
सॅली म्हणते, की जे आव्हान तिने स्वीकारले आहे त्याच्याशी प्रामाणिक राहणं हे सर्वात महत्त्वाचे होतं आणि ती आव्हानांशी झुंजते आहे हे लोकांनी पाहिलं पाहिजे, म्हणजे असा संघर्ष करणारे ते एकटे नाहीत हे त्यांना कळेल. इन्स्टाग्रामसारख्या माध्यमांवर जग सुंदर सुंदर गोष्टींनी भरलेलं आहे, असं जे दिसतं तसं खरंच आयुष्य नसतं. दुकानासमोर उभं राहून तिथल्या गोष्टींची तुमच्याशी तुलना करण्यासारखं आहे हे. प्रत्यक्षात आतून- बाहेरून गोष्टी कशा आहेत, याबद्दल तिथे कुणी बोलतच नाही, असं ती स्पष्ट सांगते. मॅरेथॉनचे आव्हान स्वीकारण्यापूर्वी काही महिने सॅली ऑरेंजच्या पायाला फ्रॅक्चर झालं होतं. त्याचा ताण पायांवर होताच. यामुळेही परिस्थिती थोडी बिकट झाली होती. त्याचवेळी कुणीतरी म्हणालं होतं, की हे फ्रॅक्चर आत्ताच झालं हे एका अर्थी बरंच झालं, भाग्यवान आहेस तू. दोन आठवड्यांपूर्वी झालं असतं तर… आणि तिला त्याक्षणी इतरांची अवस्था आठवली.
हेही वाचा- नातेसंबंध: एकत्र राहून कोंडमारा होतोय?
दुबईमधली मॅरेथॉन ३५ अंश सेल्सिअस तापमानात धावावी लागली. त्याबद्दल सॅली म्हणते, तेव्हा तर मी दिव्यांच्या खांबांवरती लक्ष केंद्रित केलं होतं. दोन दिव्यांच्या खांबांदरम्यान धावायचं आणि एका खांबाच्या सावलीत चालायचं, असं तत्त्वं ठेवलं. खरंतर मला त्याचं वाईट वाटलं होतं. लोकांना चालायला आवडेल, असा विचार करून मी माझ्या मनाचीच जणू काही समजूत घालत होते. या संपूर्ण आव्हानात्मक मॅरेथॉनमधे मला कणभरही दुःखं, खंत, खेद असं काहीही वाटलं नाही. किंबहुना, यामध्ये सहभागी होणं, आव्हानांचा सामना करत आगळीवेगळी मॅरेथॉन पूर्ण करणं ह्यासारखी भाग्याची दुसरी गोष्टच नाही, हे मला ठाऊक होतं. मियामीमधील तिची शेवटची मॅरेथॉन ही तिच्या आजवरच्या मॅरेथॉनमधील ऐंशीवी होती. उत्तर ध्रुवावर मॅरेथॉन धावण्याच्या पुढील आव्हानापूर्वीचा जेटलॅग पार करण्यासाठी ती उत्सुक असल्याचंही सॅलीने म्हटलं आहे.
सध्या मानसिक विकार खूप वाढले आहेत, असे देशांतर्गत आणि जगभरातील विविध सर्वेक्षणांमध्ये लक्षात आले आहे. करोनाकाळात तर मानसिक विकारांची संख्या अनेक पटींनी वाढली. अशा वेळेस त्याकडे लक्ष वेधण्यासाठी आणि त्या मानसिक उपचारांसाठी निधी उभारणी करण्यासाठी सॅलीने ही आगळीवेगळी मॅरेथॉन मोहीम एकट्याच्या बळावर एकांड्या शिलेदाराप्रमाणे यशस्वीही करून दाखवली! सॅलीला सॅल्यूट!