53 Year Old Pune Women Microsoft AI Freelancing: कामाला, अभ्यासाला व कलेला वय नसतं असं म्हणतात. या तिन्ही गोष्टी एकत्र सांधून पुण्यातील एका महिलेने चक्क मायक्रोसॉफ्टसह फ्रीलान्सिंगचे काम हाती घेतले आहे. महाराष्ट्रातील खराडी येथील ५३ वर्षीय बेबी राजाराम बोकले या मायक्रोसॉफ्ट एआय टूल्सच्या मराठीच्या शिक्षिका झाल्या आहेत. या कामासाठी त्यांना थोडेथोडके नव्हे तर तासाला तब्बल ४०० रुपये दिले जातात, मागील ११ दिवसात हे काम करून त्यांनी २००० रुपये कमावले आहेत. ‘कार्य’ नावाच्या समाजकार्य करणाऱ्या संस्थेने मराठीत एआय मॉडेल्सचे प्रशिक्षण देण्यासाठी मायक्रोसॉफ्टशी भागीदारी केली आहे त्याअंतर्गत बोकले यांनी या कामाची सुरुवात केली आहे.
मसाले दळण्यापासून ते AI शिकवण्यापर्यंतचा प्रवास..
बेबी बोकले यांचा मसाले आणि मिरची दळण्याचा छोटासा व्यवसाय आहे. एआय टूल्सला मराठी शिकवण्याचे काम करण्याआधी त्या दिवसभर आपली मसाल्यांची गिरणी चालवतात. या मराठी शिकवण्याच्या कामातून मिळणारे पैसे सुद्धा त्या आपल्या व्यवसायासाठी वापरतात. बोकले यांनी सांगितले की, “मी एआयच्या कामातून जे पैसे मिळवले ते मशीनचे भाग विकत घेण्यासाठी आणि ग्राइंडर दुरुस्त करण्यासाठी वापरले.”
दिवसभर काम केल्यानंतर, बोकले त्यांच्या फोनवर एक तास काम करतात. त्यांनी मायक्रोसॉफ्टशी बोलताना आपल्या कामाविषयी सांगितले की, “मला खरोखर अभिमान आहे की माझा आवाज रेकॉर्ड होत आहे, आणि कोणीतरी माझ्या आवाजामुळे मराठी शिकणार आहेत. हे टूल्स आणि फीचर वेगवेगळी माहिती मराठीत उपलब्ध करून देत आहेत याचा मला अभिमान आहे.”
बोकले पुढे सांगतात की, एआय टूल्सला मराठी शिकवताना केवळ अतिरिक्त कमाईच नाही तर नवीन गोष्टी शिकण्यासही मदत झाली आहे. माहिती रेकॉर्ड करताना जेव्हा मी ती माहिती स्वतः वाचते तेव्हा माझ्या ज्ञानातही भर पडते. उदाहरणार्थ, बँका कशा काम करतात? बचत कशी करायची? घोटाळे व फसवणूक यापासून कसे सावध राहायचे? हे सगळे विषय समजून घेताना या कामाची मदत होते. मी स्वतः आता मोबाईलवर युपीआय पेमेंट कसे वापरायचे हे शिकले आहे, या कामामुळे माझ्याच फोनची मला नव्याने ओळख होतेय.” मायक्रोसॉफ्टने एका ब्लॉगमध्ये म्हटल्याप्रमाणे विविध विषयांवरील माहिती मनोरंजक पद्धतीने व सोप्या शब्दात मांडण्यासाठी हा प्रयत्न आहे.