Republic Day 2024: भारतात दरवर्षी २६ जानेवारीला मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा होतो. यावर्षी भारत ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा होणार आहे. शाळा, महाविद्यालयांपासून ते सरकारी कार्यालयांपर्यंत प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक कार्यक्रम ठेवण्यात येतात. तर यावर्षी ७५ वा प्रजासत्ताक दिन महिला केंद्रित असणार आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीत होणारी परेड म्हणजे आपल्या देशाच्या सामर्थ्याचं दर्शन असतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काल १९ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत, संरक्षण सचिव गिरीधर अरमाणे यांनी या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त यंदा महिलांची भूमिका खास असणार असे सांगत कार्यक्रमातील काही खास गोष्टी पुढीलप्रमाणे नमूद केल्या आहेत. २६ जानेवारी २०२४ रोजी कर्तव्यपथ येथे होणारी ७५ वा प्रजासत्ताक दिन परेड, ‘विकसित भारत’ आणि ‘भारत लोकतंत्र की मातृका’ या महिला केंद्रित थीमसह उल्लेखनीय कार्यक्रम होणार आहे. या परेडची सुरुवात १०० महिला कलाकारांच्या एका खास कार्यक्रमाने होईल, ज्यामध्ये भारतीय वाद्यांसह त्या स्वतःचे संगीत कौशल्य दाखवतील.

७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे सर्व महिलांची तिरंगी सेवा दल (Tri-Service contingent). प्रजासत्ताक दिनाच्या इतिहासातील तिरंगी सेवा दल ही पहिल्यांदाच घडणारी घटना असणार आहे. या परेडमध्ये केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPF) यांच्याबरोबर महिला कर्मचारीदेखील सहभागी असतील; जी भारतीय महिलांच्या सामर्थ्य आणि क्षमतांचा खऱ्या अर्थाने उत्सव आणि प्रतिनिधित्व करणारी एक खास परेड ठरेल. तर यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महिलांचे उत्कृष्ट प्रतिनिधित्व पाहायला मिळणार आहे. हा कार्यक्रम सकाळी १०:३० वाजता सुरू होणार आहे. तसेच अंदाजे ९० मिनिटांच्या कालावधीसाठी ही परेड असणार आहे. कार्यक्रमासाठी ७७ हजार लोकांसाठी बसण्याची व्यवस्था केली असून त्यापैकी ४२ हजार जागा सर्वसामान्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

हेही वाचा…आधी डॉक्टर अन् मग IAS अधिकारी! वाचा ‘डॉक्टर तनू जैन’ यांची प्रेरणादायी कहाणी…

याव्यतिरिक्त कोणते कार्यक्रम होणार आहेत यावर एक नजर टाकूयात :

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना या भव्य सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. जे भारत आणि फ्रान्समधील राजनैतिक संबंधांचे प्रतिबिंब आहेत. याव्यतिरिक्त सुमारे १३ हजार विशेष पाहुण्यांना परेडचे साक्षीदार होण्यासाठी आमंत्रित केले आहे.

या परेडमध्ये आणखीन एक खास गोष्ट म्हणजे सांस्कृतिक मंत्रालयाने केलेले ‘अनंत सूत्र – द एंडलेस थ्रेड’ टेक्सटाइल इन्स्टॉलेशन. ही स्थापना पूर्वीच्या भारतीय साड्यांना श्रद्धांजली अर्पण करते. देशाच्या कानाकोपऱ्यातून सुमारे १,९०० साड्या आणि ड्रेपिंग वैशिष्ट्य असलेले हे भारतातील विणकाम आणि भरतकाम कलांचे आश्चर्यकारक प्रदर्शन असणार आहे. इन्स्टॉलेशनवरील QR कोड प्रेक्षकांना प्रत्येक वैशिष्ट्यांचा तपशीलांमध्ये अधिक माहिती जाणून घेण्याची संधी देतील.

विशेष नाणी आणि टपाल तिकिटे :

७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त एक विशेष स्मरणार्थी नाणे आणि स्मरणार्थी स्टँम्प (टपाल तिकिटे) जारी करणार आहे, ज्यामुळे या सोहळ्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त होईल. तसेच शिक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेत ३० विविध राज्ये, केंद्रशासित प्रदेशातील ४८६ शालेय बँडचा सहभाग आहे. शालेय मुलांमध्ये देशभक्ती आणि अभिमानाची भावना जागृत करून प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान निवडक १६ बँड सादर करण्यात येतील.

२३ ते ३१ जानेवारी असणार प्रजासत्ताक दिनानिमित्त खास कार्यक्रम :

२३ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत लाल किल्ल्यावर आयोजित केलेल्या ‘भारत पर्व’मध्ये प्रजासत्ताक दिनाची तबकडी, लष्करी बँड परफॉर्मन्स, सांस्कृतिक कार्यक्रम, हस्तकला आणि विविध प्रकारच्या पाककृतींचे प्रदर्शन होईल. ‘जन भागीदारी’ थीमला प्रतिबिंबित करणारा हा कार्यक्रम सर्व स्तरातील लोकांना सहभागी करून घेण्याचा उद्देशाने ठेवण्यात आला आहे. २३ जानेवारी २०२४ रोजी लाल किल्ल्यावर पराक्रम दिवसाच्या निमित्ताने (Parakram Diwas) नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मरणार्थ एक कार्यक्रम होईल. हा कार्यक्रम 3-डी प्रोजेक्शन मॅपिंग, प्रकाश आणि ध्वनी शो आणि नाटक, नृत्य सादरीकरणासह एक भव्य देखावा असेल.

तसेच http://www.e-invitation.mod.gov.in ही अधिकृत वेबसाइट देशाचा राष्ट्रीय कार्यक्रम सर्व भागांतील लोकांना पाहता यावा यासाठी तयार केली आहे. तसेच काही जणांना यादरम्यान ई-आमंत्रणे देखील पाठवण्यात आली आहेत. ज्यामुळे विविध मान्यवरांना आमंत्रणे सुरक्षित आणि पेपरलेस अगदी सहज पाठवता येतात. प्रजासत्ताक दिन परेडची तिकिटे MSeva मोबाइल ॲपद्वारे बुक केली जाऊ शकतात.

नागरिकांसाठी खास सोय :

उपस्थितांच्या सोयीची खात्री करून, प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे साक्षीदार होण्यासाठी मोफत पार्क आणि राइड आणि मेट्रो सुविधा पुरवल्या जाणार आहेत. २६ जानेवारी २०२४ रोजी संध्याकाळी ४ वाजल्यापासून मेट्रो सर्वांसाठी सुरू करण्यात येईल. इथे अतिथी आणि तिकीटधारक त्यांचे आमंत्रण किंवा तिकीट प्रदर्शित करून या सुविधेचा विनामूल्य लाभ घेऊ शकतात. याशिवाय, जेएलएन स्टेडियम आणि पार्किंग परिसरातून मोफत पार्क आणि राइड बसचासुद्धा लाभ घेऊ शकतात.

पारंपरिक प्रथेचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ जानेवारी २०२४ रोजी नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी एका मेळाव्याचे आयोजन करतील. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याशी संबंधित उपस्थितांमध्ये एनसीसी कॅडेट्स (Cadets) , एनसीसी स्वयंसेवक,टेबलॉक्स कलाकार, आदिवासी पाहुणे आणि इतरांचा समावेश असेल. २७ जानेवारी २०२४ रोजी करिअप्पा परेड ग्राउंड, दिल्ली कॅंट येथे नियोजित पीएम यांच्या एनसीसी (NCC) रॅलीमध्ये नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC) च्या विविध उपक्रमांचे प्रदर्शन दाखवले जाईल. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी या उपक्रमांचा आढावा घेणार आहेत.

तसेच २९ जानेवारी २०२४ रोजी भारतीय लष्कर, भारतीय नौदल, भारतीय वायुसेना आणि भारतीय वायुसेनेच्या अखिल भारतीय यांचा एक खास कार्यक्रम असेल. या कार्यक्रमाला केंद्रीय सशस्त्र पोलिस दल, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपाध्यक्ष जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांसह प्रतिष्ठित प्रेक्षक साक्षीदार असतील.

खास गोष्ट अशी की, यादरम्यान एक ऑनलाइन स्पर्धा सुरू करण्यात येणार आहे, जी लोकांना सैनिकांचे बलिदान आणि देशभक्ती दर्शविणारी भारतीय गाणी गाण्याची किंवा वाजवण्याची परवानगी देणार आहे. उत्साही आणि इच्छुक सहभागी त्यांचे सादरीकरण MyGov वर अपलोड करू शकतात. तसेच निवडक लोकांना बक्षीसही दिले जाईल.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 75th republic day parade open performance by 100 women artists musical prowess with indian instruments asp
First published on: 20-01-2024 at 19:06 IST