श्रद्धा कोळेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मला माहितही नव्हतं की पेन उलटं कसं धरतात आणि सरळ कसं! पहिल्यांदा पुस्तक हातात घेतलं तेव्हा हात कापत होते, पण माझ्या मनात मात्र आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या…’ ९२ वर्षांच्या खान आजी जेव्हा हा अनुभव सांगतात तेव्हा खरोखरच त्यांना झालेला आनंद हा शब्दांत मावणारा नसतो.

उत्तर प्रदेशमधील बुंदलशहर येथील चाळी गावच्या सलीमा खान या वयाच्या ९२ व्या वर्षी ‘साक्षर’ झाल्यात. साधारण वर्षभरापूर्वी त्यांनी शाळा शिकायला सुरुवात केली. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचं लग्न झालं होतं. त्या काळी महिलांना फारसं शिकवलं जात नसे. त्यातच गावात शाळा नसल्यानं शिक्षण कठीणच होतं. लहानपणीची ती शिकण्याची इच्छा अपूर्ण राहिली, ही खंत खान आजींना अनेक दिवस आतल्या आत खात होती. त्यातच आता त्यांच्या घरासमोरच शाळा होती! रोज तिथल्या मुलांचा अभ्यास करताना, मजा-मस्ती करतानाचा आवाज यायचा. त्या सांगतात, ‘रोज या मुलांच्या आवाजानंच माझी सकाळ व्हायची.’ आपल्या नातवंडांना शाळेत जाताना पाहिल्यावर मात्र त्यांना शिक्षण घेण्याची इच्छा स्वस्थ बसू देईना. एक दिवस त्यांनी धाडस केलंच. ‘मला पण शिकवाल का?’ अशी विनंती आपल्या नातवंडांच्या शाळेतल्या बाईंना त्यांनी केली. या मुलांबरोबर म्हाताऱ्या आजींना कसं शिकवायचं, असा विचार प्रथम शिक्षकांच्या मनात आला, पण आजींची इच्छा पाहून त्यांना वर्गात बसून शिकण्याची परवानगी शिक्षकांनी दिली.

आज जेव्हा आजींचा एक ते शंभर पर्यंतचे अंक म्हणतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला, तेव्हा त्यांचं कौतुक झालेलं पाहून शिक्षकांना आणि आजींच्या नातवंडांनादेखील खूप आनंद होतोय!

याबाबत सांगताना आजी म्हणतात, ‘सकाळी उठवून मला शाळेत घेऊन जाण्याचं काम माझ्या सुना-नातवंडांना करावं लागे! पण आज त्या त्रासाचं काहीच वाटत नाही. मी माझी सही माझ्या हातानं करू शकतेय आणि माझं नावदेखील लिहू शकते.’ त्या गंमतीनं म्हणतात… ‘पूर्वी माझी नातवंडं मला पैसे मोजता येत नसल्यानं माझ्याकडून खाऊला जास्त पैसे घ्यायची. पण आता ते शक्य नाही!’ ‘शिकण्यानं माझं काही नुकसान तर होणार नाहीये, मग शिकलं तर कुठे बिघडलं, हा विचार करून मी शिकण्याचा निर्णय घेतला,’ असं आजी आवर्जून सर्वांना सांगतात.

आजींनी नुकतीच ‘साक्षर भारत अभियानां’तर्गत परीक्षा दिली आणि निकालात आजींना ‘साक्षर’ म्हणून जाहीर करण्यात आलं. हा त्यांच्या एकूणच कुटुंबासाठी खूप आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असल्यानं कुटुंबीय सांगतात.

इतकंच नाही, तर आजींच्या साक्षरतेचा प्रवास पाहून शिक्षणापासून दूर राहिलेल्या त्यांच्या गावातल्या जवळपास २५ महिला शिकण्यासाठी पुढे आल्या आहेत. मजा म्हणजे त्यामध्ये त्यांच्या दोन सुनादेखील आहेत. आता त्यांच्यासाठी विशेष वर्ग गावात भरवले जाणार आहेत.

काहीही नवीन पाहिलं, ऐकलं की लोक घाबरतात. ‘तुम्ही सुरुवात करा, आम्ही मागे आहोत’ असं म्हणणारे अनेक जण असतात. पपण स्वत: पुढे होत नाहीत. आपणा ‘चतुरां’चंही अनेक बाबतीत असं होतच असेल की… अगदी साधी, चांगली इच्छा, जी चेष्टा होण्याच्या भीतीनं, लोक काय म्हणतील या भीतीनं आपणच हाणून पाडतो. कधी आजूबाजूचे ती मोडीत काढतात आणि आपण विरोध करू शकत नाही. मग कालांतरानं ती इच्छा आपसूकच मरून जाते…

म्हणून आजीचं कौतुक! त्यांनी ‘मला शिकायचं आहे’ ही इच्छा सांगण्याचं या वयात तरी धाडस केलं. त्यानंतर कौतुक कुटुंबीयांचं- सुनांचं, नातवंडांचं. त्यांनी आजींची इच्छा ऐकली आणि त्यावर काम केलं. त्यांना शाळेपर्यंत पोहोचवलं. आणि अर्थातच कौतुक शिक्षकांचंही! आणि हो, कौतुक त्या वर्गातल्या मुलांचंही, ज्यांनी आजींच्या शिकण्यात आपला वाटा दिला. त्यामुळे आजींचं हे यश फक्त त्यांच्यापुरतं मर्यादित न राहता सर्वांचं झालं!

lokwoman.online@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 92 year old literate grandmother khan chachi asj
Show comments