आरती कदम
पावसाचा उभाआडवा तडाखा चालू असताना आणि सगळ्यांना त्याने वेठीला धरलं असतानाच आलेली कल्याण रेल्वे स्टेशननजीक पत्री पुलाजवळच्या नाल्यात चार महिन्याचं बाळ, मुलगी पडल्याची बातमी काळीज चर्र करून जाणारीच आहे. अति पावसाचा असा फटका त्या बाळाच्या आईला आयुष्यभरासाठी भळभळती जखम देणारा ठरलाय. बाळ पाण्यात पडून आता दोन दिवस उलटलेत. शोधकार्यही थांबवलं गेलंय. तरीही तिच्या हृदयानं ठाव सोडला असेल का? की अजून वाट पाहात असेल ती आपल्या बाळाची?
या अस्वस्थ घटनेने आठवली ती गुलजार यांची अशीच अस्वस्थ करणारी कथा ‘रावीपार’. आयुष्यभरासाठी आईसाठी भळभळती जखम देऊन गेलेली. भारताला स्वातंत्र्य मिळण्याचा तो काळ. भारत-पाकिस्तानाच्या विभागणीमुळे पाकिस्तानातले अनेक जण आपल्या मायदेशी, भारताकडे निघाले. भरगच्च गर्दीतल्या गाडीत दर्शनसिंग, त्याची बायको शहाना आणि नुकत्याच जन्मलेल्या जुळ्या बाळांना कशीबशी गाडीच्या टपावर बसायला जागा मिळालेली. काही तासांचा प्रवास अमर्याद काळात बदललेला. दोन पोटलीत दोन्ही बाळांना बांधलेलं. कधी एका बाळाला पाजत तर लगेच दुसऱ्या बाळाला पाजत शहाना नवं आईपण अनुभवतेय. थकून गेलीय बिचारी. गाडी थांबत-चालत निघालीय. भीतीचा माहौल सर्वत्र. लाहोर गेलं, की भारत आलच म्हणून समजा, गाडीतले सहप्रवासी एकमेकांना दिलासा देताहेत. ‘हर हर महादेव’, ‘जो बोले सो निहाल’च्या घोषणा वातावरणाला अधिकच गंभीर करताहेत. एवढ्यात दर्शनसिंगच्या लक्षात येतं, आपलं एक बाळ तर श्वास घेतंय. पण दुसरं गार पडलंय. काहीच हालचाल करत नाहीए. नशिबाला दोष देत तो गप्प होऊन जातो. प्रवास सुरुच आहे. आणि रावी नदी येते. एक जण दर्शनसिंगच्या कानात कुजबुजतो, ‘त्या बाळाला कुठे घेऊन जाताय. रावीतच सोडून द्या त्याला.’ खरंच. मृत बाळ कुठे नेणार. हिय्या करत दर्शनसिंग बाळाची पोटली उचलतो आणि नदीत फेकून देतो. बाळाचा किंचीत हुंकार ऐकू येतो आणि दर्शनसिग चरकतो. तो शहानाकडे पाहातो तर शहाना आपल्या मृत बाळाला छातीशी लावून बसलेली…
कालच्या घटनेतल्या त्या मुलीच्या आजोबांचीही हीच काहिशी अवस्था झाली असेल ना. आपल्या हातातलं जिवंत बाळ नदीच्या पात्रात पडल्यानंतर जे काही त्यांना वाटलं असेल त्याची कल्पनाच करवत नाही. कधीही परत न येण्यासाठी वाहून गेलेल्या, हरवलेल्या त्या बाळाची कायम प्रतीक्षा राहील?
पण जेव्हा एखादी गोष्ट हरवते, तेव्हा दुसरी सापडते, हा निसर्ग नियम! अर्थात इथे दोन्ही बाळांच्या परिस्थितीची तुलना होऊ शकणार नाही तरीही, इथं एक बाळ हरवलंय, तर दुसरीकडे एक बाळ सापडलंय. हे सापडलेलं महिनाभराचं बाळ आज सुखानं श्वास घेतंय, घाटकोपरच्या मुंबई महानगरपालिकेच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये, तेही डॉक्टर आणि नर्सेसच्या खास देखरेखीखाली. या बाळाच्या जगण्यानं सगळे खूश आहेत, म्हणून ‘ती’ आता झालीय ‘खुशी’! पवईमध्ये १२ जूनच्या पहाटे कुण्या वाटसरूला एका कचरापेटीत एक बाळ दिसलं. काळजी वाटून त्यानं पाहिलं, तर खरंच एक बाळ त्यात पडलं होतं. रडूही शकत नव्हतं, इतकं कृश होतं ते. नुकतंच जन्माला आलं असावं, कारण बाळाची नाळही कापली गेलेली नव्हती. त्यानं ते बाळ उचललं नि पवई पोलीस ठाण्यात आणलं. इतकं नाजूक बाळ वाचवायला हवंच म्हणून त्याला तातडीनं राजावाडी रुग्णालयात आणलं गेलं. आता ते बाळ काळंनिळं पडू लागलं होतं. ‘बाळ जगेल ना?’ या प्रश्नाचं उत्तर शोधायचा विचारही न करता डॉ. अमित वटकर आणि त्यांच्या टीमनं त्या बाळाला उचललं नि थेट अर्भकांसाठीच्या उष्णपेटीत ठेवलं काही काळ. मग सुरू केले अथक प्रयत्न त्या बाळाला काहीही करून वाचवायचंच यासाठीचे…
रुग्णालयात त्या बाळाला आणलं तेव्हा एकूण अवस्थेवरून ते त्या कचरापेटीत २-३ तासांपूर्वीच कुणी तरी आणून टाकलं असावं असा अंदाज बांधता येत होता. बाळाला अर्भकांसाठीच्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं. ३१ आठवड्यांचं आणि १.४ किलो वजनाचं ते आनंदाचं गाठोडं आता सुरक्षित हातात होतं. दिवसामाजी बाळ वाढू लागलं आणि गेल्या महिनाभरात ते २.२ किलोंचं झालं आहे. रुपसा चक्रवर्ती यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये लिहिलेल्या (२० जुलै) या बातमीत म्हटलं आहे, की रुग्णालयात आणल्यानंतर पाच दिवसांनंतर ‘खुशी’नं पहिल्यांदा डोळे उघडून सगळ्यांकडे बघून छानसं कळत-नकळतसं स्मित केलं, तो क्षण तिची काळजी घेणाऱ्या नर्स साधना पाटील आणि संपूर्ण टीमसाठीच आनंदाचा क्षण होता. रुग्णालयातीलच मिल्क बँकेच्या व्यवस्थापक डॉ. स्वाती एकनाथ यांनी सांगितल्याप्रमाणे, नुकत्याच जन्मलेल्या बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आवश्यक मानवी दूधच तिला दिलं जातंय. इतक्या सगळ्या काळजीनंतर साहजिकच आज हे बाळ रुग्णालयात सुखनैव वाढतंय. डॉक्टर वटकरांनी सांगितलंय, की ती पूर्ण बरी झाली की तिलाही दत्तक देण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यासाठी आधी पोलिसांकडे आणि नंतर तिला ‘बाल कल्याण समिती’कडे सोपवलं जाईल. तिथून ती अनाथाश्रमाकडे जाईल आणि तिथून जाईल एखाद्या छानशा घरी, जिथं तिला आई-बाबा तर भेटतीलच, पण कदाचित भावंडंही भेटतील.
महिन्याभराच्या या बाळाचा हा भविष्यातला प्रवास आज तरी गुलदस्त्यात असला, तरी ते बाळ मरता मरता वाचलंय आणि हरवता हरवता सापडलंय हेच खूप खूप आनंदाचं!
lokwomen.loksatta@gmail.com