चूल आणि मूलच्या पलीकडे स्त्रीयांचं जीवनमान उंचावलं असलं तरीही ग्रामीण भागात आजही महिला स्वतःसाठी पुरेसा वेळ काढू शकत नाहीत. त्यांच्यासाठी चुलीसाठी लाकडं गोळा करायला जाणं किवा जनावरांना चारा खायला घेऊन जाणं हाच काय तो त्यांच्या सहेलींसोबत करमणुकीचा वेळ. अन्य वेळात महिला घरगुती कामांत अडकून राहतात. पण याच महिला आता क्रिकेटच्या मैदानात आपलं नशीब आजमावून पाहत आहेत. तुम्हाला खोटं वाटेल पण डेहराडूनमध्ये एका क्रिकेट स्पर्धेत तब्बल ४५ महिला संघांनी सहभाग घेतला. त्यापैकी अनेकजणी म्हणतात की या स्पर्धेत फक्त एक संघ जिंकेल पण हा क्रिकेट सामना पाहणाऱ्या आणि खेळणाऱ्या महिला कधीच जिंकल्या आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
डेहराडूनमधील पौड जिल्ह्यातील फरसानी येथे सहा वर्षांपासून कुंजेश्वर महादेव समिती क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करते. येथे सर्वाधिक गावकरी स्थलांतरीत आहेत. त्यामुळे कामाच्या निमित्ताने या गावातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असतं. परिणामी क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्याकरता पुरुष क्रिकेट खेळाडूच उरले नाहीत. परंतु, यंदा महिलांसाठी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या आयोजनाच्या पहिल्या वर्षांतच महिला खेळाडूंकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.
कुंजेश्वर महादेव समितीचे पदाधिकारी मुकेश रावत म्हणाले, पहिल्याच वर्षी आम्हाला महिला खेळाडूंचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेसाठी ४५ संघांनी अर्ज केले होते. त्यापैकी ३२ संघ निवडण्यात आले आहेत. विजेत्या आणि उपविजेत्यांसाठी अनुक्रमे तीन हजार आणि दीड हजार रुपयांचं पारितोषिक ठेवण्यात आलं आहे. परंतु, काही स्थानिकांनी उत्कृष्ट खेळाडूंना साडेतीन लाख रुपयांचंही बक्षीस जाहीर केलं आहे.
या स्पर्धेत वय वर्षे १४ ते ५० वयापर्यंत महिला खेळतात. यापैकी अनेकींनी याआधी कधी साधी हातात बॅटही उचलली नव्हती. परंतु, तरीही त्यांनी उत्साह दाखवून या खेळात सहभाग घेतला. सात जानेवारीपासून या स्पर्धेला सुरुवात झाली असून या महिन्याच्या अखेरिस अंतिम फेरी होणार आहे. या स्पर्धेत सगळे नवखे खेळाडू असल्याने क्रिकेटच्या नियमांत थोडे बदल करण्यात आले आहेत. एलबीडब्ल्यू, लेग बाय आणि बाय सारखे नियम बाजूला ठेवण्यात आले असून नो बॉल आणि बॉल्सना नियमांत स्थान देण्यात आलं आहे.
फक्त खेळण्यासाठीच नव्हे तर खेळणाऱ्या प्रत्येकीला ऊर्जा देण्याकरता पाहायला येणाऱ्या महिलांचीही संख्या अधिक आहे. टिमली, नैन्स्यून, बैनरो, पुंजोली आणि गुरेदशिलथला सारख्या अनेक दुर्गम भागातून या महिला स्पर्धा पाहण्यासाठी आणि खेळण्यासाठी येतात, अशी माहिती आयोजकांनी दिली.
उत्तराखंड महिला क्रिकेट अंडर १९ संघाची कर्णधार कनक तूप्रनिया टाईम्स इंडियाच्या मुलाखतीत म्हणाली, महिला क्रिकेट स्पर्धा ज्यांनी प्रत्यक्षात राबवली त्यांचे सर्वांत आधी आभार. महिलांना घरातून बाहेर पडण्याची संधी मिळाली आहे. त्यांना स्वतःचा आनंद घेता येत आहे. एकत्र येऊन त्या स्वतःसाठी वेळ देत आहेत. अशा उपक्रमांमुळे देशाला नवे खेळाडूही सापडू शकतात.
ग्रामीण भागात राहणाऱ्या अनेक महिलांसाठी या स्पर्धा म्हणजे खऱ्या अर्थाने ब्रेक आहे. ज्यांच्या आयुष्यात सतत संकटे असतात, ज्यांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही, त्यांना या स्पर्धांमधून उभारी घेता येऊ शकेल. पुंजोलीची रहिवासी करिश्मा देवी म्हणाल्या, नेहमीच्या दिनचर्येतून यामुळे महिलांना विश्रांती मिळणार आहे. या स्पर्धांमुळे केवळ महिला स्वतःची उन्नती पाहत नाहीत तर इतरही अनेक समाजोपयोगी कार्य करतात. त्यांनी खराब रस्त्यांचा प्रश्न निकाली काढला आहे. या स्पर्धेत फक्त संघ जिंकेल पण या स्पर्धेत खेळणारी आणि स्पर्धा पाहणारी प्रत्येक स्त्री केव्हाच जिंकली आहे.
भारतात क्रिकेटचं फार मोठं वेड आहे. क्रिकेटवेडे खेळाडूही भारताकडे आहेत. परतु, महिला क्रिकेटकडे फार कमी पाहिलं जातं. भारतीय महिला क्रिकेट टीमही पुरुष क्रिकेट टीम इतकीच सक्षम आहे. त्याचप्रमाणे देशभरातील विविध जिल्ह्यांत खेळणारे लहान मोठे क्रिकेट संघही उत्तम क्रिकेट खेळतात. यामध्ये आता महिला खेळांडूंचाही समावेश होत आहे. देशातील विविध राज्यात महिलांसाठी क्रिकेट स्पर्धा भरवली जाते. अशा स्पर्धांमुळे महिलांना त्यांच्या नेहमीच्या दिनचर्येतून वेळ काढून स्वतःकरता जगता येतं.