डॉ. राजन भोसले, लैंगिक विज्ञानतज्ञ
कंडोमच्या जाहिराती चहूकडे पाहायला मिळतात. कंडोमचा वापर कसा व कधी करायचा याबाबत मला माहिती नाही. लवकरच माझं लग्न होणार आहे. कंडोमबद्दल मला सर्व माहिती सांगावी. कंडोमचा वापर केल्यास गुप्तरोग होत नाहीत, हे खरं आहे का?
हेही वाचा- वयानुसार महिलांमध्ये युरिक ॲसिड किती असावे? कंट्रोल करण्यासाठी पाहा ‘हा’ सोपा तक्ता
उत्तर : कंडोम हा पुरुषांनी वापरायचा एकमेव गर्भप्रतिबंधक उपाय आहे. कंडोम हा पुरुषाच्या शिश्नाच्या आकाराचा रबराचा एक लांबट फुगा. याच्या टोकाला वीर्य साचलं जाण्यासाठी वेगळी फुगीर अशी बंदिस्त पोकळी असते. कंडोम कडा गुंडाळलेल्या अवस्थेत उपलब्ध असतो. पुरुषांनी शिश्न ताठ असलेल्या अवस्थेत तो शिश्नावर उलगडत न्यावा लागतो. शिश्न शिथल असताना तो शिश्नावर चढवू नये. कंडोम हा अत्यंत तलम अशा रबरापासून बनवलेला असतो; तो वापरल्याने लैंगिक सुखात जराही बाधा येत नाही. कंडोमामुळे वीर्य योनीमार्गामध्ये सांडलं जात नाही व कंडोमच्याच टोकाशी असलेल्या पोकळीत साठून राहतं. या गोष्टीमुळे गर्भधारणा होत नाही. संभोगानंतर शिश्न योनीबाहेर काढताना कंडोम निसटणार नाही व वीर्य योनीमार्गात सांडणार नाही, याची काळजी घ्यावी लागते.
हेही वाचा- विवाह समुपदेशन : सिबलिंग रायव्हलरी… नात्यात नकोच
एरवी शीघ्रपतनाची तक्रार असलेल्या अनेक पुरुषांना एक उपाय म्हणून कंडोमचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो व कंडोमच्या वापराने त्यांची शीघ्रपतनाची तक्रार कमी होते. कंडोममुळे लैंगिक संबंधातून होऊ शकणाऱ्या गुप्तरोगांपासून संरक्षण हाते, असं नेहमी म्हटलं जातं. पण कंडोम वापरूनही एड्स व गुप्तरोगांची लागण झालेली अनेक उदाहरणं आजकाल पाहायला मिळू लागली आहेत. कंडोम फाटला जाण्याचा प्रकार क्वचित घडू शकतो. काहीजण एकावर एक असे दोन कंडोम वापरतात. असं केल्याने उलट ते निसटण्याची संभावना वाढते, ही गोष्ट ध्यानात घेण्यासारखी आहे.