तुम्ही कधी खिडकीत बसून रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्यांकडे पाहत बसला आहात का? रस्त्यावर येणारे-जाणारे लोक, वाहने, आजूबाजूचा परिसर न्याहाळताना आपण शांतपणे आपल्या घरात बसलेलो असतो; पण आपलं मन मात्र एखाद्या विचारांवर स्वार होऊन धावत सुटतं. स्वच्छंदपणे आपण आपल्या विचारांच्या दुनियेत हरवून जातो. आपली नजर मात्र रस्त्यावरच असते अन् तितक्यात असं काहीतरी घडतं की, आपली विचारांची तंद्री तुटते आणि आपण समोर काय घडलं ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी कोणाची तरी भांडणं सुरू असतात, कधी रस्त्यावर एका वाहनाची दुसऱ्याला धडक होते, कधी एखादं वृद्ध जोडपं एकमेकांचे हात पकडून रस्त्यावरून जाताना दिसतं, कधी एखादी लहान मुलगी एखाद्या फुलपाखराच्या मागे धावताना दिसते, कधी काही मुलं फुगा हातात घेऊन धावताना दिसतात. कधी एखादं नव्यानं प्रेमात पडलेलं जोडपं गुपचूप भेटताना दिसतं. कधी एखादे वडील आपल्या मुलाचा हात पकडून त्याला शाळेत नेत असतात; तर कधी एखादी आई आपल्या लेकराला ऊन लागू नये म्हणून त्याच्या डोक्यावर पदर ठेवून घेऊन जात असते. का कोणास ठाऊक; पण या छोट्या छोट्या गोष्टी मनाला खूप समाधान देऊन जातात, जगण्याची प्रेरणा देतात. आपल्या आयुष्यात काहीही सुरू असलं तरी काही वेळासाठी का होईना आपल्याला या सर्वांतून सुटका मिळते… काही क्षणांची विश्रांती म्हणू या. मग आपण एक मोठा श्वास घेतो आणि पुन्हा आपल्या कामाला लागतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा