लहानपणी ज्या मुलीचा बसता येत नव्हते, दात घासता येत नव्हते. ओंजळीत पाणी घेऊन चूळ भरता येत नव्हती, ‘गतिमंद’ या श्रेणीतील या मुलीचा फक्त सांभाळ करा, असे डॉक्टरांनी सांगितले हाेते. पण व्यायाम, सततचा सराव, यामुळे कृष्णा बंग ही मुलगी केवळ इतर मुलांप्रमाणे शिकलीच नाही, तर तिनं वैद्यकीय पात्रता परीक्षेतही यश मिळविले. ९५४ क्रमांकावर ‘एम्स’मध्ये तिला प्रवेश मिळाला आणि सध्या ती छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यायात वैद्यकीय शिक्षणाच्या पहिल्या वर्षात शिकते आहे.
”सर्वसामान्य विद्यार्थ्यांना एखादा धडा शिकायला दोन तास लागत असतील, तर त्यापेक्षा दुप्पट वेळ मला लागतो. पण त्यातून मार्ग काढत एवढी वर्षे आम्ही पुढे आलो आहोत. कारण हे सारे माझ्या आईमुळे घडू शकले. कधी १६ तास, तर कधी १८ तासा तिने काम केले. आता दररोज मला २१ सूर्यनमस्कार घालता येतात.” कृष्णा सांगते. ‘नॉर्मल’ म्हणजे यापेक्षा वेगळे काय असते?… मीरा बंग आणि कृष्णा बंग या माय-लेकीची कहाणी अनेकांना प्रेरणादायी असल्याने अलिकडेच त्यांना ‘प्रतिभाश्री’ हा पुरस्कारही मिळाला.
हेही वाचा… पर्यटनाचा व्यवसाय निवडायचाय? शासन करेल मदत
मीरा आणि कमलकिशोर बंग यांना २००५ मध्ये जेव्हा कृष्णा जन्मली तेव्हा खूप आनंद झाला होता. पण तिच्या जन्माच्या नऊ महिन्यानंतर कळाले, की ती गतिमंद आहे. उपचारासाठी अनेक डॉक्टरांचे उंबरठे त्यांनी झिजवले. पण प्रत्येकाने सांगितले, की ‘हिचा आता फक्त सांभाळ करा. फारसे बदल होण्याची शक्यता नाही.’
याच काळात मीरा बंग यांनी ठरविले, की आपले मूल सर्वसाधारण मुलांसारखेच आहे. तिच्यात सकारात्मक बदल नक्की होतील. इथून पुढे माय-लेकीच्या संघर्षाचा एक नवा प्रवास सुरू झाला. जन्मल्यानंतर ज्या मुलीला बसता येत नव्हते, तिचे पाय सरळ नव्हते, बोटांच्या हालचालींवर नियंत्रण नव्हते. कृष्णाच्या २००९ ते २०११ या कालावधीत तीन शस्त्रक्रिया झाल्या. शेवटची शस्त्रक्रिया झाली २०१९ मध्ये. या सर्व शस्त्रक्रिया पायावरच्या. तिचे डोळे तिरळे हाेते, मोठ्या भिंगाचा चष्मा होता. अशा स्थितीमध्ये एकेक प्रयोग सुरू झाले. जेवण भरवताना शेवटचे काही घास तरी तिने स्वत: खावेत, असे प्रयत्न सुरू झाले. महिनोंमहिने त्यात यश येत नसे. पण न थकता हे सारे सुरू होते. स्वतः पाय उचलून टाकण्यापासून ते बोलण्यातील प्रत्येकशब्द उच्चारण्यासाठी कधी महिनाभर लागायचा, तर कधी चार महिने. आता मात्र कृष्णा बुद्धिबळ खेळते, पोहायला येते, तिला शिवाय नृत्यही करायला जमते आता. हिंदी, इंग्रजी, मराठी या तिन्ही भाषा ती उत्तम बोलते. तिची स्वत:ची मते आहेत, आपल्या आईने आपल्याविषयी काय सांगावे, काय सांगू नये, हेसुद्धा ती सांगते आता.
हेही वाचा… गच्चीवरची बाग: हिरव्या मातीचे मैत्र
कृष्णाला प्रत्येक अवयवाच्या हालचालीवरील नियंत्रण मिळवून देण्यासाठी मीरा बंग यांनी जमेल तिथे ‘फिजिओथेरपी’चे प्रशिक्षण घेतले. मुंबई, हैदराबाद यांसारख्या शहरात जो जे शिकवेल ते त्या शिकल्या. दिवसातील १२ ते १६ तास ‘आपले मूल सर्वसाधारण असावे’ यासाठी त्या धडपडत राहिल्या.
६ ऑक्टोबर रोजी ‘सेरेब्रल पाल्सी’ दिन साजरा केला जातो. कृष्णा ‘लोकसत्ता’शी बाेलताना म्हणाली, “आता अन्य मुलांमध्ये आणि माझ्यामध्ये तसा फारसा फरक जाणवत नाही, पण अजूनही काही वेळा उशीर होतो, एखादी बाब करताना. पण प्रत्येक वेळी प्रत्येक समस्येवर मात करायची आहे, हे आता समजून चुकले आहे. काही वेळा आध्यात्मिक प्रवचने आणि सकारात्मक उर्जा निर्माण करणारी वचने मी ऐकते. आपल्यासारख्या अनेकांवर उपचार करण्याइतपत आपल्याला मोठे व्हायचे आहे, असे मी ठरविले आहे. मी चांगली डॉक्टर झाले, तर गरीबीमुळे उपचार घेऊ न शकणाऱ्या मुलांसाठी मला काम करायचे आहे,” असे ती सांगते.
या पूर्वी या मायलेकींच्या समन्वयाची, जिद्दीची दखल घेऊन कृष्णा बंग हिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. एक मोठे कपाट त्याने भरुन गेले आहे. अजूनही कृष्णाला चालताना अडचणींचा सामना करावा लागतो. शब्द जपून आणि काहीसे अडखळत बाहेर पडतात. पण ‘नीट’ परीक्षा उत्तीर्ण होण्याइतकी तिने तिची हुशारी सिद्ध केली. ती म्हणते, “जर आईनस्टाईनच्या मेंदू तीन टक्के काम करत असताना त्यांना यश मिळू शकते, तर मला तर ते मिळूच शकते! आईनस्टाईन हे माझे प्रेरणास्रोत आहेत.”
या साऱ्या प्रवासात तिचे वडील- उद्योजक कमलकिशोर बंग यांचाही वाट आहेच, पण माय-लेकीचा हा प्रवास जिद्द आणि सातत्याचा होता. सर्वसमावेशक, एकात्मिक शिक्षणातून पुढे जाणाऱ्या कृष्णाची कहाणी चढउतराची आहे. पण पुढे नेणारी आणि मनाला उभारी देणारीही आहे!
lokwomen.online@gmail.com