संपदा सोवनी
मोटारींचं जेव्हा ‘क्रॅश टेस्टिंग’ केलं जातं, तेव्हा त्यात वापरलेले मानवी डमी हे प्रामुख्याने पुरूष शरीराशी मिळतेजुळते असतात. परंतु पूर्णत: स्त्री-शरीराची वैशिष्ट्ये असलेली मानवी डमी संशोधकांनी या वापरासाठी नुकतीच तयार केली आहे. पुरूष आणि स्त्री शरीराचं प्रतिनिधित्त्व करणाऱ्या अशा दोन्ही डमी वापरल्यास या दोन्ही मोटारचालकांसाठी अधिक सुरक्षित कार सीटस् तयार करता येतील, असं संशोधकांचं म्हणणं आहे.
‘यूरोन्यूज डॉट नेक्स्ट’ या माध्यमाने याविषयीचे वृत्त दिले आहे. ‘एसईटी ५० एफ’ असं या स्त्री-डमीला नाव देण्यात आलं आहे. ‘मोटारींची सुरक्षितता तपासली जाते, तेव्हा ती पुरूषांबरोबरच स्त्रियांसाठीही पडताळली जायला हवी, त्यामुळे अधिक सर्वसमावेशक परिणाम हाती येतील,’ असं ‘स्वीडिश नॅशनल रोड अँड ड्रान्सपोर्ट रीसर्च इन्स्टिट्यूट’च्या ‘ट्रॅफिक सेफ्टी’ संचालक ॲस्ट्रिड लिंडर यांचं म्हणणं आहे. या अभ्यासात मोटार इतर कुठल्या वाहनावर आदळून, स्थिर वस्तूवर आदळून, पादचाऱ्यांना धडक बसून, अशा विविध प्रकारे मोटारीचा अपघात झाल्यावर काय स्थिती निर्माण होते, याची पडताळणी केली जाणार आहे. त्यात मोटार चालवणाऱ्याच्या जागी स्त्री डमी असताना काय फरक होतो, हे पाहिलं जा आहे. सध्या युरोपमध्ये मोटारींची सुरक्षा तपासताना जवळपास १९७० सालापासून पुरूष डमीसारखीच दिसणारी एक जरा लहान आकाराची डमी ‘स्त्री डमी’ म्हणून वापरली जाते, मात्र या विशिष्ट अभ्यासात वापरली जाणारी ‘एसईटी ५० एफ’ ही स्त्री डमी त्यापेक्षा वेगळी आहे.
हेही वाचा >>>शासकीय योजना: विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान
स्त्री आणि पुरूषांना होणाऱ्या मोटार अपघातांमध्ये काही फरक असतो का, हे पडताळण्यासाठी गेल्या काही वर्षांत जगभर काही अभ्यास झाले आहेत. यात ‘युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनिया’ने २०१९ मध्ये केलेल्या एका अभ्यासानुसार पुरूषांच्या तुलनेत स्त्रिया मोटारींच्या अपघातात जखमी होण्याची शक्यता अधिक दिसून आली. २०२१ मध्येही या विषयावर एक अभ्यास झाला होता. त्यानुसार मोटार अपघातांतही ‘लिंगभेद’ दिसून येण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात. बऱ्याच वेळा ड्रायव्हिंग करणाऱ्या स्त्रियांची पसंती लहान आकाराच्या आणि हलक्या वजनाच्या गाड्यांना असते. शिवाय ज्या अपघातांमध्ये गाडीला एका बाजूनं मार बसला किंवा पुढून मागच्या बाजूस असा मार बसला, त्या अपघातांत जास्त प्रमाणात स्त्रिया गाडी चालवत होत्या, असं दिसून आलं. फ्रंट टू साईड किंवा फ्रंट टू रिअर अशा प्रकारे जेव्हा एक मोटार दुसऱ्या मोटारीला धडक देते, तेव्हा धडक देणाऱ्या मोटारीपेक्षा धडक बसलेल्या मोटारीचं अधिक नुकसान होतं. या सर्व गोष्टींमुळे जर मोटारींचं टेस्टिंग करताना स्त्रीची शरीरवैशिष्ट्यं असलेल्या डमीही वापरल्या गेल्या, तर मोटारीच्या सीटस् केवळ पुरूषांसाठीच नव्हे, तर स्त्रियांसाठीही सुरक्षित होतील, असा मुद्दा मांडला जातो आहे.
हेही वाचा >>>‘लिव्ह इन’ आणि बलात्काराच्या गुन्ह्याची गुंतागुंत!
‘यूरो न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार स्त्रियांना डोळ्यांसमोर ठेवून मोटारींचं टेस्टिंग करणाऱ्या प्रकल्पातील संशोधन अभियंता टॉमी पेटरसन असं म्हणतात, की ‘स्त्रियांच्या मानेचे स्नायू तुलनेनं कमकुवत असतात. त्यामुळे मोटारीच्या टेस्टिंगमध्ये वापरलेल्या पुरूष डमीशी याची तुलना करता एकाच प्रकारच्या अपघातांमध्ये पुरूष डमीची मान अधिक लवचिक राहते आणि मानेची हालचाल वेगळ्या प्रकारे होते, ती वेगळ्या प्रकारची असते, असं लक्षात येतं. आमचा भर स्त्री आणि पुरूष दोघांसाठीही सुरक्षित गाड्या कशा बनवता येतील, याचा अभ्यास करण्यावर आहे.’
lokwomen.online@gmail.com