अपर्णा देशपांडे
नातं किंवा नातेसंबंध याबद्दल बोलायचं झालं तर फक्त आपले रक्ताचे नातेवाईक किंवा आप्तेष्ट इतकेच डोळ्यासमोर येतात. आपल्या व्यावसायिक किंवा कार्यालयीन कामात प्रदीर्घ काळासाठी रोज किमान आठ-नऊ तास आपण ज्यांच्या सोबत घालवतो असे आपले सहकर्मी, आपले वरिष्ठ आणि इतर कर्मचारी यांच्याशीदेखील आपले किती चांगले सौहार्दपूर्ण संबंध तयार झालेले असतात. नात्याच्या कक्षा रुंदावत ही सगळी मंडळीदेखील आपल्या यादीत नकळत सामील होत असतात. आपल्या रोजच्या जगण्यातील धडपड, संघर्ष, उतार-चढाव याचे ते साक्षीदार असतात, किंबहुना काही अंशी जबाबदारही असतात. आपले ऑफिसमधील वरिष्ठ जर आपल्याला सांभाळून घेणारे आणि योग्य मार्गदर्शन करणारे असतील तर फारच उत्तम, पण तसं नसेल तर? तसं नसेल तर ती एक व्यक्ती आपलं आयुष्य पार बदलवून टाकू शकते.
एक किरकिरा, चिडका, रागीट, विकृत बॉस (बॉस ही व्यक्ती अर्थातच स्त्री किंवा पुरुष कुणीही असू शकते. सध्या आपण सोयीसाठी पुल्लिंगी उल्लेख करू या.) असणं हे आजच्या काॅर्पोरेट जगातील सर्वात मोठं दुर्दैव समजलं जातं. अशा ‘दुर्दैवाशी’ दोन हात करणं आपल्याला जमायलाच हवं नाही का? त्यासाठी आधी स्वतःला काही प्रश्न विचारू या.
- तुमचे बॉस सतत तुमच्या कामातील फक्त चुकाच दाखवतात का?
- तुमच्या कामातील अडथळे दूर न करता आणखी त्रास होईल अशी कृती करतात का?
- इतर विभागातील वरिष्ठांसमोर तुमच्या चुका वारंवार दाखवून तुम्हाला शरमिंदं करतात का?
- त्यांच्या सततच्या टीकेमुळे वरचेवर तुमचा आत्मविश्वास डळमळीत होतो का?
- तुमच्या कामाबद्दल भीती निर्माण केली जात आहे का?
- इतरांनी तुमची तारीफ केल्यास त्यांचा अहंकार दुखावून ते तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात का?
- ऑफिसच्या वेळेनंतरही सतत फोन करून तुमच्या खासगी आयुष्यात मिठाचा खडा टाकतात का?
- कधीही कामाची आठवण देऊन तुमची सुट्टी खराब करतात का?
उत्तर हो असेल तर मित्रांनो, तुमचा बॉस अत्यंत ‘टॉक्सिक’ आहे! अशी व्यक्ती तुमचं व्यक्तिमत्त्व पार बदलून टाकण्याची ताकद ठेवून असते. आपल्या व्यावसायिक आणि खासगी वैयक्तिक आयुष्याची पार ‘वाट’ लावू शकते. अशा वेळेला आपल्यातील कौशल्याची आणि कणखरतेची खरी परीक्षा असते. वाईट बॉसला हुशारीने हाताळता येणं हे खरंच एक कौशल्य आहे.
एका मोठ्या कंपनीत काम करणाऱ्या अभयलादेखील अत्यंत त्रासदायक मॅनेजर लाभला होता. वैतागून त्याने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला; पण तत्पूर्वी त्याला आपल्या मोठ्या अनुभवी भावाशी बोलावंसं वाटलं. भाऊ म्हणाला, “तुझ्या आयुष्यात कायम मवाळ आणि चांगली माणसंच असणार आहेत का? तर बिलकूल नाही आणि हा बॉस काही आयुष्यभर असणार नाही. योग्य वेळ आली की तुला दुसरी संधी मिळेलच. तुझी अजिबात चूक नसताना तो बोलला तर सरळ सरळ दुर्लक्ष करायला शिक. कमीत कमी उत्तरं दे आणि भावनिकदृष्ट्या अलिप्त हो. तुझ्या कामात एकदम चोख राहा म्हणजे बोलण्याची कमीत कमी संधी दे. बॉससमोर कमीत कमी जावं लागेल याचा प्रयत्न कर.”
“शक्य असल्यास बॉसपेक्षा वरिष्ठ व्यक्तीशी बोल. त्यांच्या केबिनमधून बाहेर आल्याबरोबर काही क्षण इतर आवडीच्या विषयात मन गुंतवून ताण कमी करता येतो का ते पाहा. सतत त्याच विषयात मन राहिल्यास मानसिक तणाव वाढू शकतो. हे सगळं करून बघ, नक्की फरक जाणवेल तुला.”
“ पण दादा, मी सतत अपमान का सहन करू? तो फार वाईट भाषा वापरतो. मला नाही सहन होत. म्हणून मला ही नोकरी सोडायची आहे.” अभय वैतागून म्हणाला.
“तो शेवटचा पर्याय तर आहेच ना रे! पण अशा किती नोकऱ्या बदलणार आहेस तू? आपल्याला करिअरमध्ये कधी कधी गेंड्याची कातडी पांघरावी लागते. या कंपनीत तुला खूप शिकायला मिळतंय. एक वर्षभर इथे राहा, मग जा कुठे जायचं तिथे! तुला आठवतं, मोठे काका बाबांना किती भयानक वाईट बोलायचे ते? आजी-आजोबांना राग यायचा, पण बाबा त्यांच्या मोठ्या भावाला कधीच उलटून बोलले नाहीत. काही काळात त्यांनी गाव बदलून आपल्याला इकडे आणलं आणि परिस्थिती छान हाताळली. हे बॉस-कर्मचारी नातंपण असंच असतं काहीसं. धरलं तर चावणारं आणि सोडलं तर पळणारं नातं. सबुरीनं घ्यावं लागतं काही वेळा. चल मस्तपैकी बाहेर फिरून येऊ.”
मोठ्या भावाच्या या सल्ल्याने अभयचा ताण बराच कमी झाला. काही महिन्यांनी त्याला दुसऱ्या कंपनीत उत्तम नोकरी मिळाली, पण आधीच्या अनुभवानंतर आता तो एकदम तयार झाला होता कोणत्याही बॉसला झेलायला.
adaparnadeshpande@gmail.com