एकदा का गुन्हेगारीचा शिक्का बसला, तुरुंगात रवानगी झाली की त्या व्यक्तीचं सर्वसाधारण आयुष्य संपतं असं मानलं जातं आणि त्यातही ती स्त्री असेल तर परिस्थिती आणखी बिकट होते. बाहेरचं जग त्यांना विसरतं आणि त्या बाहेरच्या जगात जगण्याचं विसरतात, पण तमिळनाडूतल्या अशाच काही गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या स्त्रियांना आपलं आयुष्य पुन्हा नव्यानं उभं करण्याची संधी मिळाली आहे. तमिळनाडूच्या चेन्नईमधील पूजल सेंट्रल जेलमधील स्त्री कैद्यांना तुरुंग विभागानं स्वत:च्या पायावर उभं राहण्याची संधी दिली आहे. पूजलमधील या महिला कैदी आता एक पेट्रोल पंप चालवत आहेत. नुकतंच म्हणजे १० ऑगस्ट रोजी तमिळनाडूचे कायदा मंत्री एस. रघुपती यांच्या हस्ते महिला कैद्यांकडून चालवल्या जाणाऱ्या या पेट्रोल पंपाचं उद्घाटन झालं. अशाप्रकारे महिला कैद्यांद्वारे चालवला जाणारा भारतातील हा पहिला आणि सध्यातरी एकमेव पेट्रोल पंप आहे.
या तुरुंगातील ३० महिला कैद्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याची नांदी असलेल्या या पेट्रोल पंपाला ‘फ्रीडम फिलिंग स्टेशन’ असं अत्यंत समर्पक नाव देण्यात आलं आहे. या महिला कैद्यांना दरमहा ६००० रुपये पगारही देण्यात येणार आहे. सकाळी ६ ते संध्याकाळी ६ अशी या पेट्रोलपंपाची वेळ आहे. चेन्नईतल्या अंबात्तूर- पुझल रस्त्यावर हा पेट्रोलपंप आहे. हा पेट्रोलपंप या महिलांना आर्थिक स्वातंत्र्य तर देणार आहेच, पण जबाबदारीचं भानही देईल, असा विश्वास तमिळनाडूतील तुरुंग विभागाचे अधिकारी अमरेश पुजारी यांना वाटतो. या महिलांना काहीतरी नवीन शिकण्याची ही संधी तर आहेच, पण त्याचबरोबर आता त्यांच्या गाठीशी कामाचा अनुभवही असल्याने तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर नोकरी किंवा काम शोधणं सोपं जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, चार भिंतीत कोंडल्या गेलेल्या या स्त्रियांचा आता बाहेरील जगाशीही संपर्क येईल. बाहेरच्या जगात, समाजात काय चाललं आहे हे त्यांना समजेल. ग्राहकांशी कसं बोलायचं, व्यवहार कसा करायचा हेही त्या शिकतील. अर्थातच यामुळे त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडेल असा अमरेश पुजारी यांना विश्वास आहे.
हेही वाचा – चॉइस तर आपलाच: मुलं अशी का वागतात?
यातील काही महिलांच्या हातून नकळतपणे गुन्हा घडला असेल किंवा एखाद्या किरकोळ गुन्ह्याची शिक्षाही त्या भोगत असतील, पण हा गुन्हेगारीचा शिक्का पुसला जाऊन ताठ मानेने समाजात पुन्हा वावरता यावं, आपल्या पायावर उभं राहता यावं यासाठी हा उपक्रम नक्कीच सहाय्यभूत ठरणार आहे. यापूर्वी तुरुंगातील कैद्यांनी केलेल्या वस्तूंची तुरुंगाबाहेर विक्री करायला परवानगी देण्यात आली आहे. पण बाहेरच्या जगात जाऊन पुन्हा नव्याने आपलं आयुष्य सुरू करणाऱ्या या महिला कैद्यांच्या आत्मविश्वासात नक्कीच भर पडेल आणि एकटेपणाच्या गर्तेतून बाहेर पडायला त्याची मदत होईल.
भारतात सध्या फक्त १५ राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये फक्त महिलांसाठी विशेष तुरुंग आहेत. २०२१ च्या आकडेवारीनुसार, अशा प्रकारच्या ३२ तुरुंगांमध्ये मिळून ६७६७ महिला कैद्यांसाठी क्षमता आहे. प्रत्यक्षात मात्र क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त महिला कैदी प्रत्येक तुरुंगात आहेत. जिथे आहेत, तिथे त्यांच्यासाठी पुरेशा सुविधा नाहीत. अस्वच्छ आणि अपुरी स्वच्छतागृहे, राहण्याची अपुरी सोय, झोपण्यासाठी बेड्स नसणे किंवा दोन बेड्समध्ये अंतर नसणे, अशा अनेक अनेक समस्या येथे आहेत. अशा परिस्थितीत राहणाऱ्या कैद्यांच्या मानसिक अवस्थेवरही त्याचा परिणाम होतोच. त्यामुळेच तमिळनाडूतील हा उपक्रम एक वेगळी सुरुवात म्हणता येईल.
हेही वाचा – गच्चीवरची बाग: बाग फुलवताना…
या महिलांच्या सुरक्षिततेसाठी पुझल पेट्रोल पंपाच्या गेटवर दोन संरक्षक गार्ड ठेवण्यात येणार आहेत. या मिळालेल्या संधीकडे तमिळनाडूतील महिला कैदी नव्या आयुष्याची सुरुवात म्हणून बघत आहेत. आतापर्यंत फक्त गुन्हेगार म्हणून त्यांना हिणवलं जात होतं. आपल्या कुटुंबीय, मुलाबाळांपासून दूर जेलमध्ये एकटं राहून आयुष्यातला एक एक दिवस त्यांना पुढे ढकलावा लागत होता. आता मात्र पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या या ३० महिला कैदी कमावत्या होणार आहेत. सगळीकडून फक्त निराशेचा अंधार असलेल्या त्यांच्या आयुष्यात आता प्रयत्नांची, जिद्दीची ज्योत पेटली आहे. त्यासाठी त्यांना समाजाच्या सहकार्याची गरज आहे. पुझलसारखे पेट्रोलपंप लवकरात लवकर देशातल्या इतर भागांतही सुरू व्हावेत हीच अपेक्षा. नवीन आयुष्य सुरू करू पाहणाऱ्या या महिला कैद्यांकडे बघून इतकंच म्हणू शकतो –
‘चल जिंदगी की नई शुरुआत करते हैं
जो उम्मीद दूसरोंसे की थी अब खुदसे करते हैं’
ketakijoshi.329@gmail.com