मधुराणी प्रभुलकर
मेन्टॉरिंग म्हटल्यावर एकाच वेळी खूप लोकं माझ्या डोळ्यासमोर यायला लागली. कारण संगीत, नाटक- सिनेमातला अभिनय, मॉडेलिंग, कवितेचे पान सारखे कार्यक्रम. मी आजवर कितीतरी क्षेत्रांत काम केलंय आणि हे काम पॅशनेटली कसं करायचं हे मला शिकवणारी अनेक मंडळी आहेत. माझे मेन्टॉर्स. गंमत म्हणजे हे शिकवणं व शिकणं फारसं सोपं नव्हतं बर कां!
सध्या गाजत असलेली आई कुठे काय करते ही मालिका! माय गॉड! तिचा तो सुरुवातीचा काळ भलताच अवघड होता माझ्यासाठी! एक तर जवळपास बारा वर्षांनी मी स्क्रीनवर येत होते. कॅमेऱ्याची भाषा मी विसरलेच होते. त्यांत रवी करमरकर यांचं दिग्दर्शनाचं तंत्र खूपच वेगळं होतं. सुरुवातीच्या एपिसोडमध्ये अरुंधती सतत काम करत बोलत असते. अहो, किती अवघड आहे हे! एकतर तुम्ही हातांतल्या कामांत अडकता. त्यांत पुन्हा त्या कामाची कंटिन्युटी, संवादातले इमोशन्स, तुमचे लुक्स आणि अभिनय सगळं एकाचवेळी सांभाळायचं. मला जमायचचं नाही ते!
त्यांत ही अरुंधती टिपिकल गृहिणी दाखवलीय, स्वयंपाकघरांत रमणारी! प्रत्यक्षात मी तशी अजिबात नाही. त्यामुळे ते बेअरिंग आणणं मला भलतंच चॅलेंजिंग वाटायचं! माझा प्रचंड गोंधळ व्हायचा आणि मग दिग्दर्शक रवी करमरकर सेटवर सर्वांसमोर मला खूप ओरडायचे. अपमान करायचे. मला त्यांचा अस्सा राग यायचा! अरे यार! मी चाळिशीची बाई आहे. एका मुलीची आई आहे. माझी एक स्वतंत्र इमेज आहे. मी काय विशीतली लर्नर
आहे का यांचे असे ओरडे ऐकून घ्यायला? कितीतरी वेळा वाटलंय मला, की कोणी माझ्याशी असं वागणार असेल तर नाहीच करायचं मला हे काम! शेवटी एकदा आमच्या प्रोजेक्ट हेड कडे तक्रार केली त्यांच्याबद्दल. पण खरं सांगू? त्यांच्या दिग्दर्शनाचा रिझल्ट पडद्यावर पाहिल्यावर मात्र त्यांना माझ्याकडून नेमकं काय अपेक्षित आहे, ते मला हळूहळू कळायला लागलं…
अरुंधतीचा निष्पापपणा, ताजेपणा त्यांना माझ्याकडून काढून घ्यायचा होता. ती त्या व्यक्तिरेखेची गरज होती. त्यासाठी तो ओरडा होता. त्यांना म्हणायचं होतं,बाई गं तुझी जी सगळी आवरणं आहेत आजवरच्या कर्तृत्वाची, ती आधी फेकून दे. मोकळी हो. चाळीस वर्षांत निर्माण झालेला जो अहंभाव आहे. जो तुझ्या देहबोलीतून व्यक्त होतोय तो आधी काढून टाक आणि मुळाशी परत ये. कोणताही अभिनिवेश न ठेवता अरुंधती साकारलीस तरच तिचा प्रवास लोकांना पटेल! रुचेल!रवीसरांची तडफड होत होती ती नेमकी यासाठी! हे लक्षात आलं आणि माझ्या अभिनयात बदल होत गेला. मग मात्र माझी बोलणी कमी झाली आणि त्यानंतर त्यांनी खूप प्रेम, खूप आदर दिला मला!
त्यांनी किती संवेदनशीलतेनं माझ्याकडून काम करून घेतलं त्याचा हा एक किस्सा! अनिरुद्धचं अफेअर कळल्यावर अरुंधतीला पॅनिक अटॅक येतो. या सीनची तयारी करताना मी त्यातली वाक्यं पाठच केली नव्हती. कारण मला वाटलं अरुंधती या सीनमध्ये अडखळत, धापा टाकत, तुटक तुटक बोलेल. पण रवीजी म्हणाले, तू रडतेस. तुला बोलवत नाही. पण तरीही लेखकाचं प्रत्येक वाक्य बोलून, तुला त्यावर अभिनय करायचा आहे.ते माझ्यासमोर बसले. अजिबात न ओरडता, न रागावता त्या सीनमधील वाक्य न वाक्य संयमाने, शांतपणे माझ्याकडून पाठ करून घेतलं त्यांनी! त्यांना ठाऊक होतं, आत्ता आपण हिच्यावर चिडलो तर ही संपणार! असा कसबी दिग्दर्शक हा कलाकाराचा खराखुरा मेन्टॉर!
पण मुळांत रवी सरांसारख्या ताकदीच्या दिग्दर्शकाच्या हाती मी पडले ती माझा नवरा प्रमोद याच्यामुळे. त्यानेच मला ही मालिका स्वीकारायला भाग पाडलं. मात्र माझ्या उभारीच्या काळात खूपशा मालिका माझ्याकडे येत असतानाही, त्याने मला या गोष्टीची रास्त जाणीव करून दिली, की माझ्यासारख्या हरहुन्नरी व्यक्तीने घिसापिट्या मालिका केल्यास मला मानसिक त्रास होईल. त्याने ही जाणीव मला करून दिली नसती तर कदाचित मी त्या प्रवाहाबरोबर वाहवत गेले असते. तसंच शूटिंगला वेळेवर पोहोचणं, दिग्दर्शकाला काही सूचना करायच्या असतील तर कोणत्या टोन मध्ये त्या सुचवणं अथवा प्रत्येक पदाचा मान कसा राखायचा यासारख्या अत्यंत व्यावसायिक गोष्टी प्रमोदनेच मला शिकवल्या.
बाकी मग वक्तृत्व, कथाकथन, संगीत, अभिनय हे सगळं माझ्यात दडलेलं आहे, हे माझ्या आधी माझ्या आईला कळलं. अभिजात कलेचा पाठपुरावा करताना, साधना करताना आपल्या आत ती आंच कशी जिवंत ठेवायची ते आयुष्यभर तिने तिच्या कृतीतून दाखवलं. संसार आणि आम्हा दोन्ही मुलींचा सांभाळ करून, चाळीतल्या घरांत ती तिचा संगीताचा रियाझ रोज पहाटे पांच वाजता उठून करायची. अगदी न चुकता. वयाच्या ६५ व्या वर्षी तिने पीएच.डी. केलं. आजही तिचा संगीताचा अभ्यास सुरू असतो. कलेची पॅशन याहून वेगळी काय असतं?अशीच मला कवितांची ओढ लावणारा, कवितांच्या वाटेवर नेणारा भेटला तो संगीतकार कौशल इनामदार! झी टीव्हीवरील सारेगम कार्यक्रमाचा मेन्टॉर म्हणून तो माझ्या आयुष्यात आला आणि त्याच्यामुळे असंख्य वेगवेगळ्या कवींची आणि कवितांची मला ओळख झाली. कविता आणि संगीत याविषयी त्याची समज व चिंतन अफाट आहे. तो बुद्धिमान असूनही अत्यंत साधा, निगर्वी आणि मनाने निर्मळ आहे. त्याचे हे गुण मी माझ्यात नकळत रुजवले. मला गायिका म्हणूनच नव्हे, तर संगीतकार म्हणूनही प्रसिद्धी देताना, अहंकार व असुरक्षिततेचा लवलेश त्याच्या ठायी नसतो.कवितेचे पान या माझ्या कार्यक्रमांत अवघ्या पंचवीस श्रोत्यांसाठीसुद्धा तो तितक्याच आत्मियतेने, पैशांची अपेक्षा न करता सहभागी होतो. कविता पेश करने के लिए हम कहीं भी जा सकते है असं तो नुसतं म्हणत नाही. कोल्हापूर असो की सिंगापूर कवितेचे पान कार्यक्रमासाठी तो माझ्याबरोबर सर्वत्र खुशीने फिरलाय!
कवितांवर, संगीतावर प्रेम करायला कौशल इनामदार कडून मी शिकले तसं संगीतकार यशवंत देवांकडूनही शिकले! कवितेचे पान च्या निमित्ताने एकदा त्यांना भेटायला गेले, तेव्हा वृद्धत्वामुळे ते अंथरुणाला खिळले होते. पण तशाही अवस्थेत त्यांच्या उशाशी कित्येक नवोदित कवींच्या कवितांची पुस्तकं होती. गात्रं थकली होती. आवाज थरथरत होता, पण कवितांचं नाव काढताच त्यांचे डोळे चमकले. उत्साहाने त्यांना आवडलेल्या कितीतरी कविता त्यांनी मला गाऊन दाखवल्या. अनेक आठवणी जागवल्या. कविता हे त्यांचं फक्त रोजी रोटीचं साधन नव्हतंच कधी! ते त्यांचं पॅशन होतं.
कलांवर आसुसून प्रेम करणाऱ्यां या सगळ्यांकडून मी हेच शिकले, की कोणत्याही कलेचं असं पिसं लागलं की ते मग जन्मभर पुरून उरतं. नावलौकिक, प्रतिष्ठा, पैसा यांच्या पार पलीकडे ते माझ्यासारख्या कलाकाराला घेऊन जातं. कलाकाराचं हेच खरं संचित नाही का?
शब्दांकन : माधुरी ताम्हणे
madhuri.m.tamhane@gmail.com