“अचानक एका आठवड्यात सर्व काही आमूलाग्र बदलून गेलं. प्रकाशाचं रूपांतर एका क्षणात अंधारात झालं. आम्ही भविष्याची कल्पनाही करू शकत नव्हतो, आम्ही सगळ्या बाजूंनी आशा गमावली होती, पण आम्ही थोडंसं धाडस दाखवलं आणि आता एक नवी आशा जागी झाली आहे.” हे आहेत ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं पुन्हा अफगाणिस्तानची सत्ता काबीज केली त्या वेळचे आरेफा आणि मिना या अफगाणी सायकलपटूंचे उद्गार.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरेफा आणि मिना या दोन जिगरबाज अफगाणी युवती उद्यापासून सुरु होणाऱ्या जागतिक सायकल स्पर्धेत सहभागी होत आहेत. ती ‘यूसीआय सायकलिंग जागतिक स्पर्धा’ अशा प्रकारची पहिलीच सायकलिंग स्पर्धा असून त्याचं यजमानपद ग्लासगो आणि संपूर्ण स्कॉटलंड (ग्रेट ब्रिटन) ला देण्यात आलं आहे. ही स्पर्धा ३ ते १३ ऑगस्ट या कालावधीत होणार असून अफगाण संघ सायकलिंगच्या जगातील सर्वोत्तम संघाशी स्पर्धा करू शकेल इतका तयारीचा आहे.

तालिबानी सत्ता आल्यापासूनच म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून अफगाणिस्तानात स्त्रिया आणि मुलींवर सातत्याने काही ना काही बंधने घातलीच जात आहेत हे आता सर्वश्रुत आहेच. त्यांना काम करण्यापासून आणि शिक्षण घेण्यापासून तर वंचित ठेवलं जात आहेच, पण त्यांना खेळ खेळायला आणि स्पर्धेत सहभागी होण्यालाही मज्जाव आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत अफगाणिस्तानातल्या या आरेफा आणि मिना या दोन युवती इतिहास रचणार आहेत, असं कोणी सांगितलं तर तुम्हाला खरं वाटेल का, पण हे खरं आहे. यातल्या आरेफाचं वय अवघं २४ आहे आणि दुसरी तिच्याहीपेक्षा लहान २२ वर्षीय मिना. या दोघी सायकलपटू ‘यूसीआय सायकलिंग जागतिक स्पर्धे’त अफगाणिस्तानचं प्रतिनिधित्व करणार आहेत.

हेही वाचा… आहारवेद : रामबाण उपाय ओवा

या प्रवासाबद्दल बोलताना त्या म्हणतात, “अफगाण मुलींना संधी मिळत नाही म्हणून त्यांच्या प्रतिनिधी म्हणून आम्हाला अफगाणिस्तानचं प्रतिनिधित्व करायचं आहे, तालिबान अफगाणिस्तानात आले तेव्हा दर दिवशी एक नवीन गोष्टी करण्यापासून आम्हाला अटकाव करण्यात येत आहे. आपला देश, आपलं कुटुंब, आपले मित्र, आपलं भविष्य सोडून दुसऱ्या देशात पळून जाणं कठीण असतं, पण सुरक्षित राहण्यासाठी आणि व्यावसायिक सायकलपटू होण्यासाठी आम्ही ते केलं. अफगाण स्त्रियांच्या प्रतिनिधी म्हणून त्यांचं भविष्य सुधारण्यासाठी आम्हाला एक उदाहरण समोर ठेवायचं आहे.”

ऑक्टोबर २०२२ मध्ये या दोघींनी तालिबानमधून पलायन केलं. त्या एक वर्ष निर्वासितांचं जीवन जगल्या. जिवाच्या भीतीनं कुठे कुठे लपून राहिल्या. इंग्लंडमध्ये आल्यानंतर मात्र त्यांच्या पंखांना नवं बळ मिळालं. जेम्स हे या सायकलिंग प्रशिक्षकानं अल्पावधीतच या दोघींमधली प्रतिभा हेरली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सायकलिंगचे व्यावसायिक धडे गिरवायला सुरुवात केली. जेम्स यांचा सायकलिंगचा छोटा व्यवसाय आहे, त्यांनी या दोघींना सायकल बाइक पुरवल्या आणि मग दोघींचा प्रवास सुरू झाला एक वेगळा विक्रम करण्याकडे.

“मिना आणि आरेफामध्ये खूप क्षमता आहे,” जेम्स अभिमानानं सांगतात. प्रचंड परिश्रमानंतर अखेर त्यांना ग्लासगोयेथील ‘यूसीआय वर्ल्ड सायकलिंग चॅम्पियनशिप’मध्ये सहभागी होण्याची संधी मिळत आहे. ही एक अभूतपूर्व कथा आहे. या दोघी योद्ध्या आहेत. त्यांच्याकडे संघर्ष करण्याची ताकद आहे, दृढ विश्वास आहे आणि पुढे जाण्याची इर्षाही,” असं जेम्स प्रत्येक मुलाखतीत सांगत आहेत.

हेही वाचा… सोनिया गांधींनी का लावून द्यायला हवं राहुल गांधींचं लग्न?

चॅम्पियनशिप गुरुवारपासून सुरू होत आहे. ११ दिवसांत १३ स्वतंत्र स्पर्धा होणार आहेत. इथून पुढे दर चार वर्षांनी, उन्हाळी ऑलिम्पिक खेळांच्या आधीच्या वर्षी ही स्पर्धा आयोजित केली जाईल. या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी क्रीडा मानसशास्त्रज्ञ मारिया जेकब यांनी मिना आणि आरेफाची मानसिक तयारी करून घेतली आहे. त्यांनी कसून सराव केला आहे. त्यांचा उत्साह टिकून ठेवण्यासाठी मारिया मदत करत आहेत. या दोघी या स्पर्धेच्या जागतिक विजेतेपदाबद्दल तर भरभरून बोलत आहेतच, पण त्यांना आता ऑलिम्पिकचेही वेध लागले आहेत. त्यांची एकच अपेक्षा आहे- अफगाणिस्तानातल्या सर्व स्त्रिया-मुलींना एक ना एक दिवस मुक्त जीवन मिळेल याची.

नोबेल शांतता पुरस्कार विजेती नादिया मुराद या अत्यंत धाडसी यजिदी तरुणीची ‘द लास्ट गर्ल’ ही पुस्तकरूपी कहाणी आहे. अलीकडेच हे पुस्तक वाचनात आलं. या युवतींचे देश वेगळे असतील, संघर्षाच्या कहाण्या वेगवेगळ्या असतील, पण तो संघर्ष एकच आहे. मिना आणि आरेफाच्या कथा वाचताना असं वाटलं, या ‘द लास्ट टू सायकल गर्ल्स’ ठरू नयेत.

jambhekar.prajna@gmail.com 

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aarefa and mina two young afghan girls are participating in the uci world cycling championship in glasgow scotland dvr