पूर्वी लोक वाइल्डलाइफ फोटोग्राफी फक्त छंद म्हणून करायचे; पण आता तसे राहिलेले नाही. आता वाइल्डलाइफ फोटोग्राफीमधील तरुणाईची आवड वाढू लागली आहे. अनेक तरुण या फोटोग्राफीमध्ये चांगले करिअर करीत आहेत. वन्यप्राण्यांच्या हालचाली, त्यांचे अद्भुत सौंदर्य आणि काही वेळा निसर्गातील आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी कॅमेऱ्यात टिपण्याचे काम वाइल्डलाइफ फोटोग्राफर करीत असतो. मात्र, त्यातील योग्य क्षण टिपण्यासाठी वाइल्डलाइफ फोटोग्राफरकडे कसब असावे लागते. याच प्रकारे आरजू खुराना नावाच्या महिलेने वाइल्डलाइफ फोटोग्राफीत स्वत:चे वेगळे कौशल्य दाखवून त्यात करिअर घडवले.
दिल्लीतील रहिवासी असलेली आरजू खुराना व्यवसायाने वकील आहे. २०१२ मध्ये १८ वर्षांची असताना सुटीच्या दिवसांत जंगलात फेरफटका मारताना तिला वाइल्डलाइफ फोटोग्राफीमध्ये रस वाटू लागला. हळूहळू वकिलीपासून दूर होत, तिची पावले वाइल्डलाइफ फोटोग्राफीकडे वळू लागली. हीच आवड जोपासत तिने २०१२ मध्ये फोटोग्राफीला सुरुवात केली.
पण, वयाच्या १० व्या वर्षापासून तिला कॅमेऱ्याविषयी फार आकर्षण वाटू लागले. मग कॅमेऱ्याची किंमत जास्त असतानाही तिने वयाच्या १० व्या वर्षी वडिलांना कॅमेरा विकत घेऊन देण्यास राजी केले. १५ वर्षांची होईपर्यंत वडिलांनी तिला पहिला कोडॅक कॅमेरा विकत घेऊन दिला. पण तेव्हा तिला फोटोग्राफीविषयी तितकीशी आवड नव्हती. कारण- त्या काळात ती शिकत होती. पण, पुढे १८ व्या वर्षी वकिलीचे शिक्षण घेताना तिला फोटोग्राफीच्या कलेचे कौतुक वाटू लागले.
भरतपूर पक्षी अभयारण्यातील एका फोटोमुळे तिच्या आयुष्यात नवे वळण आले. या अभयारण्यात तिने धुक्यात सारस पक्ष्याचा एक मनमोहक क्षण टिपला; जो तिला स्वत:ला खूपच भावला. त्यानंतर खऱ्या अर्थाने तिच्या वाइल्डलाइफ फोटोग्राफीतील करिअरला सुरुवात झाली.
त्यावर ती सांगते की, वाइल्डलाइफ फोटोग्राफीत अनुभव फार महत्त्वाचा आहे. त्यासाठी प्राण्यांचे, त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे निरीक्षण करण्यात वेळ घालवणे आणि त्यांचे वर्तन समजून घेणे गरजेचे आहे.
पण, वाइल्डलाइफ फोटोग्राफीमध्ये करिअर करताना आरजू खुराना यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला; विशेषत: योग्य संधी शोधण्यात. वाइल्डलाइफ फोटोग्राफी क्षेत्रात ती तितकीशी लोकप्रिय नव्हती. म्हणून तिला स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी विविध गोष्टी कराव्या लागल्या
तिच्या वकिलीच्या सरावासह फोटोग्राफीचा समतोल राखणेदेखील आव्हानात्मक होते. तिने आपल्या पालकांना ती एकटीने प्रवास करू शकते, असे पटवून दिले. आर्थिक गोष्टींसाठी सतत संघर्ष करावा लागत होता. त्यात तिच्या कुटुंबाचा पाठिंबा न मिळाल्याने तिला स्वत:ला या क्षेत्रात ठिकवून ठेवणे कठीण जात होते. एटीआर प्रकल्पाने दुर्गम भागात संपर्क शोधणे आणि मर्यादित निवास आणि जेवणाच्या पर्यायांसह अनेक आव्हाने उभी केली.
पण तरीही हार न मानता, आज आरजू खुराना भारतातील ५५ व्याघ्र प्रकल्पांच्या दौऱ्यावर निघाली आहे. राजस्थानपासून सुरू होणाऱ्या या प्रकल्पाला तिने एटीआर (ऑल टायगर रिझर्व्ह) असे नाव दिले आहे; जो सहा महिन्यांत पूर्ण होईल. ATR हा सर्व व्याघ्र प्रकल्पांसाठी उभा असलेला एक महत्त्वाचा प्रकल्प आहे; ज्याचा भारतात यापूर्वी कधीही प्रयत्न झाला नाही.
आरजू खुराना हिने सांगितले की, एटीआर प्रकल्पाला १ ऑक्टोबरपासून राजस्थानच्या सरिस्का येथून सुरू करण्यात आली. आता तो कोटाच्या मुकुंदरा व्याघ्र प्रकल्पात पोहोचला आहे. या प्रकल्पाचा उद्देश लहान व अज्ञात व्याघ्र प्रकल्पांना ओळख मिळवून देणे आणि लोकांना व्याघ्र प्रकल्पांबद्दल जागरूक करणे हा आहे.
या प्रकल्पात तिच्याबरोबर चार लोकांची टीम आहे; ज्यात आरजूची आई, व्हिडीओ एडिटर, वन्यजीव तज्ज्ञ व आरजू खुराना यांचा समावेश आहे.
आरजू खुराना हिने पुढे सांगितले की, कॅमेऱ्याबरोबर तिचे इतके घट्ट नाते निर्माण झालेय की, वकिलीतील तिची आवड हळूहळू कमी होऊ लागलीय. कायद्याच्या क्षेत्रात काम करताना जो काही ताण येत होता, तो जंगलात गेल्यावर संपायचा. मी प्राण्यांसोबत राहणे, त्यांचे फोटो माझ्या कॅमेऱ्यात टिपणे, त्यांचा खोडकरपणा पाहणे यात मला आनंद मिळतो. जरी काही प्राणी खूप क्रूर आणि धोकादायक असले तरी त्यांच्याकडून खूप धैर्य मिळते. कधी कधी धोकादायक जंगली हत्ती, विषारी साप, सिंह, वाघ यांना सामोरे जाणे खूप कठीण असते; परंतु त्यांना ओळखण्यासाठी खूप समजून घेणे आवश्यक आहे.
आरजूने सांगितले की, ११ वर्षांच्या या प्रवासात तिला सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स मिळाले आहेत; जे पाहून तिला खूप प्रोत्साहन मिळते आणि तिला वाइल्डलाइफ फोटोग्राफीला आणखी पुढे नेण्याची इच्छा आहे.