सारिका चाटुफळे-कुलकर्णी

सकाळी सकाळी मंजिरी वहिनी उठल्या आणि नेमका दुधवाला बिल मागायला आला. दुधवाल्याला पैसे द्यायचे म्हणून वहिनी पर्स शोधू लागल्या, पण ती सापडेना. वहिनींनी त्यांच्या अहोंना उठवलं.

त्यांनी अहोंना विचारलं, ‘‘तुम्ही माझी पर्स पाहिलीत का ?’’

अहो म्हणाले, ‘‘छे छे मी तुझी पर्स अजिबात बघितली नाही, आणि बघितली तरीही मी तिला हातदेखील लावणार नाही.’’

‘‘असं का ?’’

‘‘अरे मी तुझा आणि तुझ्या प्रायव्हसीचा आदर करतो.’’

‘‘मग ?’’

‘‘बघ, केवढी गं अडाणी तू ? तुला काहीच माहिती नाही ना ?’’

‘‘अहो काय माहिती नाही ना ? एकतर इथे दूधवाला दारात उभा आहे, माझी पर्स सापडत नाहीये आणि तुम्ही कोडी कसली घालताय?’’

‘‘बरं थांब, आधी मी दुधवाल्याचे पैसे देतो, मग तुझ्याशी बोलतो.’’

अहो पैसे देऊन आले. तर वहिनी मुलीला उठवायला तिच्या खोलीत गेल्या. पुन्हा अहो कडाडले, ‘‘तुला मुलीच्या प्रायव्हसीचा जराही आदर नाही मंजिरी. तिच्या खोलीत जाताना दरवाज्यावर टकटक करायला हवं. आणि हो सांगून ठेवतो, यापुढे तू जर कपडे बदलत असशील तर दरवाज्याला आतून कडी घालत जा.’’

अहोंना आज सकाळीच काय झालं हे वहिनींना समजेना.

‘‘अहो, मी काय म्हणते, थोडं लिंबू पाणी देऊ का ? म्हणजे जरा बरे वाटेल तुम्हाला.’’

‘‘मला काय झालंय?’’

‘‘सकाळी सकाळी काय हे बोलताय मग? काही समजेल असं बोला. लग्नानंतर एवढ्या वर्षांत अंघोळीला गेल्यावर टॉवेल विसरायचं बंद झालं नाही अजून आणि कपडे बदलताना कसल्या कड्या घालायला सांगताय?’’

हेही वाचा… समुपदेशन: नात्यातलं ‘आइस ब्रेकिंग’!

‘‘इथेच तर चुकतं आपल्या लोकांचं. जरासुद्धा आदर नाही एकेमकांबद्दल.’’

‘‘काय झालं ते सांगणार आहात की मी माझ्या कामाला लागू?’’

‘‘सांगतो. परवाची शाहरुखची मुलाखत वाचलीस का ?’’

‘‘आता शाहरुखच्या मुलाखतीचे काय ?’’

‘‘त्यात शाहरुख म्हणाला आहे की त्याला त्याच्या बायकोचा अत्यंत आदर वाटतो. तीस वर्षांत त्यानं कधीही त्याच्या बायकोच्या पर्सला हात लावलेला नाही. त्यामुळे मीदेखील तुझा आदर वाटतो हे दाखवण्यासाठी तुझ्या पर्सला हात लावणार नाहीये.’’

‘‘अरे देवा, असं झालं का ते? इतक्या वर्षांत त्यातील पैसे लांबवलेत ते.’’

‘‘मंजिरी, तुला आठवण करून देतो. मी तुझ्या पर्समधील नाही, तू माझ्या पाकिटातील पैसे काढतेस.’’

‘‘अगं बाई, असंय का ते? पण तुम्हीदेखील माझ्याकडे असलेली तुमची क्रेडिट कार्डे काढून घेण्यासाठी माझी पर्स गुपचूप उघडता किनई.’’

‘‘हो, ते आपलं कधीतरी.’’

‘‘बरे बाबा शाहरुख देवासारखा धावून आला. आता मी बिनधास्त त्यात काहीही ठेवू शकते. मला एक सांगा.’’

‘‘हा बोल.’’

‘‘तुम्ही जसं माझ्या आदरापोटी हे करणार आहात तसा मला तुमच्याबद्दल आदर दाखवणं काही गरजेचं नाही ना, तसं असेल तर मला काही हे म्हणणं कबूल नाही बरं.’’

‘‘तुला कसं वाटतंय ?’’

‘‘खरं तर मला काय वाटतं सांगू का? त्या शाहरुखच्या बायकोकडे असतील ३००-४०० पर्स. मग एके दिवशी गौरीनं सांगितलं असेल की माझी पर्स दे रे, मला दुधवाल्याचे पैसे द्यायचे आहेत. त्यानं चुकीची पर्स दिली असणार, त्यामुळे गौरी चिडली असणार. म्हणून तो तेव्हापासून तिच्या पर्सला हात लावत नसणार.’’

‘‘मग कपडे बदलतानाचं काय? किंवा तो जसं म्हणाला की मुलीच्या खोलीत मी दरवाजा वाजवून जातो. त्याचं काय? एक व्यक्ती म्हणून नवऱ्यानं बायकोचा किंवा कुठल्याही नात्याचा आदर राखायला हवा यात चूक काय आहे? फक्त एकच असू शकतं की आपल्या आदर दाखवण्याच्या आणि जवळीक दाखवण्याच्या संकल्पना वेगळ्या असू शकतात. आधीच्या काळी झोपायच्या खोलीत दिवसभर पुरुष प्रवेशही करत नसत. किंवा अवेळी प्रवेश केला तर खाकरून, मुद्दाम खोकून त्या खोलीत जात. माझे आजोबा कधीही झोपायच्या खोलीत गेलेले मला आठवत नाही. दिवसा तरी बायकांना घरभर न संकोचता वावरण्याची मुभा हवी असं त्यांचं मत होतं. आधीच्या काळात व्यक्ती म्हणून एकमेकांविषयी असणारा आदर हल्ली कुठे नावालादेखील दिसत नाही. जवळचं नातं असलं म्हणून प्रत्येकाचं स्वतंत्र अस्तित्व आपण विसरत चाललो आहोत की काय असं वाटतं. आपल्या पत्नीची, पतीची वेगळी जागा किंवा आपल्याशिवाय वेगळे काही आयुष्य असू शकतं हा विचार आपल्याकडे असायला हवा. प्रत्येकाची प्रत्येक गोष्ट समजलीच पाहिजे हे बंधन स्वातंत्र्यावर घाला घालणारं वाटतं. एकमेकांच्या वस्तुंना विशेष करून फोनला न विचारता हात लावणं, अरं बायकोच कपडे बदलतेय असं म्हणून धाडकन् दरवाजा उघडून जाणं हे फक्त प्रातिनिधिक आहे. नवऱ्यावर अथवा बायकोवर यातून प्रस्थापित होणारी मालकी हक्काची भावना जास्त घातक आहे. त्यामुळे या छोट्या गोष्टींपासून आपण तरी सुरुवात करू शकतो. पण एक लक्षात ठेव, हा आदर केला म्हणून अंघोळीला जाताना टॉवेल विसरणार नाही याची काही खातरी नाही बरं.’’

‘‘तुम्ही विसरणार याची मला खातरी आहे.’’