अभिनेत्री दिया मिर्झा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुरुवातीच्या मॉडेलिंगच्या आणि नंतरच्या टप्प्यावर अभिनयाच्या क्षेत्रात येऊन मला नुकतीच २० वर्षं पूर्ण झालीत. आर. माधवन, सैफ अली खान यांच्यासोबत ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटाने माझ्या रुपेरी कारकीर्दीची सुरुवात झाली होती. माझ्या या पहिल्या चित्रपटाला फारसं यश मिळालं नसलं तरी एक ‘कल्ट क्लासिक मूव्ही’चा दर्जा या चित्रपटाने मिळवला याचं समाधान आहे. आर. माधवनसारखा एक सच्चा दोस्त मला या सिनेमाने मिळवून दिला, ही आणखी एक चांगली घटना.

हल्लीच अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘भीड’ हा माझा चित्रपट रिलीज झाला. यात पंकज कपूर, राजकुमार राव हे अत्यंत गुणी कलाकार माझ्यासोबत आहेत. भूमी पेडणेकरही आहेच. अतिशय वास्तववादी आणि सद्य:स्थितीवर भाष्य करणाऱ्या ‘भीड’चे सर्वच थरांतून स्वागत होत आहे. २०२०-२०२१ ही दोन वर्षे आपल्या देशाने करोनाशी कडवी झुंज दिली. करोनाच्या विळख्यातून गरीब, श्रीमंत कुणी सुटलं नाही, अनेकजण देशोधडीला लागले, कित्येकांचे नाहक बळी गेले. पण त्याहीपेक्षा भयानक म्हणजे, रुग्णालयात दाखल झालेल्या अनेकजणांचं पुढे काय झालं ते समजलंच नाही. कारण त्यांना मृत घोषित केलं गेलं, मात्र त्यांचे मृतदेह बघायलाही मिळाले नाहीत, हे अधिकच क्लेशकारक होतं. अशा सगळ्या सामायिक वेदनांचे हृदयस्पर्शी चित्रण अनुभव सिन्हा यांनी ‘भीड’ या चित्रपटात केलं आहे.

हेही वाचा – विवाह समुपदेशन : स्पर्धा जोडीदाराशी?

अशा वेगळ्या चित्रपटातील माझ्या भूमिकेचं कौतुक होत आहे याचा मला जास्त आनंद आहे. ‘भीड’मधली माझी व्यक्तिरेखा एका आईची आहे. अनेकांनी त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. त्यावर माझं प्रामाणिक उत्तर आहे, मी नुकतीच चाळिशी पूर्ण केली आहे. दोन वर्षांच्या अव्यानची आई आहे, अशा वेळी, हिरोसोबत रोमान्स करणारी भूमिका कशी करणार? वयानुसार वेगळ्या भूमिका वाट्याला येणारच. सी, बेसिकली, एव्हरी ॲक्ट्रेस कान्ट गेट कॉप्स रोल लाइक तब्बू! खंबीर कार्यक्षम पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेच्या तिला ऑफर येतात, ज्यात ती शोभूनही दिसते. अर्थात ती आईच्या भूमिकेतही असतेच की.

गेली काही वर्षे बॉलिवूडमध्ये निर्माण झालेला ट्रेंड सगळ्यांच्या पचनी पडलेला दिसतोय. साठीला आलेले नायक ज्यात शाहरूख खान, सलमान खान, आमिर खान, सैफ अली खान, अक्षयकुमार, अजय देवगण हे आजचे आघाडीचे स्टार्स आहेत. पण त्यांच्या नायिका पाहिल्या तर त्या त्यांच्यापेक्षा वयाने अर्ध्या आहेत. सोनाक्षी सिन्हा, दीपिका पदुकोण, रकूल प्रीत सिंग अशा तिशीतल्या नायिका त्यांच्याबरोबर असतात. चित्रपटसृष्टीही पुरुषप्रधानच आहे. वयाची साठी जवळ आली तरी हिरोच्या चाकोरीबद्ध प्रतिमेतून आजच्या अभिनेत्यांना पायउतार व्हावेसे वाटत नाही. नायिकांनी मात्र तिशी पार केली नाही की लगेच त्यांना आईच्या भूमिका ऑफर होतात. मला आता सांगा, चाळिशीच्या आसपास किंवा पार केलेल्या नायिकांनी मग काय करावं? घरी बसावं करिअर संपलं म्हणून! या पार्श्वभूमीवर मी स्वतःला भाग्यवान समजेन कारण मला अगदी योग्य वेळी ‘भीड’ चित्रपट मिळाला, अगदी चपखल भूमिकेसाठी अनुभव सिन्हा यांनी मला निवडलं.

मागे वळून पाहाताना दिसतं, की माझ्या पहिल्या चित्रपटानंतर आत्तापर्यंतची २० वर्षे मी कधी यश तर कधी अपयशाच्या हिंदोळ्यावर झुलत राहिले. माझ्याकडे बॉलिवूडच्या अभिनेत्रीला आवश्यक रूप, अभिनय या जमेच्या बाजू आहेत; परंतु नशिबाची साथ फारशी मिळाली नाही. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी माझ्याजवळ नसताना मी चित्रपटसृष्टीत आले, यामुळे कुठल्या भूमिका स्वीकारायला हव्यात, कुठल्या नाहीत याचा काहीच बोध व्हायचा नाही. तसंच जन्मापासून वयाची २० वर्षे मी हैदराबादमध्येच काढलीत. मेंटॉर, गाइड, फ्रेंड कुणाचंही मागर्दर्शन मिळालं नाही. ठेचकाळत, कधी चुकीचे, कधी योग्य निर्णय घेत मी करिअर केलं. कधी मला एखाद्या चित्रपटासाठी साइन करून नंतर अचानक माझी भूमिका कुणा दुसरीलाच दिली गेली. कधी स्क्रिप्टमधील भूमिका आणि प्रत्यक्षातील भूमिका यातील तफावत जाणवली. असो, असे अनुभव येणारच, माझी तक्रार नाही.

हेही वाचा – आहारवेद: रोगप्रतिकारकशक्तीसाठी कवठ खा!

जे यश-अपयश आलं. जे चढ-उतार आले ते माझे होते. माझा संघर्ष अटळ होता, जो माझा-माझ्याशी चाललेला होता. आता ओटीटी माध्यमामुळे अभिनय क्षेत्रांतील स्त्री कलाकारांना मनासारख्या, समाधान देणाऱ्या भूमिका मिळू लागल्या आहेत. इथं वेगवेगळे प्रयोग केले जातात. त्यासाठी वेगवेगळ्या वयाची/ लुक्सची व्यक्तिरेखा आवश्यक असते. कलाकाराला अभिनय करता आला पाहिजे ही माफक अट असते ज्यात मी बसते. आणि काय हवं? नुकताच मी ‘धक धक’ हा चित्रपट पूर्ण केला आहे. रत्ना पाठक शाह, फातिमा सना शेख आणि संजना सांघी या नायिका आहेत. एक वेगळा अनुभव घेते आहे. यापुढेही अशाच भूमिका मिळत राहिल्या तर माझ्यातल्या कलाकाराला आणखी काय हवं असणार आहे?

samant.pooja@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress dia mirza said it is possible to get powerful roles by ott ssb