पूजा सामंत
रितेश देशमुखशी लग्न करण्यापूर्वी मी जेनेलिया डिसुझा होते. अगदी टिपिकल बांद्रा गर्ल होते मी. माझी आई जेनेट एका फार्मास्युटिकल कंपनीत मॅनेजिंग डायरेक्टर आणि वडील निल डिसुझा हे टाटा कन्सल्टन्सीमध्ये नोकरी करत होते. त्यामुळे मी आणि भाऊ निगेल पाळणाघरात वाढलो.
त्या दोघांनी नोकरी करत आमचा सांभाळ केला. मी अभिनय क्षेत्रात आल्यानंतर आईने स्वेच्छेनं तिची नोकरी सोडली, कारण तिला माझ्यासोबत शूटिंगला येणं गरजेचं वाटत होतं. तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी अशा ५ भाषांमधून मी काम करत होते आणि सगळ्या दाक्षिणात्य भाषांमधून मी अनेक यशस्वी चित्रपट दिलेत.
रामोजी राव यांची निर्मिती असलेल्या ‘तुझे मेरी कसम’ या फिल्मच्या सेटवर माझी आणि रितेशची (देशमुख ) पहिली भेट झाली. सुरुवातीला अबोल वाटणारा रितेश ही फिल्म संपेपर्यंत चांगलाच खुलत गेला. या दरम्यान आमची खूप छान मैत्री झाली आणि त्यांचं रूपांतर प्रेमात झालं. २००३ मध्ये हा पहिला चित्रपट रिलीज झाला, पण आमचं लग्न ३ फेब्रुवारी २०१२ ला झालं. कोर्टशिपमधे ९ वर्षांचा काळ गेला. आमचं लग्न झालं तेव्हाही मी रितेशला अभिनय क्षेत्रात सिनियर होते. १० वर्षांपेक्षा अधिक काळ मी ५ भाषांमधील चित्रपट, आउटडोअर शुटिंग यात व्यस्त होते. त्यामुळे लग्न झाल्यावर छानपणे संसार करावा अशी माझी मनोमन इच्छा होती. आणि त्याबाबत मी रितेशला आधीच कल्पना दिली होती. मी स्वच्छेनं विश्रांती घेतली. ही माझी इच्छा असल्यानं रितेशच्या होकार अथवा नकाराचा प्रश्नच उद्भवत नव्हता. आमच्या विवाहावेळी एका नामवंत दिग्दर्शकानं मला नव्या फिल्मची ऑफरही दिली होती. या फिल्ममध्ये कुठल्याही अभिनेत्रीला आवडेल अशी भूमिका आणि मानधन होतं. त्योवळी रितेशने मला सांगितलं की, ही फिल्म तू पूर्ण कर. पण मी त्यास ठामपणे नकार दिला !
हेही वाचा: ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’
नुकताच रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ हा चित्रपट रिलीज झाला आहे, ज्यात मी ‘श्रावणी’ ही नायिकेची व्यक्तिरेखा साकारली आहे, तर रितेश नायकाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट एक इंटेन्स लव्ह स्टोरी आहे. रितेशने लॉकडाउनच्या काळात दिग्दर्शक होण्याचा मानस माझ्याकडे व्यक्त केला होता. तू जर ‘श्रावणी’ची व्यक्तिरेखा करणार असशील तरच हे प्रोजेक्ट पुढे जाईल, अशी गळच त्याने घातली. रितेशने या चित्रपटात अभिनय आणि दिग्दर्शन अशा दोन्ही बाजू सांभाळल्या आहेत. मी तब्बल १० वर्षानंतर ‘वेड’ हा आमचा होम प्रोडक्शन चित्रपट करतेय. दहा वर्ष अविरत काम करून मी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला आणि आता दहा वर्षांच्या विरामानंतर पुन्हा नायिकेची भूमिका साकारात आहे आणि तेही रितेशच्या सांगण्यावरून.
मला एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटतंय! २०१४ मध्ये मी रितेशच्या सोबत ‘लई भारी’ चित्रपटाच्या सेटवर सहज म्हणून गेले होते. त्यावेळी रितेशने सेटवर मला कॉस्च्युम देऊन पाहुणी कलाकार म्हणून एका गाण्यात काम करण्यास सांगितलं. माझ्यासाठी हे सारं अनपेक्षित होतं. पण तेव्हा ते मी सगळं एन्जॉय केलं आणि आता ‘वेड’ हा चित्रपटही केला! नवऱ्याने ‘करिअर पुन्हा नव्यानं सुरू कर, आता घर आणि मुलांची काळजी करू नकोस, ती आता मोठी झालीत. ती स्वत:ची काळजी घेऊ शकतात. शिवाय आई (विलास राव देशमुख यांच्या पत्नी -वैशाली देशमुख ) आहेच,’ असं जेव्हा सांगितलं तेव्हा मी तयार झाले आणि मी शूटिंग सुरू केलं. या चित्रपटात त्याने स्वतः माझ्या लूकवर खूप काम केलं- अगदी मी टिकली कुठली वापरावी, रोल, संवाद, हावभाव अशा अनेक महत्त्वपूर्ण बाबी स्वतः ठरवल्या आहेत ! हा चित्रपट पूर्ण करण्यासाठी रितेशची मेहनत पाहून मला त्याचं खूप कौतुक वाटतं. ‘वेड’ पासून माझी दुसरी इनिंग सुरू होत आहे. आणि त्यासाठी रितेशचा मला पूर्ण पाठिंबा आहे.
लग्नानंतर रियान आणि राहिल यांना वाढवताना मी मातृत्वाचा पूरेपूर आनंद घेतला. रितेशनेही आपलं काम सांभाळून पित्याची भूमिका उत्तम निभावली आणि आजही उत्तमपणे निभावत आहे. आई म्हणून जबाबदारी निभावताना मला क्षणभरही आपण आपलं करिअर मिस करतोय असं वाटलं नाही, माझी लग्नाआधीची अभिनेत्री म्हणून असलेल्या कारकीर्दीचा तेव्हा मनमुराद आनंद घेतला. दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटांत मी छान भूमिका केल्या. मी त्यात समाधानी होते, त्यामुळे लग्न झाल्यानंतर ऑन स्क्रीन मी कुठेही दिसत नाही याचे शल्य कधीच नव्हतं आणि याबाबत मी कधीही रितेशकडे तक्रारही केली नाही. त्यानेच मला पुन्हा अनिभय करण्याची गळ घातली आणि माझ्यासाठी अप्रतिम ‘टेलर मेड’ रोल दिला.
मी बांद्यासारख्या ठिकाणी एका लहान कुटुंबात वाढले. ग्रामीण जीवनाशी माझा कधीही संबंध आला नव्हता. पण देशमुख कुटुंबात आल्यावर ग्रामीण जीवनाशी माझं सुरेख नातं जुळलं. देशमुख कुटुंबीय सुट्टीच्या दिवसात, सणावाराला लातूर, बाभळगाव इथे त्यांच्या घरी जातात. ते अत्यंत साधेपणानं आपलं जीवन जगत असतात. इथल्या मातीशी ऋणानुबंध सांगणारे रितेश आणि कुटुंबीयांचे साध्या राहणीमानाचे संस्कार आमच्या मुलांमध्येही आहेत. आम्ही प्रत्येक सुट्टीत लातूर -बाभळगावला जातो. तिथे बैलांना वैरण घालणं असो की गाई-म्हशींचं दूध काढणं असो, शेतातील धान्य काढणं असो… मुलं तिथे रमतात हा माझा अनुभव आहे. माझे, रितेशचे आणि आमच्या मुलांचे फोटो फाटोग्राफर क्लिक करतात तेव्हा आम्ही आमच्या मुलांना सांगितलं आहे की, तुम्ही हात जोडून त्यांचे आभार माना. आम्ही दोघांनीही पालकत्वाची भूमिका उत्तमपणे बजावण्याचा प्रयत्न केला आहे.
हेही वाचा: मासिक स्रावाच्या नियमितपणासाठी पपई
आम्ही एक कंपनी फर्म केली- इमॅजिन मीट. या कंपनीचं कामही मी पाहते, रितेशने ‘बालक पालक’ या चित्रपटापासून निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. यशस्वी निर्माता म्हणून त्याची वाटचाल सुरू आहे.आमच्या लग्नांनंतर माझे आणि सासूबाई वैशाली देशमुख यांचे आई-मुलीचे नाते आहे. मला त्यांचा खूप पाठिंबा असतो, त्या सतत आमची काळजी घेत असतात. ‘जेनेलिया, तू खरंच दोन्ही मुलांना खूप छान वाढवलंस, तुझा हा गुण वाखाणण्यासारखा आहे,’ अशी कौतुकाची थाप त्यांच्याकडून मला मिळते. अशावेळी मला खूप समाधानी वाटतं. लग्नापूर्वी मी रितेशची प्रेयसी होते आणि आज लग्नानंतर दहा वर्षांनीही त्याच्या मनात माझे ‘प्रेयसी’चे स्थान कायम आहे याचा मला खूप आनंद आहे. ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’ अशाच माझ्या भावना आहेत.
नायिका ही १८ ते ३० वयोगटातलीच हवी असा जो जुना समज होता तो बदलत चालला आहे, विशेषतः ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रत्येक वयोगटातील कलाकाराला काम करण्याची उत्तम संधी मिळाली आहे आणि तशा व्यक्तिरेखा लिहिल्याही जात आहेत, म्हणूनच काजोल, माधुरी दीक्षित, अनुष्का शर्मा, कतरीना कैफ अशा या विवाहित आणि काही तर आई असलेल्या अभिनेत्रीही उत्साहानं काम करत आहेत. आणि त्यात आता माझंही नाव जोडलं जातंय, हे चित्र सुखावह आहे, नाही का ?
samant.pooja@gmail.com