When You Feel You Are Women: तुम्ही स्त्री आहात याची जाणीव कधी झाली असा प्रश्न कोणी विचारला तर काय उत्तर द्याल? जन्मल्यानंतर, पहिला फ्रॉक घातल्यावर, पहिल्यादां कान टोचल्यावर, पहिल्या वाढदिवसाला बाहुलीच्या आकाराचा केक कापल्यावर, पहिली ब्रा घातल्यावर, पहिली पाळी आल्यावर, पहिल्यांदा एखाद्या मुलाच्या प्रेमात पडल्यावर, लग्नानंतर ते अगदी स्वतः एका मुलीला जन्म दिल्यावर… तुमच्याप्रमाणे हीच सगळी उत्तरं माझ्याही डोक्यात आली. पण तितक्यात सहज म्हणून एक पॉडकास्ट ऐकल्यावर जाणीव झाली की, आपण समाज म्हणून किती बदललो आहोत. एखाद्या मुलीला घृणास्पद वाटावी अशी नजर किंवा स्पर्श जेव्हा एखाद्या तृतीयपंथी महिलेला ती महिला आहे याची जाणीव करून देतो तेव्हा त्या क्षणाला सगळेच विचार स्तब्ध होतात, नाही का?

‘ह्युमॅन्स ऑफ बॉम्बे’ या युट्युब चॅनेलच्या मुलाखतीत अलीकडेच एका सर्जन, इन्फ्लूएन्सर व अभिनेत्रीने आपला हा अनुभव शेअर केला आहे. त्रिनेत्रा हलदर गुम्माराजू हिला आपण ‘मेड इन हेवन’ या प्रसिद्ध सीरिजच्या दुसऱ्या भागात पाहिले असेल. त्रिनेत्रा व्यवसायाने डॉक्टर आहे. त्रिनेत्राने कस्तुरबा मेडिकल कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतले. ‘मेड इन हेवन’ मधील मेहेर हे पात्र त्रिनेत्राच्या आयुष्यावर बेतलेले होते असं एका अर्थी म्हणता येईल. लहानपणापासून तिला मुलगा म्हणून वाढण्यात आले. घरातील पहिला मुलगा या भावनेने तिच्या खांद्यावर नकळतपणे अनेक अपेक्षांचे ओझे लादले गेले. जवळपास २० वर्ष तिने मुलगा म्हणून आयुष्य घालवले. पण जसजशी आपल्या आवडी-निवडीची जाणीव होऊ लागली तसे तिने स्त्री म्हणून जगायचे ठरवले. अखेर फेब्रुवारी २०२३ मध्ये तिने लिंग-बदल शस्त्रक्रिया करुन घेतली.

सर्जरी आधी व नंतर सुद्धा अनेकदा शाळेत, कॉलेजमध्ये रॅगिंगच्या रूपात लोकांनी तिला चिडवलं होतं, पण जेव्हा सर्जरीनंतर पहिल्यांदा एका पुरुषाने रस्त्याला तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला तेव्हा कुठेतरी आपण आता खरोखरच एक स्त्री आहोत याची जाणीव झाली, असे त्रिनेत्राने ह्युमॅन्स ऑफ बॉम्बेच्या मुलाखतीत सांगितले आहे. त्रिनेत्रा म्हणाली की, “यापूर्वी अनेकदा लोकांनी चिडवलं होतं पण ते तृतीयपंथी म्हणून… पण मी एक स्त्री आहे किंबहुना माझ्याकडे स्त्रीच्याच नजरेने पाहिले जातेय, याची जाणीव मला त्या दुर्दैवी प्रसंगातून झाली. मी जेव्हा माझ्या मैत्रिणींना याबद्दल सांगितलं तेव्हा त्याही हेच म्हणाल्या, “मुलींच्या आयुष्यात तुझं स्वागत आहे.”

एक स्त्री म्हणून आपल्याला छेडलं जातंय, यामध्ये आपल्याकडे स्त्री म्हणून पाहिलं जातंय ही ‘सिल्व्हर लायनिंग’ शोधणं कदाचित आशावादी असेल. पण आज स्त्रीत्वाची ओळख अशा पद्धतीने होणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. असं म्हणतात ना, की एखादी नावडती गोष्टी अनेकदा घडत गेली की ती आवडते असं नाही पण सवयीचे होते. ही गोष्ट घडू नये असं अनेकदा वाटत असतं, पण ती घडली नाही तर ते न घडणं सुद्धा विचारात पाडणारं असतं. तसाच काहीसा विचार या छेडण्याच्या, पाहण्याच्या बाबतही घडत चालला आहे असं या प्रसंगावरून लक्षात येतं. अगदी प्रामाणिकपणे विचार केलात तर आता कदाचित तुमच्याही मनात अशा अनेक मैत्रिणी असतील, ज्या अजूनही स्वतःच्या सौंदर्याची खात्री पटवून घेण्यासाठी छेडलं जाण्याची नाही पण निदान पाहिलं जाण्याची वाट पाहतात. यामागे असलेला कमी आत्मविश्वास हा मुद्दा बाजूला ठेवून विचार केला तर आपल्या लक्षात येईल की, आपल्याकडे का बघतायत यापेक्षा आपल्याकडे पाहिलंच जात नाहीये हे दुःख जास्त बोचणारं असू शकतं.

हे ही वाचा <<सानिया मिर्झा घटस्फोट घेतेय ऐकलं.. मला का नाही जमलं?

असे विचार टाळण्यासाठी सर्वात आधी प्रत्येकीने आत्मविश्वासावर काम करणं खूप गरजेचं आहे, हे नक्की. पण जितक्या सहजतेने आपण छेडलं जाणं, कुणीतरी स्पर्शून जाणं, कुणीतरी तोंडाचा घाणेरडा चंबू करून अश्लील इशारेवजा आवाज करणं, या गोष्टीकडे पाहतोय ती सहजतासुद्धा दूर होण्याची जास्त गरज आहे. तू मुलगी आहेस मग हे सगळं होणारच, याची सवय होण्याआधीच हे थांबवणं गरजेचं आहे. अगोदरच महिलांच्या विषयी अनेक गोष्टी गृहीत धरल्या जातात, हे नव्याने सांगायला नको. घरकामापासून ते आईपणापर्यंत अनेक बेड्यांमध्ये निवड न देता आपण अडकलो आहोत त्यात आता “मुलगी आहेस म्हणजे छेडलं जाणारच” ही बेडी वाढता कामा नये. मुलींच्या बाबत “चुकीचं घडतं, घडू नयेच पण घडतं” हे मान्य करून सुस्कारे सोडण्याची ही गोष्ट नाही, सांत्वन करण्याची तर त्याहून नाही. जे घडतंय त्याची सवय होऊ नये यासाठी आपल्या सर्वांनाच एक समाज म्हणून अधिक काम करावं लागेल!

Story img Loader