पूजा सामंत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनुपम खेर यांच्या सोबत ‘सिग्नेचर’, कंगना रानावत हिच्यासोबत तिच्या दिग्दर्शनात असलेल्या ‘इमर्जंन्सी’, ज्यात मी इंदिरा गांधी यांची मैत्रीण पुपुल जयकर यांची व्यक्तिरेखा साकारत आहे तो आणि संजय मिश्रा यांच्याबरोबरचा ‘बनारस’, ज्याचं चित्रीकरण सध्या सुरु आहे, असे काही वेगळ्या भूमिका असलेले चित्रपट करते आहे. स्तनाच्या कर्करोगातून बाहेर आल्यानंतर माझ्या आयुष्यात खूप काळानंतर सुखाच्या प्रकाशाची तिरीप आली आहे. मी तो आनंद उपभोगते आहे. ‘आज फिर जीने की तमन्ना है…’ अशी माझी अवस्था आहे.” अभिनेत्री महिमा चौधरी सांगत होती.

बॉलिवूड शोमॅन सुभाष घई यांची ‘खोज’ असलेल्या अभिनेत्री महिमा चौधरीनं घई यांच्या ‘परदेस’ मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. तिच्या पहिल्याच चित्रपटात तिचा नायक शाहरुख खान होता. ‘परदेस’ नं घवघवीत यश मिळवलं आणि महिमाची रुपेरी कारकीर्द सुरु झाली. दरम्यान, महिमाचं लग्न आर्किटेक्ट बॉबी मुखर्जीशी २००६ मध्ये झालं होतं. महिमा आणि बॉबी यांना आर्याना ही मुलगी आहे, जी आता १५ वर्षांची आहे. परंतु वैवाहिक आयुष्यातल्या मनस्तापामुळे २०१३ दोघेही विभक्त झाले. आयुष्य आता कुठे शांत श्वास घेत होतं तेवढ्यात, २०२० मध्ये महिमाला ‘ब्रेस्ट कॅन्सर’चं निदान झालं. आणि तिच्या कारकिर्दीला खिळ बसली!

आणखी वाचा-चॉइस तर आपलाच: पन्नाशीनंतरच्या फ्रस्टेशनमध्ये अडकला आहात?

महिमाचं व्यक्तिगत आयुष्य आणि तिची कारकीर्द अनेक चढ-उतार म्हणण्यापेक्षा उतारांनी विस्कटली असली तरी तिनं आता कर्करोगावर मात केली आहे. सध्या ही ‘परदेस गर्ल’ अनेक चित्रपटांमध्ये काम करते आहे. महिमा चौधरीशी भेट झाली ती ‘एसबीआय लाईफ’ तर्फे आयोजित ‘थँक्स अ डॉट’ या कार्यक्रमादरम्यान. ऑक्टोबर महिना ‘ब्रेस्ट कॅन्सर अवेरनेस मंथ’ म्हणून पाळला जातो. त्यानिमित्ताने तिलाही आमंत्रित करण्यात आलं होतं. योग्य उपचार आणि सकारात्मक विचारशैलीच्या बळावर तिने कर्करोगाशी तीन हात केले आणि सगळ्यांना दाखवून दिलं की कर्करोगालाही हरवता येतं.

पण त्याला हरवण्यापर्यंतचा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. महिमा सांगत होती, “कर्करोगाचं निदान झाल्यावर मला अक्षरश: रडू कोसळलं. ट्रिटमेंटचा ससेमिरा सुरुच झालाच नंतर. किमोथेरपीमध्ये माझे केस गेले. त्याच दरम्यान फिल्म इंडस्ट्रीमधील माझे ज्येष्ठ सहकारी अनुपम खेर यांनी फोन केला. त्यांनी मला त्यांच्या ‘सिग्नेचर’ चित्रपटासाठी गळ घातली. गजेंद्र अहिरे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. अनुपम यामध्ये मध्यवर्ती भूमिकेत तर मी त्यांच्या पत्नीची भूमिका करावी, अशी त्यांनी मला विनंती केली. त्या क्षणी माझ्या अश्रूंचा बांध फुटला. “अनुपम, मै कैसे फिल्म कर सकती हूँ? मेरे सिर पर तो बाल ही नहीं बचे। मैं गंजी हो चुकी हूँ।” असं सांगत मला कर्करोग झाल्याचं त्यांना सांगितलं. त्यांनी मला खूप समजावलं. म्हणाले, “ आपण विग लावू शकतो, पण तू हा चित्रपट सोडू नकोस. तुझा आजार कायम राहणार नाही, त्याला तोंड दिलंस तर जीवनात पुढे जाशील.” अनुपम यांनी मला माझा व्हिडीओ तयार करण्यास सांगितला. मी तोपर्यंत जगाचा सामना करायला टाळत होते. ग्लॅमर जगतात राहून सौंदर्यालाच महत्व असतं, असंच मला वाटत होतं, पण मी या टिपिकल कोषातून बाहेर आले. माझं कुटुंब, चित्रपटसृष्टीतील अनेक मित्रमैत्रिणी यांनी खूप पाठबळ दिलं आणि अखेर मी कर्करोग मुक्त झाले. आता आयुष्याने आणखी एक संधी दिली आहे. त्याचा चांगला उपयोग मी करून घेणार आहे.”

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress mahima chaudhary interview about the cancer recovery journey mrj
Show comments