‘पॅन इंडिया’च्या सध्याच्या युगात वेगवेगळ्या भाषांमधले कलाकार इतर भाषांमध्ये काम करताहेत. त्यातले बहुतेक कलाकार त्या भाषेत काम करताना भाषेचं ज्ञान नसल्यामुळे आपल्या संवादांचं ‘डबिंग’ स्वत: करत नाही. परंतु केवळ घोकंपट्टी करून कॅमेऱ्यासमोर संवाद म्हटले, तर त्यात आत्मा उतरत नाही, असंही मत काही कलाकार मांडतात. मीरा चोप्रा ही त्यातलीच एक अभिनेत्री.
“मी अनेक दाक्षिणात्य चित्रपट केले. पण त्यात काम करणं म्हणजे अभिनयाचं सोंग आणण्यासारखं मला वाटे! कारण मी मूळची पंजाबी; अनेक तमिळ आणि तेलुगू चित्रपटांत काम करूनही या भाषा शिकणं मला कधी जमलं नाही. केवळ संवादांची घोकंपट्टी करून मी कॅमेऱ्यासमोर वेळ निभावून नेत असे. कालांतरानं मला याचा कंटाळा यायला लागला. या भाषांवर मला प्रभुत्त्व मिळवता आलं नाही ही मी माझी चूक मानते. ज्या भाषेत संवाद म्हणायचे आहेत, ती भाषा मला समजली पाहिजे, अभिनय करताना त्यात यांत्रिकपणा न येता आत्मा उतरला पाहिजे, असं मला वाटतं.” असं मत मीरा चोप्रानं मांडलंय.
जवळपास १४ दाक्षिणात्य चित्रपटांत काम केलेल्या आणि सध्या ‘ओटीटी’ माध्यमात जम बसवू पाहणाऱ्या मीरानं आपल्या आतापर्यंतच्या करिअरविषयी गप्पा मारल्या. त्या वेळी आपण दाक्षिणात्य चित्रपट करणं कमी करण्याबाबतही तिनं सांगितलं.
हेही वाचा… घोडबंदरमधील काही भागात उद्या पाणी नाही
“कदाचित प्रयत्नांची पराकाष्ठा करून मला दाक्षिणात्य भाषा शिकता आल्या असत्या. पण भाषा शिकण्याचं स्वारस्य माझ्यात मुळातच नसावं! सध्या अनेक उत्तर भारतीय अभिनेत्री दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत रममाण झाल्यात. त्यांनी दाक्षिणात्य भाषांचं तंत्र कसं अवगत केलं कोण जाणे…” असं मीरा म्हणाली.
प्रियांका चोप्रा आणि परिणीती चोप्रा या मीराच्या चुलतबहिणी! “इतकी वर्षं उलटली, तरी ‘प्रियांकाने तुझ्या करिअरबद्दल मदत का केली नाही?’ असा प्रश्न मला विचारला जातो,” असं मीरानं सांगितलं. “आम्ही चोप्रा सिस्टर्स आपापल्या करिअरमध्ये आणि आयुष्यात पुढे गेलो आहोत. उगाच बहिणींत तुलना करू नका,” असंही ती म्हणाली.
हिंदीत ‘१९२० लंडन’, ‘सेक्शन ३७५’ या चित्रपटांत मीराच्या कामाचं कौतुक झालं होतं. सध्या ती तिच्या नुकत्याच ‘झी फाईव्ह’वर प्रसिद्ध झालेल्या ‘सफेद’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीत मग्न आहे. लेखक-दिग्दर्शक संदीप सिंग यांच्या या चित्रपटात मीरानं ‘काली’ या विधवेची भूमिका साकारली आहे. तिचं एका तृतीयपंथीयावर प्रेम जडतं, अशी ही कथा आहे. अभय वर्मा यानं तृतीयपंथी ‘चांदी’ची व्यक्तिरेखा साकारली आहे. ही गोष्ट सत्यघटनेवर आधारित असल्याचं मीरानं सांगितलं.
ओटीटी व्यासपीठाबद्दल बोलताना ती म्हणाली, “टाळेबंदीच्या काळात घरबसल्या मनोरंजनाचा एक पर्याय असणारा ओटीटी प्लॅटफॉर्म आता बॉलीवूडला टक्कर देतोय, ही कमाल आहे! हल्लीच्या प्रेक्षकाला विशुद्ध मनोरंजन हवं आहे. नावीन्य असलेले आशयप्रधान हवेत. हे ओटीटीवर उपलब्ध आहे.”
मीराच्या आगामी ‘सुपरवूमन’ या राज शांडिल्य दिग्दर्शित चित्रपटात तिनं एका समलैंगिक स्त्रीची भूमिका वठवली आहे.
lokwomen.online@gmail.com