“ ‘बॉलिवूड’ आता अधिक पुरोगामी झालं आहे. कथा आणि पात्रांना अधिक महत्त्व आलं आहे. आई म्हणजे केवळ ‘गाजर का हलवा परोसणारी’ आई उरलेली नाही. आईच्या भूमिका, नायिकेच्या भूमिकाही नायकांइतक्या तोलामोलाच्या ठरत आहेत. आजच्या काळातल्या अनेक अभिनेत्री विवाहित आहेत आणि आईसुद्धा आहेत. तरीही त्यांना मध्यवर्ती भूमिका मिळत आहेत. माझ्या उमेदीच्या काळात असं नव्हतं. सगळं ‘स्टीरिओटिपिकल’ (ठरीव) होतं. काश! तेव्हा असा माहोल असता, तर कदाचित मला चित्रपटांपासून दूर व्हावं लागलं नसतं…’’ हे मत आहे अभिनेत्री नीलम कोठारी-सोनी हिचं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नीलमनं १९९० आणि २००० च्या दशकात अनेक यशस्वी चित्रपटांत अभिनय केला आहे. १९८४ मध्ये नीलम आणि करण शहा या नव-कलाकारांच्या जोडीचा ‘जवानी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. पुढे नीलम आणि गोविंदा या जोडीचे १५ चित्रपट आले आणि गाजलेही. त्या वेळी नीलम कोठारीला ‘बेबी डॉल’ म्हणून संबोधत असत. राजश्री प्रॉडक्शन्सचा ‘हम साथ साथ हैं’ आणि करण जोहरचा ‘कुछ कुछ होता हैं’ हे तिनं काम केलेले शेवट-शेवटचे चित्रपट. १८ वर्षांनंतर अलीकडेच नेटफ्लिक्सवर ‘फॅब्युलस लाईव्हज् ऑफ बॉलिवूड वाईव्ह्ज’ या कार्यक्रमात ती झळकली. चित्रपटसृष्टीला ‘बाय बाय’ केल्यांनतर नीलमनं ‘नीलम ज्वेल्स’ हा ब्रँड सुरू केला आणि ज्वेलरी डिझायनर आणि इंटिरिअर डिझायनर अशी कारकीर्द सुरू ठेवली. नुकतीच एका कार्यक्रमानंतर भेटलेली नीलम हिंदी चित्रपटसृष्टी आता किती बदलली आहे, या विषयावर गप्पा मारत होती.

हेही वाचा… स्त्रिया आणि मुलं मोजताहेत युद्धाची किंमत!

‘माझ्या काळी चित्रपटसृष्टीत आतासारखी परिस्थिती असती तर कदाचित मला सबॅटिकल (गॅप) घ्यावा लागला नसता,’ असं सांगणारी नीलम आपल्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल सांगत होती. “माझा जन्म हॉंगकॉंगचा आणि बालपणही विदेशातच गेलं. शिक्षण युनायटेड किंग्डम आणि अमेरिकेत झालं. त्यामुळे व्यक्तिमत्वात विदेशी संस्कृतीची सरमिसळ होती. नृत्याची आवड असल्यानं मी शाळेत असल्यापासून जॅझ, बॅले नृत्य शिकत होते. स्केटिंग शिकले. सुट्ट्यांमध्ये मी भारतात नातेवाइकांकडे येत असे. तेव्हाच एकदा निर्माता रमेश बहल यांनी मला ‘जवानी’ या चित्रपटासाठी विचारलं. मग चित्रपटांत काम करणं सुरू झालं आणि २००० च्या दशकापर्यंत करिअर सुरू राहिलं. ‘हम साथ साथ हैं’ या सोज्वळ चित्रपटानं माझी पहिली ‘इनिंग’ मी संपवली आणि आताच्या प्रचलित भाषेत ‘सॅबेटिकल’ घेतला. नंतर लग्न केलं, आहनाची आई झाले. इंडस्ट्री सोडल्यावर दागिन्यांच्या कौटुंबिक व्यवसायात उतरण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतला. व्यवसायाला पुरेसा वेळ दिला.”

‘खरं म्हणजे माझ्या वयाच्या समस्त स्त्रियांनी आपल्या आवडीच्या कामात व्यग्र असलं पाहिजे. आर्थिक गरज असो नसो पण शरीरापेक्षा मन व्यग्र राहिलं पाहिजं,’ असं नीलम म्हणाली. तिच्या मते मन आणि तन कामात, छंदात गुंतून राहिलं, तर शारीरिक-मानसिक आजार शक्यतो दूर राहतात.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress neelam kothari soni shared her experience of bollywood and movies during her period was stereotypical dvr
Show comments