वंदना गुप्ते

गेल्या ५० वर्षांच्या माझ्या अभिनय कारकिर्दीत प्रत्येक टप्प्यावर माझं एक वेगळं नातं माझ्या प्रत्येक नाटकाच्या चमूबरोबर, रसिकांबरोबर आणि माझ्या घरातल्यांबरोबर जुळत गेलं. कारण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जसजशी नवीन नाटकं येत गेली, तसतशी नवीन जबाबदारी वाढत गेली. खरंतर जेव्हा मी या क्षेत्रात आले, तेव्हा मी काही ठरवलं नव्हतं, की आपण या क्षेत्रात कसं काम करायचं किंवा नेमकं काय करायचं. जे जे माझ्या पदरात पडत गेलं ते ते तसं तसं मी करत गेले. आमचं लग्न जेव्हा ठरलं तेव्हा माझा नवरा शिरीष मला म्हणाला होता, की आमच्याकडे काही नाटकात काम करणं वगैरे चालणार नाही. तेव्हा मी त्याला अगदी सहज होकार दिला होता. कारण छान संसार करावा, मुलं असावी, घर संसार सांभाळावा या सगळ्याची मला खूपच आवड होती. त्यामुळे लग्नानंतर संसाराची स्वप्नं बघतच मी गुप्तेंच्या घरी आले. पण जेव्हा मी सासरी आले तेव्हा सासू-सास-यांनी मला खूपच पाठिंबा दिला. एकतर त्यांना माणिक वर्मांची मुलगी आपल्या घरी येतेय याचं खूप कौतुक होतं, शिवाय तिचे कलागुण आपण का दाबून ठेवायचे ही त्यांची धारणा होती. खरंतर शिरीषला या त्यांच्या विचारांची कल्पना नव्हती, म्हणून त्यानं मला आधी काम न करण्याविषयी सांगितलं होतं. पण नंतर सासू सासऱ्यांच्याच पाठिंब्यामुळे मी पन्नास वर्षांहून अधिक काळ अभिनय क्षेत्रात यश मिळवू शकले. मी घरी नाही म्हणून त्यांनी मुलांची कधी आबाळ होऊ दिली नाही आणि मुलांना कधी ती कमतरताही भासू दिली नाही.

maharashtra government defends ladki bahin yojana in bombay high court
महिला सशक्तीकरणासाठी ‘लाडकी बहीण’; राज्य शासनाचे उच्च न्यायालयात उत्तर; अतिरिक्त भार पडत नसल्याचे स्पष्टीकरण
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
PM Modi to dedicate 3 frontline naval combatants to nation
आत्मनिर्भरतेतील आव्हाने!
Success Story of a man Who Started Mushroom Farming Business With His Mother
Success Story : मायलेकाने केली कमाल! दररोज कमावतात ४० हजार रुपये; जाणून घ्या, कोणता व्यवसाय करतात?
बारामतीत कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून नाराजी नाट्य; खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Haldi Kunku Gift Ideas for Womens in Budget
Makar Sankranti Gift Idea: सुवासिनींना यंदा हळदी-कुंकवासाठी ‘वाण’ काय द्यायचं? पाहा ‘या’ भन्नाट आयडिया; खर्च कमी आणि वस्तूही उपयोगी
chaturanga  article on Menstruation and menopause
ऋतुप्राप्ती ते ऋतुसमाप्ती : सर्जनशीलतेच्या वाटेवर चालताना
pune best city for women loksatta news
महिलांना काम करण्यासाठी सर्वोत्कृष्ट असलेल्या पहिल्या पाच शहरांत पुण्याला स्थान

खरंतर नाट्य संसार आणि घर संसार नेहमीच वेगळा होता. नाट्य संसारात स्थळ, काळ, वेळेचं काही गणितच नव्हतं. म्हणजे घरी जेवणाखाण्याची वेळ किंवा सणासुदीचे, सुट्टीचे दिवस या सगळ्या वेळी मी बाहेर प्रयोगाला असायचे. सगळं टाइमटेबलच वेगळं असायचं. पण ती आवड होती त्यामुळे सगळं करताना एक वेगळाच आनंद होता.

मुलं लहान होती तेव्हा त्यांची शाळा, अभ्यास, त्यांच्याविषयीची सगळी कर्तव्यं मी घरच्यांच्या मदतीनं पार पडली. त्याचा कधी ताण नव्हता माझ्या मनावर. कारण माझी ‘सपोर्ट सिस्टीम’ उत्तम होती. सासू-सासरे तर होतेच, माझ्या बहिणीही होत्या. सगळ्यांची मदत व्हायची. काही अडचणी आल्याच तर मध्यममार्ग काढायचा. त्या दिवसांत वेळेचं व्यवस्थापन मी उत्तम जमवलं होतं. जेव्हा वेळ असेल तेव्हा मी पूर्ण वेळ मुलांसोबत असे. त्यांच्याबरोबर ‘क्वालिटी टाईम’ घालवत असे. आमच्या आईचंही मी पाहिलं होतं, की तिनंही तिचं करिअर सांभाळून आम्हाला पुरेसा वेळा दिला होता. संपूर्ण कुटुंब तिच्या पाठीशी होतं. म्हणून तीही आपलं गाणं करू शकली. अर्थात याची जाणीव तिला होती, तशीच मलाही ती होती. नाट्यक्षेत्रात आज मी जे काही करू शकले ते घरच्या पाठिंब्यामुळेच. सासूबाईंनी तर मला निक्षून सांगितलं होतं, की घरचे रितीरिवाज, सणवार सगळं मी बघेन. तू तुझं करिअर कर.

मला आठवतं, आम्ही जेव्हा जुहूला राहायला गेलो. तेव्हा मुलं थोडी मोठी झाली होती. पण मी चित्रीकरणासाठी गेले की मुलं शाळेतून यायच्या आधी रोज सासूबाई रिक्षा करून घरी यायच्या, मुलांना काय हवं नको ते बघायच्या आणि मग घरी जायच्या. कित्येक दिवस मला ही गोष्ट माहीतही नव्हती. कारण त्यांनी त्याचा कधी गाजावाजा नाही केला. किंवा मला त्या गोष्टीचं कधी ‘गिल्ट’ही येऊ दिलं नाही. त्या आनंदानं करत राहिल्या. या सगळ्यामुळेच नाटकाचा प्रत्येक प्रयोग मी यशस्वीपणे करू शकले. स्टेजवर एन्ट्री घेतली की सगळ्या गोष्टी मागे सारून मनापासून प्रयोग करणं हे मुळात होतंच. मात्र मुलं लहान असताना आईची होणारी घालमेल- ती मात्र टाळता आली नाही.

मला आठवतं, मी ‘अखेरचा सवाल’ नाटक करत होते, त्यावेळची गोष्ट. स्वप्ना- माझी धाकटी मुलगी, फक्त तीन महिन्यांची होती. ‘अखेरचा सवाल’चा १४ दिवसांचा दौरा होता. इंदोर, भोपाळ, ग्वाल्हेर असा दौरा. त्या दिवसात फोनही नव्हते. ट्रंक कॉल लावावा लागे. तो लागायलाही वेळ जायचा. त्यामुळे कित्येक दिवस घरच्यांशी संपर्कच होत नसे. तीन महिन्यांच्या स्वप्नाला घरी ठेवून जाताना खरं तर माझ्या जीवावरच आलं होतं. तिचा पोलिओचा डोसही द्यायचा राहिला होता. शिरीषनी आणि सासूबाईंनी सगळं सांभाळून घेतलं म्हणून मी जाऊ शकले. स्वप्ना त्यावेळी नुकते हुंकार घ्यायला लागली होती. मी माझ्याकडे असलेल्या छोट्या टेपरेकॉर्डवर ते हुंकार रेकॉर्ड करून नेले होते. दौऱ्यात प्रयोग संपल्यावर रात्री मुलांची खूपच आठवण येत असे. मग त्यावेळी मी ते हुंकार ऐकायची आणि रडायला लागायची. मी रडते म्हणून (अभिनेत्री) दया डोंगरेला रडायला यायचं. आम्ही दोघी रडतोय पाहून (दिग्दर्शिका) विजया मेहतांना त्यांच्या मुलांची आठवण येत असे आणि आम्ही सगळ्या रडतोय पाहून आमच्याबरोबरची पुरुष मंडळीही घरापासून इतके दिवस लांब असल्यानं हळवी होत असत! एकूण ते सगळं वातावरण हळवं होऊन जात असे. पण आम्ही एकमेकांना आधार दिला. किंबहुना या सगळ्यांच्या आधारानंच मी तो दौरा पार पाडू शकले.

आम्ही नाटकात काम करतो म्हणजे मजा करतो असा अनेकांचा समज असतो आणि मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा तर तो खूपच होता. त्यामुळे सणासुदीला आपण घरी नसतो, मुलांच्या सगळ्या कार्यक्रमांना मी नाही, ही अपराधीपणाची भावना त्या दिवसांत माझ्या मनात खूप होती. त्यामुळे मुलांसाठी जास्तीत जास्त वेळ कसा देता येईल याचा मी नेहमी विचार करत असे. अर्थात माझ्या जबाबदाऱ्या आणि माझी कर्तव्यं मी कधी टाळली नाहीत. पण एक प्रसंग असा घडला की ज्यानं माझे डोळे खाडकन उघडले. आमच्या सोसायटीत फॅन्सी ड्रेस स्पर्धा होती. माझा मोठा मुलगा अभिजीत- त्याला लोकमान्य टिळक केलं होतं आणि धाकटी स्वप्ना भाजीवाली झाली होती. तिच्यासाठी मी खास नऊवारी शिवली. त्या दोघांना तयार केलं, त्यांची रंगीत तालीम होती तेव्हाही मी हजर होते. अभिजीतही तेव्हा तसा लहानच होता. रंगीत तालीम झाल्यावर तो सहजच बोलून गेला. ‘ममा, कार्यक्रमाला तू नसशीलच ना?’ त्याचं ते बोलणं मला खटकलं. अभिजीत ते निरागसपणे बोलला होता. पण माझं नसणं त्यानं असं गृहित धरलं होतं ते वाईट होतं. त्यानंतर मात्र मी प्राधान्य कशाला द्यायचं हे पक्कं ठरवलं. नाहीतर, महिन्याला ४०-४५ प्रयोग करणारी मी ठराविक प्रयोगांनंतर थांबू लागले. सणासुदीला घरी थांबणं शक्य नसायचं, कारण प्रेक्षकांना सुट्टी असेल तेव्हाच नाटकाचा प्रयोग असे. पण मी एवढं नक्की ठरवलं मुलांचे वाढदिवस हाच माझा सण आणि मग त्या दिवशी प्रयोग किंवा शूटिंग करायचं नाही. त्या छोट्या मुलाच्या एका वाक्यानं माझ्या ‘प्रायोरिटीज’ मी विचारपूर्वक बदलल्या.

बऱ्याच स्त्रिया जेव्हा आपलं करिअर करण्यासाठी घराबाहेर पडतात तेव्हा एक गिल्ट मनात असतं. विशेषतः तुमच्या पैशांची घरी गरज नसते तेव्हा ते जास्त असतं. माझ्या बाबतीत ते झालं. जे काही मी केलं ते माझ्या आनंदासाठी केलं. कारण घर छान चाललं होतं. मुलांचं संगोपन छान चाललंय आणि मला वेळ देता येत नाही, मग अशा वेळी तो गिल्ट मनात येतो.

मग मी मुलं लहान असताना छोट्या छोट्या दौऱ्यांवर त्यांना घेऊन जात असे. ९ ते ५ ऑफिस करणाऱ्यांचं वेगळं असतं आणि आम्ही २४ तास एका वेगळ्या क्षेत्रात काम करत असतो. त्यामुळे आपली आई काय करते हे मुलांना कळायला हवं. मेकअप करणं, रंगीत तालीम, प्रत्यक्ष नाटकाचा प्रयोग या सगळ्या गोष्टी मुलांना त्यामुळे कळत गेल्या.

माझ्या प्रत्येक नाटकाचंही एक कुटुंब झालेलं आहे. आजही आम्ही भेटतो. आमचं हे नातंही माझ्या मुलांना उत्तम ठाऊक आहे. त्यामुळे कुटुंब म्हणून आमचं बाँडिंग खूप छान आहे. आम्ही चौघं एकत्र असताना इंग्लिश चित्रपट पाहिले, गाण्याचे कार्यक्रम ऐकले. आम्हाला सगळ्यांना फिरायला खूप आवडतं. शिरीष वकिली क्षेत्रात आहे. त्यामुळे त्याला मे महिन्यात, दिवाळीत नेहमी सुट्टी असते. मग या सुट्टीत दरवर्षी आम्ही एकत्र खूप भटकंती केली. आता मुलीचं- स्वप्नाचं लग्न झालंय. माझा जावई ऑईल इंडस्ट्रीत आहे. त्यामुळे तो जगभर वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो. स्वप्नानं ट्रॅव्हल-टुरिझमचा कोर्स केला होता. ती जेव्हा स्कॉटलंडला होती तेव्हा तिनं त्या क्षेत्रात नोकरीही केली, मग ती हॉलंडमध्ये होती, आता वेस्ट इंडिजला आहे. तिला पाककलेचीही खूप आवड आहे. त्यामुळे तिथल्या शेल कॉलनीतल्या लोकांसाठी इंडियन कुकिंगचे क्लासेस ती घेते.

अभिजीत स्क्रिप्ट रायटिंग करतो. ते चार मित्र मिळून संकल्पना विकसित करतात. स्क्रीन-प्ले लिहून फिल्मसाठी गोष्टी तयार करून देतात. ‘इमॅजिका’च्या प्रॉडक्शन टीममध्येही तो होता. अभिजीतला याची आवड होतीच. तो माझ्याबरोबर जेव्हा दौऱ्यावर यायचा, तेव्हा त्या नाटकातल्या संवादांपासून संगीतापर्यंत सगळं त्याला पाठ असायचं. नाटकाचा असा झालेला संस्कार आज त्याला करिअरसाठी खूपच उपयोगी ठरला.

मुलाच्या जडणघडणीत शिरीषचं योगदानही तितकंच मोलाचं आहे. माझं आणि शिरीषचं नातं इतकं घट्ट होतं, की आम्ही एकमेकांसोबत एकमेकांना समजून घेतच वाढलो. नाटकाच्या माझ्या कारकिर्दीबाबत एक गोष्ट मी कटाक्षानं पाळली आहे- प्रत्येक नाटकाचं वाचन मी शिरीषबरोबर करत असे. त्यालाही नाटक आवडलं, की मगच होकार देत असे. मला ज्या काही भूमिका मिळाल्या त्यात मी समाधानी होते, त्यामुळेच माझा घर संसार आणि नाट्य संसार मी यशस्वीपणे करू शकले.

शब्दांकन- उत्तरा मोने

Story img Loader