अधिकमास नुकताच संपला. पण त्याचं कवित्व अद्याप संपलेलं नाही. जोरदार जेवणाचा बेत, जावयांना मखरात बसवण्याचे उपक्रम आणि खूप सारे फोटो. इन्स्टाग्राम पाहा किंवा फेसबुक- अधिकमास, धोंड्याचं जेवण या सदराखाली सुरू झालेले चोचले अजूनही दिसत आहेत. मानसन्मान, कौतुक यात काही वावगं नाही पण सगळे करतात म्हणून तयार झालेल्या प्रथेसाठी वेळ, पैसा, ऊर्जा खर्ची घालणं किती व्यवहार्य आहे?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अधिकमासात जावयाचा मानसन्मान करायचा असतो. ही प्रथा प्रत्येक प्रांतानुसार बदलत जाते. कोकणात जावयाला फक्त जेवायला बोलावलं जातं तर अनेक ठिकाणी जेवायला बोलावून मानपानाच्या नावाखाली भेटवस्तूही दिली जाते. या भेटवस्तूंच्या रुपाने पुन्हा हुंडा पद्धतीला बळ मिळतंय की काय असं वाटू लागलंय. अनेक ठिकाणी मुलीचे पालक हौस किंवा आनंद म्हणून जावयाला भेटवस्तू देत असतील तर काही वावगं नाही. पण समाजाचं दडपण घेऊन एखादा बाप कोणाकडून तरी उसने पैसे घेऊन जावयाचा मानपान करत असेल तर त्याला विरोध व्हायलाच हवा.

हेही वाचा >> स्त्री-स्नेही दारूचं दुकान निघालं… बिघडलं काय?

त्याचं झालं असं की, मानसीचं नुकतंच लग्न झालं. मे महिन्यात धुमधडाक्यात लग्न लावून दिल्यानंतर तिच्या वडिलांचं अक्षरशः दिवाळं निघालं. एकुलत्या एका लेकीचं धुमधडाक्यात लग्न लावताना तिच्या वडिलांना आयुष्यभराची पुंजी खर्ची घालावी लागली. लग्नाला दोन महिने झाले नाहीत तोवर आला धोंड्याचा महिना. लग्नात जावयासाठी काही खास (खास म्हणजे सोनं-नाणं-गाडी-बंगला बरं का) केलं नाही. मग निदान अधिकमासात तरी जावयाला काही तरी द्या, अशी चेष्टावजा मागणी तिच्या सासरच्यांकडून सुरू झाली. बिचारा बाप तरी काय करणार? एकुलत्या एका लेकीसाठी आपण इतकंही करू नये? असा प्रश्न वडिलांना पडला. एकुलता एक जावई आहे, नुकतंच लग्न झालंय, पुन्हा अधिकमास येईल तेव्हा काय परिस्थिती असेल, हा सगळा विचार करून त्यांनी जावयाला एक तोळ्याची चेन बनवली. लेकीला आनंद झाला. जावईही खूश. गरीब म्हणता म्हणता आपला सासरा एवढा श्रीमंत आहे हे आपल्याला माहितच नव्हतं असं जावयाला वाटलं. पण बापाने कर्जाने पैसे उचलले आणि नवऱ्याला सोन्याची चेन केली याची मानसीला सुतराम कल्पना नव्हती. आणि लग्नात दिवाळं निघालेल्या वडिलांकडे एक तोळ्याची चेन बनवायला पैसा आला कुठून हा प्रश्नही तिला पडला नाही. नवलच आहे!

नात्यांमध्ये मानपान, कोडकौतुक व्हायलाच हवेत. पण ते कर्ज काढून, कोणाकडून तरी उसने घेऊन होऊ नये. एखाद्याला काहीतरी द्यावंसं वाटणं हे आतून आलं पाहिजे, प्रथा म्हणून नाही. आणि आपल्या तुटपुंज्या रकमेतून आपण जे काही घेऊ ते समोरच्याला आवडलंही पाहिजे. मग ती एक तोळ्याची चेन असो वा भेट म्हणून दिलेलं गुलाबाचं फूल असो. समाजाच्या दडपणात येऊन प्रथा परंपरा सांभाळून कर्जबाजारी होण्यात काय अर्थ आहे?

दुसरा प्रसंग पूनमच्या घरचा. लग्नाला दोन वर्षे झाली आहेत. दोन वर्षांनी पहिल्यांदाच अधिकमास आला. कधी नव्हे तो जावई सासुरवाडीला आलाय म्हटल्यावर सासू सासऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. जावयाची खास उठबस झाली. अगदी संपूर्ण इमारतीला रोषणाई करायची बाकी ठेवली होती. बाकी सगळा माहौल दिवाळीसारखाच. एखाद्या पारंपरिक कार्यक्रमालाही लाजवेल असा बेत अधिकमासातील कार्यक्रमात करण्यात आला होता. लेक आणि जावई आले. अगदी त्यांच्यावर पुष्पवृष्टीही झाली. गुलाबाच्या पायघड्या घालण्यात आल्या. दोन्ही बाजूला महागडे कॅमेरामन उभे होते. दोघांनी मस्त फुटेजही घेतले (सोशल मीडियाचा सोस म्हणा हवंतर). पायघड्यांवरून आतमध्ये आल्यावर फुलांनी सजवलेल्या टेबलवर दोघांनाही बसवण्यात आलं. टेबलवर सांग्रसंगीत पंचपक्वान होतं. जेवायला सुरुवात करण्याआधी पूनमचे आई-बाबा म्हणाले, “थांबा, आधी हातपाय तरी धुवून घ्या.” दोघेही जागेवरून उठणार तेवढ्यात तिचे बाबा जावयाचे पाय धुवायला खाली वाकले. हा देखणा (?) नजारा टिपून घेण्याकरता अनेकांचे कॅमेरे पुढे सरसावले. आधुनिक काळातही कसे पारंपरिक सोहळे केले जातायत या विचाराने सगळे भावुक झाले होते. जावईही खूश होऊन आपल्या वडिलांच्या वयाच्या व्यक्तीकडून पाय धुवून घेण्यात धन्यता मानत होता.

हेही वाचा >> पालकांच्या मंजुरीशिवाय प्रेमविवाहाला मान्यता मिळणार नाही?

लग्नातही मुलीचे वडील जावयाचे पाय धुतातच की. मग आता आक्षेप असण्यासारखं काय? पण लग्न असो वा अधिक मास किंवा इतर कोणताही सोहळा, आपल्या वडिलांच्या वयाच्या व्यक्तीने आपले पाय का धुवावेत असा प्रश्न संबंधित जावयांना का पडत नसेल? चुकून पाय लागला तरी पाया पडणं हा आपला संस्कार आहे, मग थोरामोठ्यांकडून आपल्या पायाला स्पर्श होतो तेव्हा जावई लोक खजील का होत नाहीत? प्रथा-परंपरा जरूर पाळाव्यात. पण ज्या प्रथांना आजच्या काळात काहीच अर्थ नाही त्याची भलामण करण्यात काय अर्थ आहे?

महत्त्वाचं म्हणजे, अनेक ठिकाणी अधिकमासात जावयाचे पाय धुण्याची परंपराही नाही. भेटवस्तू देण्याचीही परंपरा नाही. पण कोणीतरी कुठेतरी ही प्रथा पाळली आणि इन्स्टाग्राम रिल्सच्या माध्यमातून ती सगळीकडे पसरली. मग प्रवाहासोबत आपल्यालाही राहायलाच हवं म्हणून मॉडर्न प्रथा माणून ती सगळ्यांनी पाळली. यालाच डिजिटल व्हायरस का म्हणू नये?

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adhikmas son in law wash feet ritual in maharashtra sgk
First published on: 17-08-2023 at 15:02 IST