Afghanistan Taliban Rules For Women : तालिबानमध्ये महिलांविरोधातील सामाजिक निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहेत. अफगाणिस्तानच्या तालिबान शासकांनी स्त्रियांच्या आवाजावर आणि सार्वजनिकपणे उघड्या चेहऱ्यावर बंदी लागू केली आहे. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या निर्देशांना सर्वोच्च नेते हिबतुल्ला अखुंदजादा यांनी मान्यता दिली अशी माहिती बुधवारी सरकारी प्रवक्त्यांनी दिली. न्यूज वायरने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
२०२१ मध्ये तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानींनी ‘मिनिस्ट्री फॉर द प्रपोगेशन ऑफ वर्च्यु अँड द प्रीव्हेंशन’ची स्थापना केली होती. याला एमपीव्हीपीव्ही म्हणूनही ओळखले जाते. त्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. नव्याने प्रसिद्ध झालेल्या ११४ पानांच्या दस्तऐवजात दुर्गुण आणि सद्गुण कायद्यांवरील (Vice and Virtue) ३५ लेखांची रूपरेषा दिली आहे आणि सार्वजनिक वाहतूक, संगीत, वैयक्तिक सौंदर्य आणि उत्सव यासह दैनंदिन जीवनातील विविध पैलूंवर याद्वारे लक्ष केंद्रित केले आहे.
हेही वाचा >> तालिबान सरकारकडून अफगाणिस्तानमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन; घराबाहेर पडण्यास महिलांना वाटते भीती
मंत्रालयाचे प्रवक्ते मौलवी अब्दुल गफार फारूक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, “इंशाअल्लाह, आम्ही तुम्हाला खात्री देतो की हा इस्लामिक कायदा सद्गुणांना चालना देण्यासाठी आणि दुर्गुण दूर करण्यासाठी मदत करेल.” या निर्बंधामुळे वैयक्तिक वर्तनावर देखरेख ठेवून उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा मंत्रालयाला अधिकार मिळाला आहे.
कलम १३ मधील प्रमुख तरतुदींनुसार महिलांवरील निर्बंध काय?
- सार्वजनिक ठिकाणी शरीर झाकणे
- कोणताही मोह टाळण्यासाठी चेहरा झाकणे अनिवार्य
- महिलांनी पातळ, घट्ट किंवा लहान नसलेले कपडे घालावेत
- गैर-मुस्लिम पुरुष आणि महिलांच्या समोर स्वतःला झाकून ठेवणे
- सार्वजनिक ठिकाणी गाणे, पाठ करणे किंवा मोठ्याने वाचणंही त्यांना निषिद्ध करण्यात आलं आहे. कारण, त्यांचा आवाज हा जिव्हाळाचा मानला जातो.
- त्यामुळे अनोळखी पुरूष यामुळे स्त्रियांकडे पाहत नाहीत.
- संगीत वाजवणे
- एकट्या महिलांनी प्रवास करणे
- असंबंधित पुरुष आणि स्त्रियांना एकत्र ठेवणे
मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, प्रार्थना आणि इस्लामिक कायद्याचे आणि इस्लामच्या पाच स्तंभांचे पालन करण्याबरोबरच महिलांना हिजाब घालण्यास प्रोत्साहन दिले आहे. इस्लामिक कायद्याद्वारे निषिद्ध मानल्या गेलेल्या कृत्यांना दूर ठेवणे हे देखील नियमांचे उद्दिष्ट आहे.
तालिबान शासकांनी २०२१ मध्ये अफगाणिस्तान देश ताब्यात घेतला. तेव्हापासून आजपर्यंत या देशात तालिबानी सरकारने कठोर धोरणे लागू केली आहेत. तालिबान रोज नवनवीन फतवे काढून महिलांच्या अधिकारांवर गदा आणत आहे. १८ सप्टेंबर २०२१ रोजी तालिबानने माध्यमिक शाळेत जाणाऱ्या मुलींवर बंदी घातली. त्यानंतर २० डिसेंबर २०२२ रोजी तालिबान सरकारच्या उच्च शिक्षण मंत्रालयाने महिलांना शिक्षण घेण्यास बंदी घातली. एवढेच नाही, तर तिथे महिला शिक्षकांवरही बंदी घालण्यात आली आहे. अफगाणिस्तानमध्ये महिला आणि मुलींसाठी जागतिक स्तरावरील सर्वात वाईट परिस्थिती आहे, असे संयुक्त राष्ट्राच्या अहवालात म्हटले होते.