आजकाल शहरात फारशा जत्रा भरत नाहीत आणि भरल्या तरीही आपण वाट वाक़डी करुन तिथे जावं इतकं त्यांचं आकर्षण आपल्याला उरलेलं नसतं. पण त्या दिवशी मी मुद्दाम जत्रेला गेले. नवऱ्याचा आणि मुलांचा नकार गृहीत धरुनच गेले होते. आठवड्यातून एकदा मिळणाऱ्या सुट्टीत मॉलमध्ये सेलचं शॉपिंग करायचं सोडून जत्रेत जायचे भिकेचे डोहाळे त्यांना कशाला लागतील… मी मात्र त्या डोहाळ्यांच्या आहारी जाऊन ते गुपचूप पूर्ण करायचं ठरवलं.
आणखी वाचा : या सुषमा अंधारे आहेत तरी कोण?
मला या जत्रांचं असं फारसं काही आकर्षण वगैरे कधीच नव्हतं. पण लहानपणी आमच्या घराशेजारीच दरवर्षी जत्रा भरायची, तिथे मला आईबाबा घेऊन जायचे. तेवढीच काय ती जत्रेची आठवण. बाकी ओढ, आकर्षण असं काही नाही. पण कधीकधी, पूर्वी केलेली एखादी गोष्ट खूप दिवसांनंतर आपल्या समोर आली की ती पुन्हा करुन बघावीशी वाटते. त्यात त्या गोष्टीबद्दल वाटणा-या आकर्षणापेक्षा, ती करुन बघण्याची उत्सुकता आणि कुतूहलच जास्त असते. तसंच काहीसं झालं माझं. जत्रेला पुन्हा जाण्याच्या उत्सुकतेपोटी माझे पाय आपोआप तिच्या दिशेने वळले.
आणखी वाचा : मेरे पास माँ हैं…
जत्रेत शिरल्या शिरल्या मी नकळत, एवढ्या वर्षात तिच्यात झालेले बदल शोधायला लागले. जत्रेत गर्दीही बरीच होती, बहुदा मॉलमधली सेल शॉपिंग ही अजूनही बहुतेकांच्या गरजेपेक्षा चैनीचाच भाग असावी. मी सभोवार नजर फिरवली. मोबाईलच्या क्लिक्लिकाटाशिवाय मला तिथे फारसा बदल जाणवला नाही. तिथल्या जादूगाराच्या जादूमधली जादूही संपण्याच्याच मार्गावर होती. म्हातारीचे केस विकणारा म्हातारा आपल्या त्याच थरथरत्या हाताने ते गुलाबी केस बनवत होता. जत्रेतलं मुख्य आकर्षण असणारा ‘मौत का कुआ’ अजूनच बटबटीत झाला होता, त्याच्यातल्या त्या मोटारी आणि दुचाकींचे आवाज पूर्वीसारखेच कानाला किटत होते. त्यातलं थ्रिल मात्र टीव्हीवरच्या ‘खतरों के खिलाडी’ ने केव्हाच गिळंकृत केलं होतं. बंदूकीने फुगे फोडण्याचा खेळही जैसे थे होता. लोकं मात्र उगाच बंदूक घेऊन, एखादा फुगा फोडून, स्वतःला राजपुत्र मान.त होते. तोच झगमगाट, तोच गलका, तोच गोंधळ आणि कर्ण्यावरचा तोच कर्णकर्कश आवाज… काहीच बदललं नाहीये, सगळ्ळं तस्संच, जुन्यासारखं, मी मनाशी पुटपुटले आणि तेवढ्यात माझी नजर थोडीशी दूरवर कोपऱ्यात गेली. उंचावर फिरणारा तोच तो आकाशपाळणा पाहून मात्र मला बरं वाटलं, हायसं वाटलं. कित्येक लोकांच्या किंकाळ्या, आरडाओरडा, उलट्या असं सगळं झेलून तो तसाच होता… शांत, संथ, आपल्या चालीने चालणारा, खाली चालणाऱ्या लोकांकडे मिश्किलपणे पाहणारा… तो तस्साच होता.
आणखी वाचा : पोन्नीयिन सेल्व्हन: इथे स्त्रिया राज्य करतात…
मी जत्रेतून निघाले. माझी उत्सुकता आणि कुतूहल आता शमलं होतं. आपलं आयुष्य जसंजसं पुढे सरकतं, तसंतसं कळत नकळत आपल्यात बरेच बदल झालेले असतात, पण कधीकधी आपल्याला वाटणारा बदल हा बदल नसतो, ते वेळेने केलेलं एक स्थित्यंतर असतं. कधीकधी तर आपल्याला कळतही नाही काय बदलतंय, कधी बदलतंय, कसं बदलतंय. मात्र हे सगळं होत असताना, मनात खोलवर कुठेतरी आपण एखाद्या गोष्टीबद्दल ठाम असतो. बदलांच्या या गदारोळात आणि काळाच्या ओघात, आपण ती एक गोष्ट अगदी जशीच्या तशी ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करतो. कारण आपल्याला माहीत असतं की जर ती गोष्ट बदलाच्या आहारी गेली तर माझ्यातली मी कायमची निघून जाईन.
आणखी वाचा : भारतीय क्रिकेट संघाचा तोफखाना : रेणुका सिंह ठाकूर
जत्रेचं जुनं रुप, कुठेतरी अडगळीत पडलेल्या बाहुलीला भसाभसा लाली फासावी तसं नव्याचा कृत्रिम लेप लावून, लोकांना रिझवायचा प्रयत्न करत होतं. मी मात्र समाधानी होते – आभाळात तसाच जुनेपणाने निवांत फिरणारा आकाशपाळणा पाहून!