“रितिका, उगाच चिडचिड करू नकोस आणि नको ते आरोपही करू नकोस, तू गैरसमज करून घेतला आहेस.” रोहन म्हणाला. “गैरसमज नाही आता तर माझी हळूहळू खात्रीच होत चालली आहे. तू घरात आल्याबरोबर तुझी नजर वाहिनीचा शोध घेत असते, तिच्यासाठी काही ना काही सतत घेऊन येत असतोस, तिच्या आवडीचे पदार्थ आणतोस, घरचा स्वयंपाकसुद्धा तिच्या आवडीचा हवा असा तुझा कटाक्ष असतो आणि काल तर, सगळी लाज सोडून तू तिचे पाय चेपत बसला होतास. तुला शोभतं का हे?”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“ रितिका, तू वाहिनीवर आणि माझ्यावर नाही नाही ते आरोप करते आहेस, इतका घाणेरडा आरोप करताना तुला काहीच कसं वाटतं नाही? तिच्या लग्नाला ९ वर्षे झालीत, खूप प्रयत्न आणि उपचार घेतल्यानंतर आता तिला दिवस राहिले आहेत, म्हणून मी तिच्या आनंदासाठी सगळं करतो आहे. काल तिची तब्बेत बरी नव्हती म्हणून तिचे पाय चेपून देत होतो. मी तिची सेवा केली तर बिघडलं कुठं?” रोहन समजूतदारपणे सांगत होता.

हेही वाचा – मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग

“तिचा नवरा तिची सेवा करेल ना. तू कशाला पुढं पुढं करतोस. मला तर संशय येऊ लागलाय, की हे मूल तुमच्या दोघांचं नाही ना?” रितिका चिडून म्हणाली.

“रितिका?” रोहन एकदम ओरडून बोलला आणि तो रितिकावर हात उचलणार एवढ्यात प्रेमाताईंनी त्याचा हात वरच्यावरच धरला आणि त्या म्हणाल्या,

“रोहन अरे, काय तमाशा चाललाय हा?”

“आत्या, तमाशा मी नाही, ती करतेय, माझ्यावर नको ते आरोप करते आहे.”

“ रोहन,मी ऐकलंय सगळं. काहीही झालं तरी अंगावर हात उचलण्याचे आपल्या घरचे संस्कार नाहीत. तू जा बरं इथून, मी रितिकाशी बोलते.” कसंतरी शांत करीत रोहनला त्यांनी त्याच्या रूममध्ये पाठवलं.

रितिकाच्या मनात काय चाललंय, हे प्रेमाताईंनी जाणलं होतं. रोहन आणि रितिकाच्या लग्नाला अवघे तीन महिने पूर्ण होत होते. नव्या नवलाईच्या दिवसांत नवऱ्यानं बायकोचं कोडकौतुक करावं, तिचे हट्ट पुरवावे, तिच्या मागेमागे करावं अशी प्रत्येक नवविवाहितेची इच्छा असते, रितिकाचीही तिच इच्छा होती, पण रोहन वहिनीकडे अधिक लक्ष देत होता, हे तिला खटकतं होतं. आपल्या मनाविरुद्ध घटना घडली की स्वतःचा विवेक हरवून जातो, तसंच तिचं झालं होतं, तिच्या मनातील विचारांना योग्य वळणावर आणण्यासाठी प्रेमाताईंना तिच्याशी बोलावच लागणार होतं.

“रितिका, आपल्या बोलण्याचा दुसऱ्याच्या मनावर काय परिणाम होईल याचा विचार बोलण्याआधी करणं खूप गरजेचं असतं. रमावहिनी आणि राघवदादा यांचं रोहनच्या आयुष्यात खूप महत्वाचं स्थान आहे. राघव आणि रोहनमध्ये १० वर्षाचं अंतर आहे. राघवचं लग्न झालं तेव्हा रोहन अगदी लहान होता. आईच्या निधनानंतर राघवनं एका वर्षाच्या आत लग्न केलं आणि घरातील कर्त्या स्त्रीची जागा आणि रोहनच्या मनातील आईची जागा वहिनीनं घेतली. त्याला हवं नको ते बघणं, त्याचं शिक्षण पूर्ण करून त्याला नोकरी लागेपर्यंत त्याचं सर्व वेळापत्रक सांभाळणं हे सर्व वहिनीनं केलं. तिनं सुरुवातील केवळ रोहनसाठी मुलाचा विचार केला नाही आणि नंतर मूल होण्यासाठी खूप उपचार घ्यावे लागले, वहिनीनं इतके दिवस त्याच्यासाठी सर्व केलं, आता एवढ्या वर्षांनी तिला दिवस गेल्यानंतर त्यानं तिची काळजी घेणं साहजिक आहे. बेटा, संशय आणि मत्सर हे खूप मोठे शत्रू असतात, त्यांना वेळीच आवर घालायला हवा. तू ज्या चष्म्यातून बघशील तसंच तुला दिसेल. तू असं काही बोलत राहिलीस तर रोहन कोलमडून जाईल आणि त्याची मानसिकता लक्षात घेऊन तू त्याच्यासोबत उभी राहिलीस तर तो अखंड तुझ्या प्रेमात राहील. नवऱ्याला आयुष्यभर मुठीत ठेवायचं की मिठीत ठेवायचं, हे आता तुलाच ठरवायचं आहे.”

हेही वाचा – वडिलांचं आडनाव लावण्यासाठी महिलेची थेट कोर्टात धाव, ‘या’ नियमाला दिलं आव्हान! न्यायालयाची भूमिका काय?

प्रेमा आत्याचं सर्व ऐकल्यावर, रितिका खजील झाली. स्वतःच्या विचरांचीच तिला लाज वाटली. वहिनीच्या समर्पणाचीही तिला जाणीव झाली. रोहननं माझंच सगळं ऐकावं, माझ्याच म्हणण्याप्रमाणे वागावं आणि केवळ मलाच महत्व द्यावं हा विचार करून त्याला मी मुठीत ठेवण्याचाच प्रयत्न करीत होते, पण तो माझ्यापासून लांब जात होता. माझे विचारच मला बदलायला हवेत.’ अशी मनातल्या मनात तिची स्वगत चालू होती.

प्रेमा आत्यांना मात्र ती मिश्किलपणे हसून म्हणाली, “आत्या, मुठीतला आणि मिठीतला फरक मला समजला बरं का.”

(लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)

(smita joshi606@gmail.com)

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After marriage husband and wife should understand each other understand family only then can you attract your husband ssb