डॉ. शारदा महांडुळे
केळे हे बिनबियांचे सर्वात जुने फळ आहे. निसर्गतच जंतुनाशक वेष्टनामध्ये असल्याने, केळ्यातून जंतूंची बाधा होत नाही, त्यामुळे आपोआपच सर्वाचे आरोग्य उत्तम राहते. वर्षभर उपलब्ध असणारे, सर्वाच्या खिशाला परवडणारे हे फळ आबालवृद्धांना आवडते. केळ्याला शास्त्रीय भाषेमध्ये ‘मुसा पॅराडिसिअॅका’ म्हटले जाते.
हेही वाचा >>>फिरूनी नवी जन्मेन मी…
औषधी गुणधर्म –
- केळ्यामध्ये पोषणमूल्य अनेक असल्यामुळे सकस आहारामध्येच त्याची गणना केली जाते. यामध्ये पिष्टमय पदार्थ, प्रथिने, खनिजे, अ,ब,क,ड,ई जीवनसत्त्वे, कॅल्शिअम व फॉस्फरस तसेच शरीराला ऊर्जा देण्याची शक्ती व उष्मांक भरपूर प्रमाणात आहेत. सर्व फळांमध्ये केळे हे अधिक उष्मांक देणारे फळ आहे. केळ्यामध्ये नैसर्गिकरीत्या असलेली साखर ही सहज पचणारी असल्याने शरीराचा थकवा जाऊन लगेचच उत्साह निर्माण होतो. म्हणून केळ्याची गणना शक्तिवर्धक फळांमध्येही होते.
- केळे हे मधुर, शीत व कफकारक आहे.
- केळे हे शरीरातील कॅल्शिअम, नायट्रोजन व फॉस्फरस यांचे प्रमाण टिकवून ठेवते. त्यामुळे स्नायू, मांसपेशी बळकट होऊन शरीर कार्यक्षम बनवते. म्हणून केळे हे आरोग्यवर्धक, बलदायक फळही आहे.
हेही वाचा >>>स्रियांच्या आरोग्यासाठी गुणकारी सीताफळ
उपयोग –
- केळ्यामध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असल्यामुळे रक्ताची कमतरता (Anaemia) असणाऱ्यांनी रोज एक केळे खाणे फायदेशीर ठरते. केळ्यामुळे रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढते.
- केळ्यामध्ये कॅल्शिअम, लोह भरपूर प्रमाणात असल्याने हाडांचा ठिसूळपणा (ऑस्टीओपोरॉसीस) हा आजार टाळण्यासाठी रोज एक केळे खावे.
- केळी बाराही महिने खाता यावीत म्हणून उन्हाळ्यामध्ये कच्च्या केळीची साल काढून आतील गर वाळवून घ्यावा. या गराचे पीठ तयार करता येते. उपवासाच्या दिवशी या पिठापासून भाकरी किंवा थालपीठ बनवून खाता येते.
- पिकलेल्या केळीचे साल काढून ती स्वच्छ धुऊन त्याची भाजी बनवून खावी, कारण केळ्याच्या सालीमध्ये फायबर व जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. यासह केळफुलाचीही भाजी करता येते. पौष्टिक, सकस आहार म्हणून लहान मुलांना रोज एक केळे खाण्यास द्यावे. सहसा बालकांना केळे हे दुपारच्या वेळेस खाण्यास द्यावे. त्यांना सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ नये म्हणून शक्य असल्यास मधाच्या चाटणाबरोबर केळे खाण्यास द्यावे.
- मलावस्तंभाचा त्रास असेल तर केळे खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते, कारण केळे खाल्ल्याने स्नायूंची हालचाल, आकुंचन-प्रसरण व्यवस्थित होऊन आतड्यांमध्ये साचलेला मळ पुढे ढकलण्यास मदत होते.
- जर आंत्रव्रण (कोलायटिस) हा आजार झाला असेल, तर अतिरिक्त आम्लांचा विषारी प्रभाव केळे खाल्ल्याने नाहीसा होतो. कारण केळ्यामध्ये आतड्यांना आतून एक संरक्षक थर जमा होतो व त्यामुळे आंत्रव्रण भरून येण्यास मदत होते व पोटात पडणारी आग कमी होऊन रुग्णास उपशय मिळतो.
- कृश व्यक्तींना वजन वाढवायचे असेल तर रोज दुपारी चार केळी खावीत. यामध्ये भरपूर उष्मांक असल्याने महिन्याभरात वजन वाढते. केळ्यामध्ये कमी प्रथिने, कमी क्षार आणि उच्च प्रतीचे पिष्टमय पदार्थ (काबरेहायड्रेट्स) असल्याने मूत्रपिंडाचे विकार दूर करण्यासाठी केळी उपयुक्त ठरतात.
- सूर्याच्या प्रखर उष्णतेने किंवा आगीच्या चटक्यांनी होणारी शरीराची आग थांबविण्यासाठी त्वचेवर केळ्याचा गर लावावा, यामुळे शरीराचा दाह कमी होतो. केळ्यामध्ये ए, सी व एच जीवनसत्त्व असल्यामुळे त्वचा, दात यांच्या विकारांवर केळी उपयुक्त ठरतात.
- केळफुलामुळे गर्भाशयाच्या तक्रारी दूर करता येतात. कारण केळफुलाच्या सेवनाने शरीरातील अंतस्रावांचे (Harmones) प्रमाण संतुलित करता येते. यामुळे मासिक पाळीत अति रक्तस्राव होत असेल तर केळफुलाची भाजी खाणे उपयुक्त .
- केळफुलामुळे प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सचे प्रमाण संतुलित राहते व यामुळे मासिक पाळीत होणाऱ्या वेदना केळफुलाच्या सेवनाने कमी होतात.
- केळ्यामध्ये पोटॅशिअम जास्त प्रमाणात असल्यामुळे त्याचा अतिरक्तदाब काबूत ठेवायला मदत होते.
हेही वाचा >>>स्वप्नांची ज्योत जागवणारी ‘मिसेस वर्ल्ड सरगम’
सावधानता –
- केळे हे सहसा एकदम सकाळी व रात्रीच्या वेळी खाऊ नये, कारण यामुळे कफ होण्याची शक्यता असते. तसेच सर्दी-खोकला झालेला असताना केळी खाऊ नयेत.
- आयुर्वेदानुसार दूध आणि केळी एकत्र करून केलेले शिकरण वा फ्रुट सॅलेड खाऊ नये, कारण केळे व दूध एकत्र खाणे हा विरुद्ध आहार आहे. वारंवार ते खाल्ल्याने अनेक आजारांची लागण होऊ शकते. त्याऐवजी केळे व साजुक तूप हे मिश्रण खावे.
- बाजारातून केळी आणताना ती नैसर्गिकरीत्या पिकलेली आहेत की नाही ते पाहावे. सहसा एकदम हिरव्या दांडय़ाची आणि दिसायला पिवळी धम्मक सोनेरी केळी ही इथिलिन सोल्युशनमध्ये बुडवून किंवा कॅल्शिअम काबरेईड ही रासायनिक पावडर टाकून कृत्रिमरीत्या पिकवलेली असतात. ही केळी दिसायला जरी सुंदर असली, तरी आरोग्यास अहितकारक असतात.
*कृत्रिमरीत्या पिकविलेले केळे सोलल्यानंतर त्याची साल ही अपरिपक्व असल्याने चटकन तुटते. सालीच्या आतून असलेल्या धाग्यासारख्या पांढऱ्या भागाचे लगेचच तुकडे पडतात. म्हणून केळी खरेदी करताना पिवळ्या दांड्याची आणि केळ्यावर थोडे काळे ठिपके पडलेली केळी घ्यावीत. ही केळी नसíगकरीत्या पिकवलेली असतात.
sharda.mahandule@gmail.com