डॉ. शारदा महांडुळे
शरीरात रक्त कमी असणे, कॅल्शिअम, जीवनसत्त्वांची कमतरता असणे, कुपोषण, अशक्तपणा, तसेच त्वचाविकार, इतर संसर्गजन्य विकारांवर शेवग्याची फुले, पाने, शेंगा यांचे सूप करून प्यावे. बोटासारख्या लांब दिसणाऱ्या शेवग्याच्या शेंगा सर्वांच्याच परिचयाच्या आहेत. सुगृहिणी नेहमी या शेंगांचा वापर करून भाजी, रस्साभाजी, आमटी, कढी, सांबार असे विविध पदार्थ बनविते. शेंगांबरोबरच शेवग्याची पाने-फुले यांचाही वापर भाजी करून खाण्यासाठी होतो. याची पाने छोटी-छोटी हदग्याच्या पानांसारखी दिसतात. याची फुले पांढऱ्या रंगाची, दिसायला मनमोहक असतात.
शेंगांच्या आत त्रिकोणी व पांढऱ्या रंगाचे बी असते. अशाप्रकारे मुळापासून ते फुलापर्यंत शेवगा हा आहाराबरोबरच आयुर्वेदिकदृष्ट्या अनेक औषधी गुणांनी संपन्न आहे. मराठीत ‘शेवगा’, हिंदीमध्ये ‘सहजन’, संस्कृतमध्ये ‘शिग्रू’ किंवा ‘शोभांजन’, इंग्रजीमध्ये ‘ड्रमस्टिक’, तर शास्त्रीय भाषेत ‘ मोरिंगा ओलीफेरा’ (Moringa Oleifera) नावाने ओळखला जाणारा शेवगा ‘ मोरिग्रेसी’ या कुळातील आहे.
औषधी गुणधर्म :
आयुर्वेदानुसार : शेवगा हा गुणात्मक, तीक्ष्ण, मधुर, उष्ण, अग्निप्रदीपक, रुचकर, रूक्ष, लवणयुक्त, दाहकारक, हृदय व डोळ्यांना हितकारक असतो.
आधुनिक शास्त्रानुसार : शेवग्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, ‘क’ व ‘ब’ जीवनसत्त्वे, प्रथिने, आर्द्रता, तंतुमय व पिष्टमय पदार्थ आणि स्निग्धता हे सर्व आरोग्यास उपयुक्त पोषक घटक असतात.
उपयोग :
१. आयुर्वेदानुसार शेवगा हा उष्ण असून वातनाशक आहे. त्यामुळे तो अपचन, पोटात गॅस होणे, पोट दुखणे, मुरडा येणे या विकारांवर उपयुक्त आहे. शेवगा खाल्ल्याने घेतलेल्या आहाराचे पचन होऊन मल आतड्यातून पुढे ढकलण्यास मदत होते..
२. उचकी येणे, धाप लागणे या विकारांवर शेवग्याच्या पानांचा रस कपभर घेतल्यास त्वरित आराम मिळतो.
३. बालकांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी शेवग्याच्या पानांचा रस उपयुक्त ठरतो. पानांमध्ये मुलांच्या शारीरिक व बौद्धिक वाढीचे विशेष शक्तिवर्धक गुण आहेत. या पानांचा रस अर्धा कप घेऊन त्यात ग्लासभर दूध मिसळून हे दूध लहान मुलांना दिवसभरात द्यावे. हा प्रयोग वाढीच्या वयातील मुलांवर रोज केल्यास त्यांची वाढ निरोगी होईल. तसेच स्नायू, हाडे बळकट होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढेल व कुपोषणाला आळा बसेल.
४. दमा, सर्दी, खोकला, क्षयरोग या विकारांवर शेवग्याच्या पानांचे सूप फार उपयुक्त ठरते. दीड ग्लास पाण्यात मूठभर शेवग्याची पाने घालून ते पाणी उकळावे. त्यानंतर ते गाळून जिरेपूड, सैंधव, काळी मिरीपूड यांची गायीच्या तुपात फोडणी द्यावी व गरम गरम सूप थोडे लिंबू पिळून लगेचच प्यावे. यामुळे छातीतील कफ कमी होतो. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढून वरील विकार दूर होतात.
५. शरीरात रक्त कमी असणे, कॅल्शिअम, जीवनसत्त्वांची कमतरता असणे, कुपोषण, अशक्तपणा, तसेच त्वचाविकार, इतर संसर्गजन्य विकारांवर शेवग्याची फुले, पाने, शेंगा यांचे सूप करून प्यावे. यामध्ये जंतुनाशक गुणधर्म असल्यामुळे, तसेच सर्वच जीवनसत्त्वे असल्यामुळे अशक्तपणा कमी होऊन कुपोषण थांबते.
६. शेवग्याची पाने, फुले व साल यामध्ये कामोत्तेजक गुणधर्म असल्यामुळे वंध्यत्व असणाऱ्या दाम्पत्यांनी, तसेच शुक्रजंतू कमी असणाऱ्या पुरुषांनी शेवग्याचा आहारात वापर करावा. एक लिटर पाण्यामध्ये बारा चमचे शेवग्याच्या सालीचे चूर्ण उकळून ते अर्धा लिटर करावे. नंतर हे पाणी दिवसभरात तीन ते चार वेळा प्यावे. हा प्रयोग सलग दोन-तीन महिने केल्यास शुक्रजंतूंची वाढ झालेली दिसून येते.
७. जुलाब होत असतील, तर शेवग्याच्या ताज्या पानांचा रस दोन चमचे, शहाळ्याचे पाणी अर्धा ग्लास व अर्धा चमचा मध हे मिश्रण दिवसातून दोन वेळा घ्यावे. याने जुलाब आटोक्यात येऊन थकवा नाहीसा होतो.
८. लघवीला जळजळ होऊन जननेंद्रियांची आग होत असेल व त्यामुळे थेंब थेंब लघवी होत असेल त एक कप शेवग्याच्या पानांचा रस, एक कप काकडीरस व एक कप गाजररस हे सर्व रस एकत्र करून ते दिवसातून तीन वेळा प्यायल्यास शरीराची उष्णता कमी होऊन लघवी साफ होते.
९. मुरुमे, पुटकुळ्या, तेजहीन रूक्ष त्वचा इत्यादी विकारांवर शेवग्याच्या ताज्या पानांचा कल्क चेहऱ्यावर हलक्या हाताने चोळून लावावा. याने चेहरा स्वच्छ व कांतियुक्त होऊन काळे डाग कमी होतात.
१०. गर्भवती स्त्रीने शेवग्याच्या पानांचा रस अर्धा कप घेऊन तो एक ग्लास दुधामध्ये टाकून प्यायल्यास या काळात आवश्यक असणारे कॅल्शिअम, लोह, जीवनसत्त्वे हे सर्व घटक प्राप्त होऊन गर्भाशयाला बल प्राप्त होऊन बाळाची वाढ सुदृढ होते व गर्भाशयाचे आरोग्य चांगले प्रसूती होण्यास मदत होते.
११. बाळंतपणानंतरही मातेने शेवग्याच्या पानांची व फुलांची भाजी नियमित खाल्ल्यास अंगावरचे दूध वाढून आई व बाळाचे आरोग्य चांगले राहते.
१२. शेवग्याचे बी डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम असते. या बियांचे चूर्ण अर्धा चमचा घेऊन मधात कालवून त्याचे चाटण केल्यास क्षीण झालेली डोळ्यांची शक्ती वाढते.
१३. पानांचा रस टाकून तेल सिद्ध करावे. हे तेल संधिवात, आम्लपित्त, मुरगळणे, अंगदुखी, गुडघेदुखी या विकारांवर वापरले असता त्वरित आराम मिळतो.
१४. पोटातील जंत शौचावाटे पडून जाण्यासाठी शेवग्याच्या काढ्यात मध घालून दिवसातून दोन वेळा एक-एक कप घ्यावा.
१५. केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी व त्यातील कोंडा कमी होण्यासाठी शेवग्याच्या पानांचा रस केसांच्या मुळाशी लावावा व त्यानंतर अर्ध्या तासाने केस धुतल्यास कोंडा कमी होऊन केस मऊ मुलायम होतात.
सावधानता :
शेवग्याच्या शेंगा या अति कोवळ्या व अति जून झालेल्या वापरू नये. कोवळ्या वापरल्यामुळे त्यात शरीरास आवश्यक असलेल्या गुणधर्माची वाढ झालेली नसते, तर अति जून शेंगा या उष्ण व दाहकारक असतात. तसेच आहारामध्ये आरोग्य चांगले राखण्यासाठी शेंगांबरोबरच पाने व फुले यांचाही नियमित वापर करावा. फक्त पाने वापरताना ती कोवळी वापरावीत.
dr.sharda.mahandule@gmail.com