डॉ.शारदा महांडुळे
फार प्राचीन काळापासून आहारशास्त्राबरोबरच आयुर्वेदशास्त्रातदेखील लंवगांचा वापर केला जातो. अनेकजण घरगुती औषध म्हणूनही तिचा वापर करतात. मसाल्यामध्ये सुगंध आणण्यासाठी लवंगेचा वापर केला जातो. मराठीमध्ये ‘लवंग’, हिंदीमध्ये ‘लौंग’, इंग्रजीत ‘क्लोव्ह’, संस्कृतमध्ये ‘देवकुसूम’, तर शास्त्रीय भाषेत ‘युजेनिआ कॅरिओफिलाटा’ (Eugenia Caryophyllata) या नावाने ओळखली जाणारी लवंग ‘मिटेंसी’ या कुळातील आहे.
लवंगेचे झाड पंचवीस ते चाळीस फूट उंच व वर्षभर हिरवेगार असते. या झाडावर तीन-तीन गुच्छांचा समूह तयार होतो. या गुच्छांना कळ्या लागतात. या कळ्या फुलून लहान फुले होतात. या फुलांनाच आपण ‘लवंग’ असे म्हणतो. जेथे पाऊस खूप पडतो, तेथे लवंगेचे झाड दिसून येते. जगामध्ये सिंगापूर व आफ्रिकेत ही झाडे भरपूर प्रमाणात आहेत. मल्लाक्का, जंगबार व त्याच्याजवळ असणाऱ्या फेम्बा टापूमध्ये लवंगेची झाडे अधिक प्रमाणात आहेत. भारतामध्येही लवंगेची झाडे आढळतात. परंतु त्याचे प्रमाण खूप कमी आहे. लवंगेचे दोन प्रकार आहेत. एक तीव्र सुगंधाची काळी लवंग व दुसरी धुरकट रंगाची लवंग होय. जी लवंग उग्र वासाची, तिखट आणि दाबल्यानंतर तिच्यामध्ये तेलाचा अंश असल्याचे जाणवते. ती उत्तम प्रतीची असते.
आणखी वाचा-आहारवेद : हृदयरोगावर गुणकारी वेलची
औषधी गुणधर्म
आयुर्वेदानुसार: लवंग सुगंधी, उत्तेजक, रक्तविकारनाशक, कफघ्न, अग्निदीपक, पाचक, दुर्गंधीहारक, रुची उत्पन्न करणारी, डोळ्यांना हितकारक आहे. तिच्या या गुणधर्मामुळे मळमळणे, उलटी होणे, पोटात कळ येणे, तीव्र दातदुखी, डोळे दुखणे, पोट फुगणे, अति तहान लागणे, खोकला, श्वास अशा अनेक विकारांवर तिचा उपयोग होतो.
आधुनिक शास्त्रानुसार: लवंगेमध्ये ऊर्जा, कार्बोहाड्रेट्स, प्रथिने, जीवनसत्त्व ‘अ’, ‘क’ व ‘ई’, कॅल्शिअम, लोह, कॉपर, मॅग्नेशिअम, तंतुमय व पिष्टमय पदार्थ, सोडिअम, पोटॅशिअम ही घटकद्रव्ये असतात.
आणखी वाचा-आहारवेद : जिरे, गर्भवतींसाठी उपयुक्त
उपयोग
१) खोकला येत असेल. तर लवंग तोंडात चघळल्याने खोकल्याची ढास कमी होते. तसेच घशातील खवखव कमी होऊन खोकला दूर होण्यास मदत होते.
२) सर्दी-खोकला, घसा धरणे, आवाज बसणे अशा विकारांवर भाजलेली लवंग तोंडात ठेवून चघळल्यास घशाची सूज कमी होऊन आवाज मोकळा होतो.
३) वारंवार सर्दी होऊन नाकातून पाणी गळत असेल, तर अशा वेळी हातरुमालावर लवंगांचे तेल टाकून तो हुंगावा.
४) बारीक केलेल्या लवंगांचा लेप कपाळावर लावल्यास डोकेदुखी त्वरित थांबते.
५) लवंगांचे तेल कपाळावर चोळल्याने सुद्धा डोकेदुखी थांबते.
६) अपचन, गॅस यांमुळे होणारी पोटदुखी थांबविण्यासाठी पाव चमचा लवंगपूड आणि एक चमचा खडीसाखर एकत्रित करून दिवसातून दोन वेळा खावी.
७) तीव्र स्वरूपात दातदुखी जाणवत असेल, तर तत्काळ वेदना कमी करण्यासाठी लवंगांच्या तेलात भिजविलेला कापसाचा बोळा ठणकत असलेल्या दातावर घट्ट दाबून ठेवावा. याने दातदुखी त्वरित थांबते.
८) लवंग पाण्यात उकळून ते पाणी दिवसभर प्यायल्याने सर्दी-खोकला, अपचन, तोंडास दुर्गंधी येणे, भूक न लागणे हे विकार कमी होतात.
९) लवंग जंतुनाशक, कीटकनाशक, कृमीघ्न, पूर्तिरोधक आणि स्तंभक कार्य करणारी असल्याने आयुर्वेदात अनेक विकारांवर लवंगेचा वापर करण्यास सांगितला आहे. म्हणून लवंगादी वटींचा वापर अनेक विकारांवर निष्णात वैद्य करीत आहेत.
१०) वारंवार तहान लागत असेल व पाणी पिऊनही तहान भागत नसेल, तर एक ग्लास पाण्यामध्ये चार लवंगा उकळाव्यात. थोड्या थोड्या अंतराने दोन-दोन चमचे हे पाणी प्यायल्यास तहान शमते.
११) गर्भवती स्त्रीला उलटी, मळमळ यांचा त्रास जास्त जाणवल्यास भाजलेली लवंग तोंडात धरावी किंवा लवंग गरम पाण्यात भिजवून ते पाणी घोट-घोट त्या स्त्रीला प्यायला दिल्यास उलट्यांचा त्रास त्वरित थांबतो.
१२) खोकल्याची उबळ येणे, दम लागणे, सर्दी जाणवणे, छातीमध्ये आखडणे हे विकार दूर करण्यासाठी गरम पाण्यात लवंगतेलाचे काही थेंब टाकून ती वाफ श्वासाद्वारे आत घ्यावी.
१३) दातांचा व हिरड्यांचा पायरिया हा आजार घालविण्यासाठी दातांना व हिरड्यांना लवंगतेलाने मालीश करावे.
१४) रात्री डास खूप चावत असतील, तर अशा वेळी संपूर्ण अंगाला लवंगतेल चोळावे. यामुळे डास जवळ येत नाहीत.
१५) लवंगेमध्ये ‘अ’ जीवनसत्त्व व बीटा कॅरोटीन भरपूर प्रमाणात असल्याने ते शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवून शरीर सुदृढ ठेवते.
१६) ‘ब’ जीवनसत्त्व (पायरिडॉक्सीन थायसिन) ‘बी-१’ जीवनसत्त्व, तसेच ‘क’ जीवनसत्त्व लवंगेमध्ये भरपूर प्रमाणात असल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यास मदत होते.
आणखी वाचा-आहारवेद: आरोग्यदायी आले / सुंठ
सावधानता
लवंगांचे मसाल्यामध्ये प्रमाणात सेवन करावे. त्याचे अति प्रमाणात सेवन केल्यास डोळे, जठर, आतडे, मूत्राशय व हृदय यामध्ये दाह निर्माण होऊन वाईट परिणाम होऊ शकतात. लवंगांची पूड ही आवश्यकतेप्रमाणे ताजीच बनवावी. आधीच बनवून ठेवल्यास त्याचा सुगंध कमी होऊन त्यातील उर्ध्वगमनशील तेलही उडून जाते.