डॉ.शारदा महांडुळे
विविध प्रकारच्या फुलांमधून मधुर रस शोषून मधमाश्या आपल्या लहान शरीरात त्याचा साठा करून मधाच्या पोळ्यामध्ये असणाऱ्या लहान लहान कोषात त्या तो रस साठवतात व त्या रसालाच मघ असे म्हणतात. मराठीमध्ये ‘मध’, इंग्रजीमध्ये ‘हनी’, संस्कृतमध्ये ‘मधु’, तर शास्त्रीय भाषेमध्ये ‘हनी’ या नावाने मध परिचित आहे. मधमाश्यांनी मध निर्माण करून मनुष्यासाठी एक देणगीच दिलेली आहे. मधामध्ये अनेक पौष्टिक व औषधी गुणधर्म आहेत. मध हा अर्धपारदर्शक, अर्धप्रवाही, सोनेरी लालसर रंगाचा, गोड व काहीसा तुरट चवीचा सुगंधी पदार्थ आहे. मधमाश्या इमारतीमध्ये, झाडांवर, झुडुपांवर, पर्वतावर मधमाश्याचे मोहोळ तयार करतात. मधमाश्या आहार म्हणून मधाचा उपयोग करतात. त्यांचा खाऊन उरलेला मध हा आपल्याला मिळतो. भारतात काश्मीर, गुजरात, म्हैसूर, हिमालय, महाराष्ट्र या भागात मध जास्त प्रमाणात मिळतो.
औषधी गुणधर्म
आयुर्वेदानुसार : मध हा बुद्धी व स्मृती वाढविणारा आहे. मधु शीतं लघु स्वादु रूक्षं स्वयं च ग्राहकम्। चक्षुष्य लेखनं चाग्निदीपकं व्रणशोधकम् ।। नाडीशुद्धिकरं सूक्ष्मं रोपणं मृदू वर्णकृत् । मेधाकरं च विशदं वृष्यं रुचिकरं मतम् ।।
मध हा चवीला गोड, शीत वीर्याचा लघु व रूक्ष असून, लेखनकार्य करणारा आहे. शरीरावर झालेल्या जखमेची स्वच्छता करून नाडीव्रणाची शुद्धी करणारा आहे. तसेच डोळ्यांना हितकारक, जखमा भरून काढणारा, त्याच्या सूक्ष्म गुणाने शरीरातील सर्व स्रोतसांमध्ये प्रवेश करणारा, अग्नी प्रदीप्त करून भूक वाढविणारा, बुद्धी व स्मृतिवर्धक व रुचकर आहे.
याचे आठ प्रकार सांगितलेले आहेत १) माक्षिक, २) भ्रामर, ३) क्षौद्र, ४) पौतिक, ५) छात्र, – ६) आर्ध्य, ७) औद्दालक, ८) दाल हे आठ प्रकार होत. हे सर्व प्रकार मध गोळा करण्याच्या मधमाश्यांच्या नावावरून दिलेले आहेत.
आधुनिक शास्त्रानुसार : मधामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, ‘क’ जीवनसत्त्व, थोड्या प्रमाण ‘ब’ जीवनसत्त्व, आर्द्रता, प्रथिने, खनिजे, पिष्टमय पदार्थ असे अनेक औषधी घटक आहेत. तसेच संशोधनामध्ये असे सिद्ध झाले आहे, की मधातील परागांमुळे त्यात सर्वच्या सर्व ॲमिनो ॲसिड्स, खनिजे, एन्झाईम्स, मेदाम्ले व पिष्टमय पदार्थ असतात. परंतु हे सर्व घटक मध न उकळता घेतल्यासच मिळतात. मध उकळल्याने त्यातील औषधी गुणधर्म कमी होतात. मधामध्ये ग्लुकोज, फ्रुक्टोज व सुक्रोज या नैसर्गिक साखरी असतात.
उपयोग :
१) मध आणि आल्याचा रस प्रत्येकी एक-एक चमचा एकत्र करून सकाळ-संध्याकाळ घेतल्यास सर्दी कमी होते, तसेच जाठरअग्नी प्रदीप्त होऊन भूक चांगली लागते.
२) एक चमचा मध, एक चमचा आडुळसा रस व अर्धा चमचा आल्याचा रस एकत्र करून प्यायल्याने खोकला बरा होतो.
३) मळमळ होऊन जर उलटीची भावना होत असेल, तर थोड्याशा गुळामध्ये मध मिसळून त्याचे धारण करावे. यामुळे उलटीची भावना कमी होते.
४) टॉन्सिल्स फुगल्याने घसा दुखत असेल, तर मध व कोमट पाणी एकत्र करून त्यात त्रिफळाचूर्ण मिसळावे व हे पाणी गाळून त्याने गुळण्या कराव्यात. यामुळे टॉन्सिल्सची सूज कमी होते.
५) मधाच्या पोळ्यातून काढलेला ताजा मध हा पुष्टिकारक, किंचित कफकर, गुरू, सारक, स्निग्ध, सप्तधातुवर्धक व स्थूलता निर्माण करणारा असतो. तर एक वर्षापेक्षा जास्त काळ झालेला जुना मध हा लेखनकार्य करणारा असून, रूक्ष गुणधर्माचा व स्थूलता कमी करणारा असतो.
६) एक कप दुधामध्ये एक चमचा मध घालून प्याल्यास शक्ती वाढते.
७) रोज सकाळी किंवा रात्री किंचित गरम पाण्यात एक ग्लास दुधात एक चमचा मध घालून प्याल्याने मलावरोध दूर होऊन शौचास साफ होते.
८) तोंडामध्ये व्रण निर्माण होऊन त्याचा दाह होत असेल, तर मधयुक्त पाणी किंवा नुसता मध बराच वेळ तोंडात धरून ठेवावा किंवा त्याच्या गुळण्या कराव्यात. यामुळे तोंड येणे, तोंडात व्रण पडणे, दाह, तृष्णाविकार ( वारंवार तहान लागणे) हे सर्व तोंडाचे विकार दूर होऊन तोंड स्वच्छ होते.
९) स्थूलत्वावर एक वर्षापेक्षा जास्त काळ झालेला जुना मध रोज सकाळी एक चमचा घेऊन त्यात अर्धे लिंबू पिळून एक ग्लास गरम पाण्यात हे मिश्रण घेतल्यास स्थौल्य कमी होऊन बांधा सुडौल होतो, तसेच आम्लपित्ताचा विकार कमी होऊन शौचास साफ होते. हे मिश्रण हृदयरोगांसाठी सुद्धा उपयुक्त आहे.
१०) शरीरावरील जखमा व व्रण बरे होण्यासाठी जखमांवर मध लावावा. मध जंतुनाशक असल्याने भाजल्यामुळे किंवा पोळण्यामुळे झालेल्या जखमा लवकर भरून येतात.
११) लहान बालकांची जर झोप कमी असेल, तर अशावेळी अर्धा पेला दुधातून दोन चमचे मध द्यावा. त्याने बालके लगेच झोपतात.
१२) हिरड्यांचे व दातांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी त्रिफळा चूर्ण + मंजिष्ठा चूर्ण + वटसाल चूर्ण यांचे सूक्ष्म चूर्ण एकत्र करून त्यात दोन चमचे मध मिसळावा व या मिश्रणाने दात व हिरड्या घासाव्यात. याने दात पांढरेशुभ्र होऊन चमकतात आणि हिरड्या मजबूत होतात.
१३) वंध्यत्व असणाऱ्या पुरुषांनी कामेच्छा निर्माण होण्यासाठी व शुक्रजंतूंचे प्रमाण वाढविण्यासाठी नियमितपणे रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास थंड पाण्यातून दोन चमचे मध घ्यावा.
१४) मध हा तारुण्य वाढविणारे प्रतीक असल्यामुळे तो शुक्रधातूचे प्रमाण वाढवून वार्धक्य दूर तारुण्य जास्त काळ टिकवितो.
सावधानता :
आयुर्वेदानुसार तूप व मध यांचे सम प्रमाणात एकत्र सेवन करणे हे हानिकारक असून, विषाप्रमाणे कार्य करते, असे सांगितले आहे. त्यामुळे या बाबतीत सावधानता बाळगावी.
dr.sharda.mahandule@gmail.com