माजी फ्लाईट अटेंडंट आणि सोशल मीडिया एन्फ्ल्यूएन्सर कॅट कमलानी [Kat Kamalani] हिने एअर होस्टेस म्हणजेच हवाई सुंदरी पदाचा राजीनामा दिला आहे. या क्षेत्रातील एकूण सहा वर्षांच्या कामाचा अनुभव तिने सांगितला आहे. या अमेरिकेमधील यूटा [Utah] राज्यातील इंटरनेट सेलिब्रिटीने एअर होस्टेस क्षेत्र दिसते तितके ‘ग्लॅमरस’ नसल्याचे एका टिकटॉकच्या व्हिडीओमध्ये सांगितल्याची माहिती डीएनएच्या एका लेखातून मिळते. कॅटने काम करीत असतानाचा ‘प्रत्येक क्षण’ हा तिला का वैताग आणणारा होता हे या टिकटॉक व्हिडीओमधून शेअर केले आहे.

३३ वर्षीय कॅट ही दोन मुलांची आई आहे. तिने एअर होस्टेस क्षेत्रातील खडतर प्रशिक्षण, प्रवाशांची वागणूक, श्रेणीबद्ध [hierarchical] पद्धती यांवरून टीका केली आहे. कॅटने व्हिडीओमध्ये सांगितलेल्या या समस्यांना, त्याच क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांनी अनुकूल प्रतिसाद दिला असून, त्यांनाही अशाच काही समस्यांचा सामना करावा लागला असल्याचे सांगितले.

हेही वाचा : लंडनमध्ये शिक्षण घेतले; पण वडिलांची कंपनी सांभाळण्यासाठी परतली मायदेशी! पाहा, कोण आहे गौरी किर्लोस्कर

टिकटॉकवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये कॅट चारचाकी गाडीमध्ये बसून, तिने ती काम करीत असलेली कंपनी का सोडली याचे स्पष्टीकरण देत होती. कॅटच्या म्हणण्यानुसार ती एका मोठ्या एअरलाइन्स कंपनीमध्ये तब्बल सहा वर्षे फ्लाईट अटेंडंट म्हणून काम करीत होती. या क्षेत्रात एअर होस्टेसच्या आयुष्यात वरिष्ठता [seniority] प्रचंड महत्त्वाची भूमिका बजावत असते. सगळ्या गोष्टींचे निर्णय तुम्ही रुजू होतानाच घेतले जातात.

“तुम्ही कोणत्या विमानांमधून उड्डाण करणार आहेत, कोणत्या सुट्यांच्या / सणांच्या दिवशी तुम्ही विमानात असाल, तुम्हाला आठवड्याला सुट्टी असेल की नाही, तुम्ही ठरावीक तारखा रिकाम्या ठेवू शकता का हे सर्व ठरवले जाते”, असे कॅटने म्हटले असल्याचे डेली मेलच्या अहवालावरून समजते.

कठोर, खडतर प्रशिक्षण हा दुसरा मुद्दा आहे. दोन महिने किंवा आठवड्याचे सलग सहा दिवस तब्बल १५ तास हे प्रशिक्षणासाठी द्यावे लागायचे, असे तिने पुढे सांगितले. त्याचबरोबर अनेक परीक्षांमध्येदेखील एअर होस्टेसना उत्तीर्ण होणे आवश्यक असते. तुम्हाला जर या क्षेत्रात काम करीत राहायचे असेल, तर एअर होस्टेसनी सर्व परीक्षांमध्ये ८० टक्के गुण मिळविणे आवश्यक असते.

विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वागणुकीचा आणि एअर होस्टेस म्हणजे वेटर किंवा सेवक आहेत, अशा विचाराने वागणाऱ्या व्यक्तींचा त्रास मोठ्या प्रमाणात असल्याचे कॅटने स्पष्ट केले. अनेकदा प्रवासी एअर होस्टेससह गैरवर्तन करतात; त्याच्याशी अर्वाच्य भाषेत बोलतात. अनेकदा प्रवाशांना एअर होस्टेस म्हणजे केवळ पेय सर्व्ह करणाऱ्या वाटतात; मात्र त्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी असतात, असे मत कॅटने मांडले होते. डेली मेलच्या अहवालानुसार, “एअर होस्टेस प्रवाशांना केवळ पेय सर्व्ह करण्याचे काम करीत नाही; तर प्रत्यक्षात आम्ही विमानामधील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तिथे असतो,” असे कॅटने म्हटले आहे.

हेही वाचा : ‘क्लॉडिया शेनबॉम’ पहिली महिला राष्ट्राध्यक्ष बनून घडवला इतिहास! कोण आहेत क्लॉडिया शेनबॉम जाणून घ्या

या सर्व गोष्टींव्यतिरिक्त अनेकांना एका दिवसाला तीन वेळा विमान प्रवास करावा लागतो. खूप लवकर उठावे लागते आणि आराम करण्यासाठी अतिशय कमी वेळ मिळत असल्यामुळे शरीराला पुरेसा आराम व झोप मिळत नाही. अशा सर्व समस्यांमुळे कॅट कमलानीने ही नोकरी सोडल्याचे सांगितले, अशी माहिती डीएनएच्या एका लेखावरून समजते.