आयुर्वेदामध्ये औषध म्हणून ओव्याचा फार प्राचीन काळापासून वापर केला जातो. घेतलेल्या अन्नाचे पचन होण्यासाठी व मुखशुद्धीसाठी उपयोगी असलेला ओवा उत्तेजक व बलवर्धक आहे. मराठीत ‘ओवा’, हिंदीमध्ये ‘अजवैन’, इंग्रजीमध्ये ‘बिशप्स वीड’, संस्कृतमध्ये ‘तीव्रगंधा’ किंवा ‘अजमोदा’, तर शास्त्रीय भाषेत ‘कॅरम कॉप्टिकम’ (Carum Copticum) या नावाने ओळखला जाणारा ओवा ‘अंबेलिफेरी’ कुळातील आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतामध्ये ओव्याची लागवड गुजरात राज्याबरोबरच हैदराबाद, इंदूर या शहरांमध्ये प्रामुख्याने केली जाते. याचे रोप साधारणतः २५ ते ३० सें.मी. एवढे उंच असते. याच्या बियांनाच ओवा असे म्हणतात. या ओव्याचे ‘बोडी ओव’, ‘किरमाणी ओवा’ व ‘खुरसानी ओवा’ असे तीन प्रकार आहेत.

हेही वाचा – गच्चीवरची बाग: रूम डिव्हायडर्स

औषधी गुणधर्म :

आयुर्वेदानुसार : उष्ण, कडू, तिखट, लघु गुणधर्माचा ओवा पाचक, रुची उत्पन्न करणारा, जठराग्नी प्रदीप्त करणारा आणि जास्त प्रमाणात खाल्ल्यास पित्तकारक आहे. या गुणधर्मामुळे तो वातनाशक, पौष्टिक, मूत्रल असून, त्याचा उपयोग प्रत्येक घरामध्ये स्वयंपाक बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मसाल्यामध्ये केला जातो.

आधुनिक शास्त्रानुसार : ओव्यामध्ये प्रथिने, मेद, कर्बोदके, तंतुमय पदार्थ, खनिजे, आर्द्रता ही सर्व पौष्टिक घटकद्रव्ये असतात.

उपयोग :

१. ओवा वातनाशक, ताणनाशक, शूलहारक, कफघ्न, ज्वरघ्न, कृमीनाशक, व्रण रोपणकारक व दुर्गंधीहारक असल्यामुळे तो अनेक रोगांवर रामबाण उपाय म्हणून वापरला जातो.

२. ओव्याचे अर्धा चमचा चूर्ण पाण्याबरोबर घेतल्याने सर्दी व खोकला बरा होतो.

३. सुंठ, पिंपळी, अडुळशाची पाने यांचा काढा करून त्यात ओव्याचे चूर्ण एक चमचा मिसळून प्यायल्यास कफज्वर व कफयुक्त खोकला कमी होतो.

४. दम्याचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी गरम पाण्याबरोबर ओवा घेतल्यास श्वासाचा वेग कमी होतो. यामध्ये ओव्याचा अर्कही फायदेशीर होतो.

५. अजीर्ण, तोंडाला चव नसणे, आम्लपित्त, पोट दुखणे, पोटात गॅस धरणे या विकारांवर ओव्याचे चूर्ण अर्धा चमचा गरम पाण्यासोबत घ्यावे.

६. बाळंतिणीचे आरोग्य चांगले राखण्यास ओवा खूप उपयोगी पडतो. ओवा खाल्ल्याने बाळंतिणीस भूक चांगली लागते. पचनक्रिया सशक्त होऊन अन्नपचन चांगले होते. गर्भाशय शुद्ध होऊन संकुचित होण्यास मदत होते. कंबरदुखी, बारीकसा ताप बरा होऊन अंगावर दूधही चांगले येते.

७. ओवा, सैंधव व हिंग प्रत्येकी पाव चमचा घेऊन एकत्र बारीक करून खाल्ल्याने तीव्र उदरशूल लगेच कमी होतो.

८. ओवा मुखशुद्धीचे कार्य करीत असल्याने तोंडास येणाऱ्या दुर्गंधीचा नाश करण्यासाठी जेवणानंतर बडीशेपेसोबत ओवा खावा.

९. लहान मुलांना अंथरुणात झोपेत नकळत लघवी होत असेल, तर त्याला नियमित ओवा खाण्यास द्यावा. यामुळे नक्कीच फायदा दिसून येतो.

१०. ओवा कृमीघ्न असल्यामुळे लहान मुलांना पोटात जंत झाले असतील, तर अशा वेळी ओवा आणि सैंधव मीठ एकत्र करून खायला दिल्यास जंत शौचावाटे पडून जातात.

११. स्नायूंना मार लागून जर त्या भागास सूज आली असेल, तर त्या ठिकाणी ओवा पाण्यात वाटून त्याची कापडामध्ये पुरचुंडी तयार करावी व ही पुरचुंडी किंचित गरम करून दुखावलेल्या भागावर शेक द्यावा. याने लगेचच वेदना कमी होतात.

१२. लहान बालकांना सर्दी, ताप, खोकला झाला असेल व छातीमध्ये कफ दाटला असेल, तर अशा वेळी ओव्याची पुरचुंडी तापलेल्या तव्यावर किंचित कोमट करून त्याने बालकाची छाती शेकल्यास छातीतील कफ मोकळा होऊन वरील लक्षणे कमी होतात.

१३. पचनशक्ती दुर्बल असणाऱ्या व्यक्तींना गव्हाची पोळी पचण्यास जड वाटते. अशा वेळी कणीक मळतानाच त्यात एक चमचा ओव्याची पूड टाकली तर पचन सुलभ होते.

१४. सर्दी, थंडी, ताप झाल्यास ओव्याची छोटी पुरचुंडी बांधून तिचा वास हुंगल्यास सर्दी बरी होते.

१५. अनेक वेळा शरीरावरील जखम उपचार करूनही भरून येत नाही. अशा वेळी ओवा पाण्यात बारीक वाटून त्याची पेस्ट जखमेवर लावल्यास जखम त्वरित भरून येते.

१६. दात किडून त्याला ठणका लागल्यास दातांमध्ये ओवाचूर्ण भरावे. याने वेदना त्वरित थांबतात.

१७. खुरासनी ओव्याचे चूर्ण रोज रात्री पाण्यासोबत घेतल्यास झोप चांगली लागते व दुसऱ्या दिवशी सकाळी शौचास साफ होते.

१८. शीत-पित्ताचा त्रास जाणवत असेल, तर गूळ आणि ओवा एकत्रित करून छोट्या-छोट्या गोळ्या बनवाव्यात व त्या सकाळ-संध्याकाळ दोन-दोन खाव्यात.

१९. संधिवातामध्ये अनेक वेळा सांधे जखडून तीव्र वेदना होतात. अशा वेळी जखडलेल्या सांध्यांना ओव्याच्या तेलाने मालीश करावे किंवा त्या सांध्यावर ओवा वाटून त्याचे पोटीस बांधावे.

हेही वाचा – सोनिया गांधींनी का लावून द्यायला हवं राहुल गांधींचं लग्न?

सावधानता :

सहसा ओवा स्वयंपाकघरात किंवा औषधासाठी वापरताना नवाच वापरावा. कारण जुन्या ओव्यातील तेल उडून गेलेले असते व ओव्याचे मुख्य गुणधर्म हे तेलातच असतात. औषध स्वरुपात वापरताना सहसा ओव्याचे चूर्णच वापरावे. ओव्याचा काढा करू नये. कारण काढा उकळताना त्याच्यातील उर्ध्वगमनशील तेल उडून जाते.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajwain is used to cure many diseases ssb