-संपदा सोवनी
“माझी बायको हुशार आहे… मी तर ‘अनपढ आदमी’ आहे!”
क्रिकेटपटू शिखर धवनच्या ‘धवन करेंगे’ नामक ‘टॉक शो’मध्ये अक्षय कुमारनं हे शब्द उच्चारले आणि समाजमाध्यमांवर त्याविषयी चर्चा सुरू झाली.
मूळ मुद्द्याकडे येण्यापूर्वी अक्षय काय म्हणालाय ते बघू या…
या कार्यक्रमात शिखर अक्षयला त्याच्या मुलीबद्दल- निताराबद्दल विचारतो.
शिखर म्हणतो, “निताराशी मी गप्पा मारत होतो आणि माझ्या लक्षात आलं, की ही इतकी लहान आहे, पण किती चाणाक्ष आहे! ही नक्की बाबांवर गेलेली दिसतेय!”
अक्षय क्षणाचाही विलंब न करता उत्तर देतो, “नाही नाही, ती तर आईवर (ट्विंकल खन्ना) गेलीय.”
इथे शिखर मिश्किलपणे म्हणतो, “पाजी, बायको काय म्हणेल याची रिस्क नको म्हणून तुम्ही असं सांगताय!”
यावर अक्षय उत्तरतो, “रिस्कचा प्रश्नच नाही! हुशार माझी बायकोच आहे. मी तर ‘अनपढ’ आहे. जास्त शिकलेलो नाही…”
शिखर तरी आपला मुद्दा रेटून धरतो- “माझ्या मते तुम्ही दोघंही हुशार आहात…”
अक्षय पुन्हा म्हणतो, “मी ‘गधामजुरी’ करतो… ती ‘दिमागवाली’ आहे!”
अक्षयचं बायकोप्रेम इथेच थांबत नाही. लेखिका म्हणून प्रसिद्ध असलेल्या आपल्या पत्नीबद्दल तो पुढे म्हणतो, “ट्विंकलचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मला अचंबित करतो. ती ५० वर्षांची आहे, पण आजही ती शिक्षण घेतेय. नुकतंच तिनं लंडनमध्ये मास्टर्स पूर्ण केलं आणि आता पीएच.डी. करतेय. मी जेव्हा लंडनमध्ये असतो, तेव्हा सकाळी आधी मी मुलीला शाळेत सोडतो, मग मुलाला कॉलेजमध्ये सोडतो, नंतर बायकोला कॉलेजमध्ये सोडतो आणि मग अनपढसारखा घरी येऊन आरामात क्रिकेट बघत बसतो!”
इथे अक्षय कुमारचा उदो उदो करण्याचा मुळीच उद्देश नाही. शिवाय अनेक पुरूष म्हणतीलही, की ‘आम्हीपण आमच्या बायकोचं कौतुक करतो… त्यात काय एवढं वेगळं आहे?’
ते ‘वेगळेपण’ त्यांच्या पत्नीच सांगू शकतील!
मुळात आपल्या बायकोच्या हुशारीचं, तिच्या शिक्षण घेण्याच्या जिगीषेचं प्रांजळपणे कौतुक करणारे आणि त्याच वेळी आपण त्या क्षेत्रात कमी पडलोय, हे मान्य करणारे नवरे अपवादानंच दिसतात. त्यातही बायकोचं कोणत्याही बाबतीत- विशेषत: हुशारीच्या आणि चातुर्याच्या बाबतीत कौतुक करताना पुष्कळ पुरूष विनोदाचा आधार घेतात. ‘बायकोला चार जणांत चांगलं नाही म्हटलं, तर आमचं घरी गेल्यावर काही खरं नाही! म्हणून आम्ही तिला क्रेडिट देतोय,’ असा आव पुष्कळांच्या चेहऱ्यावर असतो. बायको जास्त शिकलेली आणि नवरा कमी शिकलेला, अशी उदाहरणं अगदी आजच्या आधुनिक जगातही कमीच आढळतात, यातच सर्व आलं.
आणखी वाचा-‘कूल द ग्लोब’ ॲप बनवणाऱ्या मराठमोळ्या प्राचीवर फोर्ब्सची कौतुकाची थाप
‘बाईनं अक्कल पाजळू नये. तिची जागा चुलीसमोर,’ या गृहितकापासून समाज म्हणून आपण पुढे आलोय. आज अनेक घरांमध्ये निर्णय घेताना कुटुंब म्हणून त्यातल्या स्त्रीचंही मत विचारात घेतलं जातं, तिला त्या प्रक्रियेतून वगळलं जात नाही. पण अजूनही जाहीरपणे तिची हुशारी मान्य करण्याएवढा, ती बोलून दाखवण्याएवढा मोकळेपणा येणं बाकी आहे.
अभिनेत्यांनाच आदर्श मानणाऱ्या समाजात अक्षयच्या या उदाहरणावरून थोड्या जरी पुरूषांनी बोध घेतला आणि आपल्या पत्नीच्या शैक्षणिक कर्तृत्त्वाचं सार्थ कौतुक करण्याची, तिला प्रोत्साहन देण्याची तयारी दाखवली तरी पुष्कळ आहे!
lokwomen.online@gmail.com