अनेक महिला आपल्या कर्तृत्वाने इतर महिलांसमोर एक आदर्श निर्माण करतात. काहीतरी मोठे करण्यासाठी इतरांना अशा महिलांकडून प्रेरणा मिळत असते. अशा स्त्रिया संपूर्ण समाजाला त्यांच्या कामाने अवाकही करतात. सध्या अलंकृता साक्षी या महिलेचे नाव चर्चेत आहे. गुगलसारख्या नामांकित कंपनीत नोकरी मिळवत तिने मोठे पॅकेज मिळवले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

६० लाखांचे पॅकेज

बिहार राज्यातील भागलपूर जिल्हातील अलंकृता साक्षीची गुगल कंपनीत सिक्युरिटी अ‍ॅनालिस्ट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या पदासाठी तिने वार्षिक ६० लाखाचे पॅकेज मिळवले आहे.

आयआयटी किंवा आयआयएम सारख्या मोठ्या संस्थेतून शिक्षण न घेता हजारीबाग जिल्ह्यातील युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी (UECT) या संस्थेतून पदवीचे शिक्षण घेतलेल्या अलंक्रिता साक्षीने गुगल कंपनीत मोठ्या रकमेचे पॅकेज मिळवले आहे. तिने इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स इंजिनिअरिंगमध्ये बीटेकची पदवी प्राप्त केली आहे.

अलंकृता साक्षीने यापूर्वी ‘या’ नामांकित कंपन्यांमध्ये केले आहे काम

यापूर्वी तिने बेंगलोरमध्ये विप्रो, अर्न्स्ट अँड यंग आणि हरमन इंटरनॅशनल सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम केले आहे. तिला पाच वर्षांचा कामाचा अनुभव आहे. ती QRADAR-SIEM, Splunk, फिशिंग ईमेल विश्लेषण, फायरवॉल, मालवेअर विश्लेषण मध्ये कुशल आहे.

हेही वाचा: अवघ्या ३२ वर्षांची प्रसिद्ध गायिका ठरली १० हजार कोटींच्या संपत्तीची मालकीण, कशी करते कमाई? जाणून घ्या

तिने लिंक्डइनवर तिच्या गुगल कंपनीत मिळालेल्या नोकरीबद्दल माहिती देत लिहिले, “मी या संधीबद्दल कृतज्ञ आहे. नाविन्याचा शोध असलेल्या टीमसोबत काम करण्यास उत्सुक असून माझ्या संपूर्ण प्रवासात ज्यांनी मला साथ दिली त्या सर्वांचे खूप खूप आभार. तुमचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन अमूल्य आहे.”

अलंकृताची कौटुंबिक पार्श्वभूमी

मिळालेल्या माहितीनुसार, अलंकृताचे वडिलोपार्जित घर बिहारच्या नवगछिया येथील सिमरा गावात आहे. मात्र सध्या तिचे कुटुंब झारखंडमधील कोडरमा जिल्ह्यातील झुमरी तलैया येथे राहते. अलंकृताचे बालपण झारखंडच्या कोडरमा येथे गेले. तिचे प्राथमिक शिक्षण कोडरमा येथील जवाहर नवोदय विद्यालयातून झाले. तिचे वडील कोडरमा येथे खाजगी नोकरी करतात आणि तिची आई रेखा मिश्रा एका खाजगी शाळेत शिक्षिका आहे. बेंगलोरमधील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या मनीष कुमारबरोबर तिचे लग्न झाले आहे.

सध्या तिला गुगल कंपनीत मिळालेल्या पॅकेजची चर्चा होताना दिसत असून तिच्या पगारामुळे सगळे रेकॉर्ड तोडले गेले आहेत, असे म्हटले जात आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alankrita shakshi has secured 60 lakh annual package at google company as security analyst chdc nsp chdc nsp