गेले काही दिवस ‘अलेजांड्रा रॉड्रिगेझ’ हे नाव इंटरनेटवर गाजतंय. ही अलेजांड्रा अर्जेंटिनाची राजधानी ब्युनॉस आयरिसची. चकाकते डोळे, लक्षात राहील असं खळाळतं हसू आणि सरळ केस. ‘अर्जेटिनाची तरुणी’ या शब्दांना साजेशी अंगयष्टी! पण अलेजांड्रा काही रूढ अर्थानं ‘तरुणी’ नाही. खरंतर जगभरात तिच्या बातम्या होण्याचं कारण तेच!
अलेजांड्रा आहे ६० वर्षांची. तिनं नुकतीच ‘मिस युनिव्हर्स ब्युनॉस आयरिस’ ही सौंदर्यस्पर्धा जिंकली. आता २५ मे रोजी होणाऱ्या ‘मिस युनिव्हर्स अर्जेंटिना’ स्पर्धेत ती ब्युनॉस आयरिसचं प्रतिनिधित्त्व करेल आणि त्यातही जर ती जिंकली, तर तिला येत्या सप्टेंबरमध्ये होणाऱ्या ‘जागतिक मिस युनिव्हर्स २०२४’ स्पर्धेत अर्जेंटिनाचं प्रतिनिधित्त्व करायला मिळेल.
मुळात या वयाच्या स्त्रिया ‘मिस युनिव्हर्स’मध्ये भाग घेऊ शकतात, हीच अनेकांसाठी नवी माहिती होती. कारण गतवर्षीच या संघटनेनं आपले वयाचे नियम शिथिल करून १८ वर्षांवरील कुणीही स्त्री ‘मिस युनिव्हर्स’ होऊ शकेल, असं जाहीर करून टाकलं. अलेजांड्रानं सध्या जी स्पर्धा जिंकलीय त्यातही अगदी १८ वर्षं ते ७३ वर्षं वयोगटातल्या ३४ स्त्रिया सहभागी झाल्या होत्या. अलेजांड्राच्या विजयानं हे अधोरेखित झालं, की यापुढची मिस युनिव्हर्स ‘तरुणी’च असेल असं नाही. ती तुमच्या आजीच्या वयाचीही असू शकेल!
आणखी वाचा-हा तर महिलांचा अपमान! मुंबई लोकलमधील महिला प्रवाशांनी शरीरधर्म उरकण्यासाठी किती पायपीट करावी?
अर्जेंटिनाच्या ‘ला प्लाता’ भागात राहणारी अलेजांड्रा वकील आणि पत्रकार आहे. ती ‘मिस युनिव्हर्स ब्युनॉस आयरिस’ झाल्यानंतर सौंदर्यस्पर्धा कशा ‘पुरोगामी’ होत चालल्या आहेत… सौंदर्याबद्दलचे सर्व पूर्वग्रह आज मोडले… वय हा फक्त एक आकडा असतो… ही नक्की ६० वर्षांची आहे का?… वय ६० वर्षांचं आणि फिगर २० वर्षांची… वगैरे चर्चा समाजमाध्यमांवर होत आहेत.
यातला पुरोगामित्त्वाचा आणि पूर्वग्रह मोडल्याचा मुद्दा अधिक महत्त्वाचा. खरोखरच अलेजांड्राचा विजय ही सौंदर्यस्पर्धा पुरोगामी झाल्याची ग्वाही म्हणता येईल का? त्यामागचा छुपा अर्थ वेगळाच आहे का?… जागतिक सौंदर्यस्पर्धा आणि सौंदर्यप्रसाधनांचं आंतरराष्ट्रीय मार्केट यांचं साटंलोटं बहुचर्चित आहे. सौंदर्यप्रसाधनांच्या कंपन्यांसाठी ही व्यवसायवृद्धीची मोठी संधी असते. त्यामुळे ‘पुरोगामित्त्व’ वगैरे नुसती ढाल असून या प्रसाधनांचा ग्राहकवर्ग विस्तारणं आणि केवळ रूढ अर्थानं तरूण किंवा मध्यमवयीन असलेल्या स्त्रियाच नव्हे, तर त्याही पुढच्या वयोगटाच्या स्त्रियांना आपल्या ग्राहकवर्गात समाविष्ट करून घेणं, हा या सर्व उपद्व्यापामागचा मूळ हेतू असावा, असं म्हणायला पुष्कळ वाव आहे.
केवळ ‘तुमचं वय आहे त्यापेक्षा कमी दाखवा,’ अशा जाहिराती करणाऱ्या उत्पादनांचीच बाजारपेठ पहा ना! हल्ली अगदी वयाच्या २५ व्या वर्षापासून कित्येक मुलींना आपण ‘आँटी’ तर दिसत नाहीयोत ना, याची चिंता लागून राहिलेली असते. वयाच्या ३० व्या वर्षांच्या पुढे ‘तरुण’ दिसण्यासाठी कोणतेही प्रयत्न न करणारी स्त्री विरळाच दिसेल. ‘रीसर्च अँड मार्केटस्’च्या एका अहवालानुसार ‘अँटी एजिंग’ सौंदर्यप्रसाधनांचं जागतिक मार्केट २०२२ मध्ये ३९.९ बिलियन डॉलरच्या आसपास होतं आणि २०३० पर्यंत ते ६० बिलियन डॉलरवर (म्हणजे रुपयाच्या आजच्या मूल्यानुसार पाहिलं तर जवळपास ५० हजार कोटी रुपयांहून जास्त!) पोहोचेल अशी अपेक्षा आहे. ही समीकरणं स्त्रियांना केंद्रस्थानी ठेवून लक्षात घ्यायला हवीत, कारण पुरूषाचं ‘दिसणं’ हा स्त्रीच्या दिसण्याइतका चर्चेचा विषय कधीच ठरत नाही. एकेकाळी ‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकलेल्या आणि सौंदर्याबरोबरच कित्येक चित्रपटांत कसदार अभिनयाचं दर्शन घडवणाऱ्या ऐश्वर्या रायच्या आताच्या फोटोंवर ‘म्हातारी!’ वगैरे कमेंटस् होतात, तेव्हा ती आता ५० वर्षांची आहे, हे लोक लक्षात घ्यायला तयार नाहीत, हे उघड होतं. मात्र चित्रपटांत सत्तरीच्या हीरोंनी विशीतल्या हिरोईन्स गटवणं मात्र फॅन्स सहज स्वीकारतात! त्यामुळे स्त्रियांच्या सौंदर्यस्पर्धांचा वयोगट वाढवणं आणि त्यात वयस्कर स्त्रिया विजयी होणं ही ‘जग पुढारल्याची नांदी’ वगैरे म्हणणं उतावीळपणाचंच ठरेल.
दुसरी महत्त्वाची गोष्ट ‘पूर्वग्रह मोडले जाताहेत’ ही. अलेजांड्रा रॉड्रिगेझच्या विजयानंतर ही चर्चा जोरात सुरू झाली. पण खरंच कोणते पूर्वग्रह अलेजांड्रानं मोडले?… अलेजांड्रा ६० वर्षांची आहे हे खरोखरच तिनं वयाचं प्रमाणपत्र दाखवल्याशिवाय कुणीही सांगू शकणार नाही! म्हणजे यापूर्वी जेव्हा सौंदर्यस्पर्धा केवळ तरुणींसाठी असत, तेव्हा त्यातल्या स्पर्धकांना जे सर्व लिखित-अलिखित नियम लागू असतील, ते सर्व अलेजांड्रा पूर्ण करते आहे. बारीक नसलेल्या किंवा ‘तरुण’ न दिसणाऱ्या इतर ६० वर्षांच्या स्त्रिया या स्पर्धेत टिकू शकल्या असत्या का?… मग ‘पूर्वग्रह मोडले’ म्हणून आपण कुणाचं समाधान करून घेतोय?…
हे सर्व असं असलं, तरी अलेजांड्राच्या विजयाला किरकोळ समजण्याचं कारण नाही. ती रास्त अभिनंदनास आणि कौतुकास नक्कीच पात्र आहे, कारण साठीमध्येही स्त्रियांना ‘फिट’ राहता येतं, स्वत:ची उत्तम काळजी घेता येते, याचं ती एक उदाहरण म्हणता येईल. त्या अर्थानं ती अनेकींना प्रेरणादायी ठरू शकेल.
तुम्ही वयानं तरूण असा किंवा नसा, मनानं तरूण राहणं- अर्थात जीवनात नवनवे अनुभव घेण्यास तयार राहणं आणि स्वत:च्या आरोग्याला शेवटचा प्राधान्यक्रम न देता ‘फिट’ राहण्याकडे लक्ष पुरवणं, एवढं जरी या पुराणानंतर अधोरेखित झालं, तरी ‘पुरोगामित्त्वा’च्या दिशेनं बरीच मजल आपण मारलीय, असं समजण्यास हरकत नाही!
lokwomen.online@gmail.com