Sharvika Mhatre : शर्विका म्हात्रे हे केवळ एक नाव नाही, तर ते लाखो मुलींसाठी आणि आताच्या नव्या पिढीसाठी एक प्रेरणास्थान बनले आहे. फक्त सहा वर्षांच्या शर्विकाने नुकतेच १०० गड-किल्ले सर केले. तिच्या वयाच्या तुलनेने हा विक्रम खरोखरच खूप मोठा आहे. एखादी सहा वर्षांची मुलगी तिच्या सहा वर्षांच्या आयुष्यात एवढ्या मोठ्या संख्येने गड-किल्ले सर करीत असेल, तर उर्वरित आयुष्यात ती किती कामगिरी करेल, याचा विचार तुम्ही करू शकता. शर्विका कोण आहे? गड-किल्यांबरोबर शर्विकाचे नाते कसे जुळले? तिचा १०० गड-किल्ल्यांपर्यंतचा प्रवास कसा होता, हे आज आपण शर्वरीचे आई-वडील आणि तिच्याकडून सविस्तर जाणून घेणार आहोत.
मुलांना घडवण्यात आई-वडिलांचा खूप मोठा हात असतो. आई-वडील मुलांच्या आयुष्याचे शिल्पकार असतात; जे त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना आकार देतात. शर्विकाच्या या विक्रमामागे तिच्या आई-वडिलांचा मोलाचा वाटा होता. शर्विकाने गड-किल्ले सर करीत अगदी वयाच्या सहाव्या वर्षी त्यांचे शतक पूर्ण केले, तेव्हा आई-वडील म्हणून त्यांना काय वाटते, याबाबत त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
शर्विकाची आई अमृता म्हात्रे सांगतात, “आई म्हणून मला तिचा नक्कीच अभिमान वाटतो, कारण- १०० गडांच्या प्रवासात मी आणि तिचे वडील कायम तिच्यामागे असल्यामुळे आम्हाला दोघांना आलेले अनुभव जवळजवळ सारखेच आहेत. १०० गड सर करताना आम्हाला १०० प्रकारचे अनुभव आले आहेत. त्यातील काही चांगले; तर काही वाईट आहेत. आमच्या मार्गात असंख्य अडचणी, संकटे आली. या सर्वांवर मात करून, जेव्हा शर्विका १०० व्या जीवधन गडावर जाताना एकेक पाऊल टाकत होती. त्या पावला-पावलावर आम्हाला तिचा गेल्या साडेतीन वर्षांचा प्रवास आठवून डोळ्यांत पाणी येत होते.”
त्या पुढे सांगतात, “मुळातच आमच्या दोघांच्या मनात लहानपणापासून शिवरायांची ओढ आणि निष्ठा असल्यामुळे सुरुवातीला आमचे विचार जुळले आणि ही आवड आपोआप तिच्यामध्ये रुजली. आम्ही ‘सह्याद्री प्रतिष्ठान’मुळेच गड-किल्ल्यांच्या अधिक जवळ गेलो. या संस्थेच्या माध्यमातून गडसंवर्धन मोहिमेला जात असल्यामुळे ही आवड तिच्यात आपोआप वाढत गेली. सह्याद्री व गड-किल्ले यांची आवड आणि ओढ एकदा का लागली, तर ती आयुष्यभर सुटत नाही, हा अनुभव इतरांप्रमाणे आम्हालासुद्धा आला आहे.”
हेही वाचा : सोलापूरची रणरागिणी! महिलांना रोजगार देऊन स्वत:च्या पायावर उभ्या करणाऱ्या पाटील काकी कोण आहेत? जाणून घ्या
शर्विकाच्या प्रवासाविषयी तिचे वडील जितेन म्हात्रे सांगतात, “शर्विका सवादोन वर्षांची असताना आम्ही तिला रायगड किल्ल्यावर नेले होते. त्यावेळी भरउन्हात आम्ही गडावरील सर्व वास्तू पाहताना शर्विका आमच्याबरोबर स्वतः चालत होती आणि तिथल्या मातीत अक्षरशः होळी खेळत होती. हा आमचा पहिला अनुभव. त्यानंतर आम्ही दुसऱ्यांदा पालीजवळील सरसगडावर जाताना एवढा कठीण किल्ला तिने स्वत:हून सर केला तेव्हा आम्हाला तिच्यामध्ये असणारा हा वेगळा गुण निदर्शनास आला. २६ जानेवारी २०२० ला शर्विका अडीच वर्षांची असताना आम्ही सहज कोणत्या तरी गडावर जाण्याचा विचार करीत होतो, तेव्हा आम्ही अलिबाग म्हणजेच घरापासून जवळच असलेल्या पनवेल येथील कलावंतीण गडावर जाण्याचा विचार केला. हा गड खूप कठीण आहे, अशी काही लोकांची धारणा होती; परंतु मी या गडावर दोनदा जाऊन आल्यामुळे मला इथला अनुभव होता. गडावर जाऊन आपला राष्ट्रध्वज फडकवायचा हा आमचा हेतू होता. आम्ही पहाटे निघालो आणि जेव्हा आम्ही ‘कलावंतीण’च्या थरारक पायऱ्यांजवळ गेलो, तेव्हा शर्विकाने तिथल्या पायऱ्या सरसर चढायला सुरुवात केली. आम्ही माथ्यावर जात असताना काही लोकांनी तिचे व्हिडीओ काढले आणि समाजमाध्यमांवर टाकले. दुसऱ्या दिवसापर्यंत ते व्हिडीओ इतके व्हायरल झाले की, अनेक पत्रकारांचे कॉल आले. त्यांनी वर्तमानपत्रातून आणि न्यूज चॅनेलमधून शर्विकाविषयी सांगितले. अशा रीतीने शर्विकाची पहिल्यांदा संपूर्ण महाराष्ट्राला ओळख झाली.”
ते पुढे सांगतात, “ही मोहीम ठरवून केलेली नव्हती; परंतु त्यानंतर मात्र तिचीसुद्धा गड-किल्ल्यांविषयी आवड वाढू लागली. त्याचबरोबर आमच्या दुर्गसंवर्धन मोहिमासुद्धा चालू होत्या. तिने सर्वांत कमी वयात सर्वांत उंच किल्ला (साल्हेर), सर्वांत कमी वयात महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर (कळसूबाई) व गुजरातमधील सर्वोच्च गिरनार शिखर या मोहिमा यशस्वीपणे पूर्ण केल्या. त्याबरोबरच तिचा १०० गडांचा प्रवास सुरू होता. दर शनिवारी व रविवारी आम्ही महाराष्ट्रातील कोणत्या तरी गडावर असतोच. आठवडाभर माहिती, व्हिडीओ या सर्व गोष्टी करून शनिवारी गडावर जायचे हा आमचा नित्यक्रम आजपर्यंत सुरू आहे.
शर्विकाची आई सांगते, “एका वर्षात किती गड सर करायचे हे कधी ठरवले नव्हते; परंतु १०० गडांचे नियोजन आधीच करून ठेवलेले होते. त्या त्या ठिकाणी कसे जायचे? कुठे राहायचे? तिथल्या स्थानिक लोकांचे संपर्क या सगळ्या गोष्टी आधीच तयार असल्यामुळे वेळ आणि सुट्टी मिळेल तसे आम्ही एक-एक गड सर करीत गेलो; पण १०० गड सर करण्यासाठी साडेतीन वर्षांचा कालावधी लागला.”
शर्विकाचे वडील सांगतात, “शर्विकाला गड-किल्ले सर करण्यामध्ये तिची जन्मजात आवड साह्यभूत ठरली होती आणि यापुढेही ती ठरेल. पण, आमचा उद्देश असा आहे की, आजच्या इंटरनेटच्या युगात अनेक मुले ही मोबाईलमध्ये अडकलेली आहेत. आजचे पालक आपल्या सोईसाठी मुलांच्या हातात मोबाईल देतात आणि स्वत: व्यग्र राहतात. आम्हाला हे करायचे नव्हते. आम्हाला जन्मापासूनच तिला मोबाईलपासून लांब ठेवायचे होते आणि आमचा हा उद्देश आज यशस्वी झाला. गड-किल्ल्यांच्या आवडीमुळे तिने आजपर्यंत शून्य टक्का मोबाईलचा वापर केला आहे, हे आम्ही अभिमानाने सांगतो. टीव्हीवरील कार्टूनविषयी तिला आजपर्यंत माहिती नाही; परंतु ऐतिहासिक चित्रपट, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित चित्रपट आणि त्यांची गाणी मात्र तिला तोंडपाठ आहेत. कोणत्याही गडावर गेल्यानंतर तिथल्या वास्तू आणि तिथला इतिहास तिला सांगितल्यामुळे तिच्या मनात आपले मावळे आणि महाराज यांच्याबद्दल प्रचंड प्रेम व निष्ठा तयार झाली आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक मुलाने या आभासी जगातून बाहेर येऊन त्यांनीसुद्धा हा इतिहास प्रत्यक्ष अनुभवावा, असे आम्हाला वाटते.”
हेही वाचा : Priya Singh Case : बॉयफ्रेंडने फसवलं? चूक तुमची की त्याची? प्रिया सिंहसारखी ‘ही’ चूक तुम्ही करू नका!
गड-किल्ल्यांची सहल का महत्त्वाची, याविषयी शर्विकाचे आई-वडील सांगतात, “गड-किल्ले म्हणजे नुसत्या वास्तू नसून, आपल्या मावळ्यांच्या रक्ताने पवित्र झालेली तीर्थस्थाने आहेत, असे आम्ही नेहमी सांगत असतो. आमचा अनुभव असा आहे की, कोणत्याही गडावरून आल्यानंतर आम्हाला एक ऊर्जा मिळते. ही ऊर्जा किमान १५ दिवस आमच्या शरीरात राहते. त्यामुळे इतर कामे करण्यास आम्हाला मदत होते. रायगड, राजगड, सिंहगड यांसारख्या गडांवर तर एक वेगळीच ऊर्जा आहे. त्याचा अनुभव प्रत्येकाला आपापल्या कुवतीनुसार मिळत असतो. हल्ली काही मुले ही मोबाईल आणि जंक फूड यांमुळे स्थूल झालेली पाहायला मिळतात. त्यांच्यासाठी गड-किल्ले सर करणे म्हणजे एक वेगळी दिशा असू शकते. कारण- गड-किल्ल्यांची सैर फक्त आनंदच देत नाही, तर ती आपले शरीर निरोगी ठेवण्यासही मदत करते. त्यामुळे प्रत्येकाने किमान महिन्यातून एकदा तरी डोंगरी किल्ल्यांची सफर करावी.”
वयाच्या सहाव्या वर्षी १०० गड-किल्ले सर करणाऱ्या चिमुकल्या शर्विकाने लोकसत्ताशी बोलताना सांगितले की, गड-किल्ले बघितल्यावर तिला खूप छान वाटतं. तिला गड-किल्ले सर करायला खूप आवडतात आणि तिथे सारखं जावंसं वाटतं. शर्विका सांगते, “छत्रपती शिवाजी महाराज मला खूप आवडतात. ते मला शक्ती देतात म्हणून मी गडांवर जाऊ शकते. गड-किल्ले बघताना मी महाराजांचा इतिहास जाणून घेते. माझे बाबा मला बुरूज, तटबंदी, पाण्याच्या टाक्या, प्रवेशद्वार हे सर्व दाखवतात आणि तिथे जाण्याच्या आधी माहिती सांगतात. तिथे गेल्यावरसुद्धा मला सांगतात की, तिथे काय काय झाले होते आणि घरी आल्यावर माझे बाबा जेव्हा प्रत्येक गडाचा व्हिडीओ बनवतात तेव्हा मी त्या व्हिडीओत तोच इतिहास सांगते.”
शर्विका पुढे सांगते, “गड-किल्ल्यांवर मला बुरूज, तटबंदी, प्रवेशद्वार आणि सर्वांत जास्त जुनी मंदिरे पाहायला आणि गडावर राहायलासुद्धा आवडते. मी गड सर केल्यानंतर येताना पायथ्याशी असणारी पवित्र माती गोळा करते. आतापर्यंत मी १०० गडांवरील माती गोळा केली आहे. त्याचा संग्रह माझ्या घरी आहे.”
शर्विका कठीण किल्ले सर करण्यासाठी पुण्यात राजे शिवाजी वॉल क्लायम्बिंग येथे रोज वॉल क्लायम्बिंगचा सराव करते. तिला भविष्यात सैनिक व्हायचे असून, देशाची सेवा करायची आहे. तसेच ‘वॉल क्लायम्बिंग’मध्येही जागतिक स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करायचे आहे. अवघ्या सहा वर्षांच्या चिमुकलीच्या मनात जर सैनिक व्हायची इच्छा असेल, तर तिचे भविष्य निश्चितच उज्ज्वल आहे. कारण- या वयात देशासाठी लढण्याची इच्छाशक्ती फक्त शिवरायांच्या लेकीमध्ये असू शकते.