आर्किड्सना भरपूर प्रकाश, थंड सावली आणि आर्द्रता मानवते. कडक उन त्यांना अजिबात चालत नाही, त्यामुळे घरात उन येत नाही तर कोणती झाडं लावायची? असा प्रश्न असेल तर इनडोअरपेक्षा आर्किड्सचा पर्यय निवडावा. कारण त्यांना नेमकं असंच वातावरण लागतं, फक्त काळोख येणारी जागा नसावी. आजकाल नर्सरीत आर्किड्स सहज मिळतात. पण जर तुम्ही पहिल्यांदाच आर्किड लावणार असाल तर सिंबिडियम, फॉलेनोप्सिस, वांडा, कॅटेलिया, या प्रकारातली आर्किड्स निवडा.
त्या दिवशी घरी यायला मला थोडा उशीरच झाला होता. बाहेर उन्हाचा जोर खूप होता. येऊन हॉलमध्ये जरावेळ बसते नाही तो इंटरकॉम वाजला.
लगोलग दोन ऑर्किड्स घेऊन एक जण हजर. ती दोन्ही आर्किड्स अगदी मलूल झाली होती. त्यांना हॉल जवळच्या बाल्कनीत नेऊन ठेवलं. तिथे विशेष थंडावा होता. सगळी आर्किड्स तिथेच ठेवली होती. पावसाळा सोडून इतरवेळी सगळी आर्किड्स इथेच असतात. आज प्रकृतीसुधारासाठी आलेल्या या दोन नवीन सदस्यांची भर पडली होती. यांची नीट काळजी घेऊन त्यांना पूर्ववत करायचं होतं. सोसायटीत अनेकजण अशी अत्यवस्थ झाडं पाठवत असतात. यात बहुतांशी सक्युंलंटस् आणि कॅक्टस जास्त असतात. तुळशी आणि जास्वंदी असतात. क्वचित कधी आर्किड्स असतात.
यांना नेमकी कशाची कमतरता आहे, काय चुकलंय ज्याने यांची अशी अवस्था झालीय ते शोधून काढून त्यांची काळजी घेतली की ते रोप सुधारतं आणि मग स्वगृही जातं.
झाडांवर असे उपचार करणं मला फार आवडतं. यातून खूप शिकायला तर मिळतंच, पण वनस्पतींच्या जगातली अनेक रहस्यं उलगडत जातात.
आकर्षक फुलांची, हाताळायला सोपी अशी आर्किड्स कधी भेट म्हणून दिली जातात. कधी कुठल्या प्रदर्शनातून विकत घेतली जातात.
टिश्यू कल्चर पद्धतीने तयार झालेल्या रोपांवर काम करताना फार वाईट वाटत नाही, पण एखाद्या झाडावरून ओरबाडून आणलेली जंगली आर्किड्स येतात किंवा पावसाळ्यात गावातून आणलं होतं तेव्हा फुलं होती आता हे असं झालंय, असं म्हणत एखादी सीतेची वेणी जेव्हा मलूल अवस्थेत येऊन पोहचते त्यावेळी खूप वाईट वाटतं.नैसर्गिक अधिवासात वाढणारी ही यक्षपुष्पं खरं तर तिथेच शोभून दिसतात. त्यांना तिथून उपटून आणायचं नसतं.बरेचवेळा पुरेशा माहिती अभावी अशा गोष्टी होतात.
आज आलेली दोन्ही रोपं ही टिश्यू कल्चर पद्धतीने तयार झालेली होती. अतिरिक्त पाणी आणि चुकीचं soil medium वापरल्याने रोपांची ही अवस्था झाली होती.
आर्किड्सना भरपूर प्रकाश, थंड सावली आणि आर्द्रता मानवते. कडक उन त्यांना अजिबात चालत नाही, त्यामुळे घरात उन येत नाही तर कोणती झाडं लावायची? असा प्रश्न असेल तर इनडोअरपेक्षा आर्किड्सचा पर्यय निवडावा. कारण त्यांना नेमकं असंच वातावरण लागतं, फक्त काळोख येणारी जागा नसावी. आजकाल नर्सरीत आर्किड्स सहज मिळतात. पण जर तुम्ही पहिल्यांदाच आर्किड लावणार असाल तर सिंबिडियम, फॉलेनोप्सिस, वांडा, कॅटेलिया, या प्रकारातली आर्किड्स निवडा. यांच्या अनेक संकरित जाती असतात.
यात फुलांचे रंग, त्यांच्यावरील रेषा, ठिपके आणि त्यांचे आकार यात भरपूर विविधता आढळते. शिवाय घरच्या बागेत यांना वाढवणं सोपं असतं.
आर्किड लावण्यासाठी आपली नेहमीची माती उपयोगी पडत नाही.तर बारीक गोटे, कोळश्याचे तुकडे, विटांचा चुरा, शेवाळे, कोकोपीट (काही जातींसाठी), कोको चिप्स, नारळाच्या करवंटीचे मध्यम आकाराचे तुकडे अशांचा वापर करावा लागतो.
आजकाल खास ही झाडं लावण्यासाठी भरपूर लांबट छिद्र असलेल्या माती आणि प्लास्टिकच्या कुंड्या बाजारात सहज मिळतात.
यात आर्किडला लागणारे घटक वापरत, बारीक पण मजबूत तारेने बांधून आपलं रोपं लावून घ्यायचं.
नर्सरीत अगदी इवल्या कुंडीत लावलेली, हाताळायला सोपी अशी रोपं उपलब्ध असतात तशीच मोठी फुलं आलेली रोपं ही उपलब्ध असतात.
थायलंडवरून मी अगदी छोट्याशा बाटल्यांमध्ये लावलेली रोपं आणली होती.अशाप्रकारात ने आण करणं सोपं होतं. फक्त छोट्या रोपांना थोडं अधिक जपावं लागतं. मोठ्या वाढलेल्या रोपांची त्यामानाने फार काळजी घ्यावी लागतं नाही. एकतर त्यांची वाढ चांगली झालेली असते, फुलं आली असतील तर ती त्या कुंडीत स्थिरावलेली असतात. मग काम उरते ते फक्त त्यांना योग्य वातावरण उपलब्ध करून देणं आणि आर्द्रता राखणं.
आर्किड ही खरं तर सहज फारसे कष्ट न घेता वाढवता येण्यासारखी वनस्पती आहे.
काही आर्किड्स झाडाच्या आधाराने वाढतात, ज्यांना शास्त्रीय भाषेत एपिफायटिक ऑर्किड्स असं म्हणतात. या प्रकारातील आर्किड्स झाडांचा आधारासाठी उपयोग करतात.
अंबा, फणस, नारळ अशा काही झाडांवर वाढलेली आर्किड्स आपण बघितलेली असतात. ती बहुतांशी या प्रकारात मोडणारी असतात. यांची मुळं ही विशिष्ट प्रकारची असून ती हवेतून आर्द्रता आणि पोषक द्रव्ये शोषून घेतात. या प्रकारात मोडणाऱ्या वांडा, डेनड्रोबियमच्या काही जाती आपण आपल्या बागेत लाकडी पट्टी किंवा फर्न रूटस् तसेच मॉस स्टीकच्या आधाराने वाढवू शकतो.
या लेखात आपण आर्किड्सची थोडीफार ओळख करून घेतली. पण या वनस्पतींचं जग हे खरंच खूप मनोहारी आणि मोठं आहे. त्या आणि इतर बऱ्याच गोष्टींची चर्चा पुढील लेखात करूया.
mythreye.kjkelkar@gmail.com